
वैद्यकीय, समाजसेवा, अध्यापन आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या डॉ. माधवी वैभव गायकवाड यांच्या जीवनकार्याविषयी...छत्रपती संभाजीनगर येथे १९७५ साली जन्मलेल्या डॉ. माधवी गायकवाड सधन कुटुंबातील असून, घरातील सर्वच उच्चशिक्षित आहेत. त्यांचा भाऊ आर्थोपेडिकतज्ज्ञ आणि वहिनी प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ. डॉ. माधवी या स्वतःदेखील ‘एम.डी.’ मुळातच हुशार असणार्या माधवी यांचे शालेय शिक्षण नाशिकमधील रचना विद्यालय, ‘बी.एम.एस.’ अमरावती, तर ’एम.डी.’ची पदवी नागपूर विद्यापीठातून प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण होताच, त्यांनी २००२ सालापासून स्वतःची प्रॅटीस सुरू केली. हे काम त्यांनी २००७ पर्यंत म्हणजेच पाच वर्षे केले. या काळात त्यांनी त्वचारोगाने पीडित असलेल्या रुग्णांना बरे करत निरोगी आयुष्य दिले. यात विशेषकरून पांढरे कोड रुग्णांच्या आयुष्यातून कायमचे हद्दपार केले. हे करत असतानाच डॉ. माधवी यांना अध्यापनाचे क्षेत्र खुणावू लागले. मग त्यांनी आपला डॉटरी पेशा काहीसा थांबवत सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापकपदाची पाच वर्षे नोकरी केली. यासोबतच पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचेही काम त्यांनी आनंदाने केले. त्यानंतर डॉ. माधवी यांनी नाशिकच्या एकलहरे येथील मातोश्री आयुर्वेदिक महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम पाहिले. सध्या त्या निवृत्त झालेल्या असल्या, तरी त्यांनी आपला अध्यापनाच्या क्षेत्रातील प्रवास अजूनही पुढे सुरू ठेवला आहे. आता डॉ. माधवी या जळगाव येथील गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करत आहेत. आपली अध्यापन क्षेत्रातील १७ वर्षांची कारकीर्द गाजवणार्या डॉ. माधवी यांनी हजारो विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक करण्याबरोबरच उत्कृष्ट डॉटर म्हणूनही घडवले. त्यामुळेच आजघडीला त्यांचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रासह इतर राज्यांतही शैक्षणिक क्षेत्रासह वैद्यकीय क्षेत्रातही आपले नाव उज्ज्वल करत आहेत. दरम्यानच्या काळात डॉ. माधवी यांनी विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारचा आयुर्वेदातील ‘प्रकृती परिश्रम’ नावाचा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत रुग्णाची प्रकृती जाणून घेत कसे उपचार करायचे, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये काय खावे, काय खाऊ नये, तसेच उत्तम आहाराने कोणते आजार टाळता येऊ शकतील, याची माहिती दिली. आपल्या आयुष्यात काहीशा स्थिरस्थावर झाल्यानंतर डॉ. माधवी यांनी स्वतःला समाजकार्यात झोकून देत दुर्लक्षित घटकांचे आयुष्य उजळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांनी ‘योशिता बहुउद्देशीय स्वयंसेवी’ नावाची संस्था स्थापन करून समाजकार्य करत आहेत. या संस्थेअंतर्गत त्या कुपोषित बालकांचे आरोग्य सुदृढ करत आहेत. कुपोषित बालकांसाठी त्यांनी एकलहरे गेट, शिलापूर, सामनगाव आणि निफाड तालुयातील काही भागांत काम केले. या बालकांचे वजन वाढविण्यासाठी पोषण आहाराबरोबरच आयुर्वेदिक कल्प देण्याचा प्रयोग डॉ. माधवी यांनी करून पाहिला. हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाल्याचे डॉ. माधवी गायकवाड अभिमानाने सांगतात. फक्त पोषण आहाराने कुपोषित मुलांचे वजन आणि शारीरिक वाढ योग्य प्रकारे होत नव्हती. मात्र, कल्पामुळे कुपोषित बालकांचे वजन जलदगतीने वाढत असल्याने त्यांच्या आरोग्यातही सकारात्मक सुधारणा झाल्याचे दिसून येत असल्याचे डॉ. माधवी यांचे म्हणणे आहे. कल्प दिल्याने कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्याबरोबरच वजन वाढल्याबाबतचे पत्र नाशिकच्या काही नगरसेवकांनी एकलहरे येथे डॉ. माधवी यांना दिल्याचे त्या अभिमानाने सांगतात. कुपोषित बालकांसाठी काम करत असताना, डॉ. माधवी यांनी महिला आणि तारुण्यात येणार्या मुलींना व्याख्यानांच्या माध्यमातून आरोग्याविषयी जागरुक करण्याचे काम केले. नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत अनेक विषयांवर डॉ. माधवी यांनी व्याखानांच्या आधारे समाज प्रबोधन केले आहे. यासोबतच त्र्यंबकेश्वर तालुयातील विविध पाड्यांवरदेखील डॉ. माधवी यांनी आरोग्यविषयक काम केले आहे. यामध्ये त्यांनी विविध आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना औषध देत त्यांच्या आरोग्याची समस्या दूर केली. लहान मुलांना जंतांचे औषध देणे, त्याच्या आरोग्याबाबत काही अडचणी असल्यास त्यांना ‘ड’ जीवनसत्त्वाबरोबरच इतर औषधांची त्या सातत्याने मदत करत असतात. आपल्या ‘योशिता बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्थे’च्या माध्यमातून यापुढे महिला, मुली तसेच लहान मुलांसाठी अजून खूप काम करण्याचा डॉ. माधवी यांचा मानस आहे. हे काम अगदी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत करणार असल्याचेही त्या सांगतात. वैद्यकीय आणि समाजकार्याच्या क्षेत्राबरोबरच डॉ. माधवी राजकीय क्षेत्रातही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपले नशीब आजमावत आहेत. पण, राजकीय क्षेत्रातही डॉ. माधवी यांनी आपल्या समाजकार्याचा वसा काही सोडलेला नाही. भाजपच्या वैद्यकीय आघाडीच्या उत्तर महाराष्ट्राच्या सहसंयोजकपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आलेली आहे. येथेही त्या नेटाने काम करत असून सर्वच क्षेत्रातील लोकांना शय होईल, तेवढी मदत करत असतात. विशेषकरून ‘कोविड’ महामारीच्या काळात त्यांच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी बजावली. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
विराम गांगुर्डे