(ना)लायकी

    30-Aug-2025
Total Views |

मोहम्मद रिझवी नावाच्या कुण्या एकाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या आईला शिवीगाळ करून आपली (ना)लायकी तर दाखवून दिलीच, मात्र ज्या लोकांच्या समवेत त्यांनी ही गलिच्छ भाषा वापरली, त्या नेत्यांच्या देशातील विकासासाठी काम करणाऱ्या सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काय काय भविष्यातील प्लॅन आहेत, याचादेखील उलगडा करून टाकला. लोकसभा निवडणुकीच्या काळात जसे यांनी खोटे ‘नॅरेटिव्ह’ पसरविले, तसाच यांचा हा अजेंडा असल्याचे एकूण या प्रकरणावरून दिसते.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर जी काही विकासकामे देशभरात दिसत आहेत, ज्या संकल्पना सरकार तरुणांसाठी अमलात आणत आहे, ज्यामुळे स्टार्टअप सुरू होऊन आपल्या देशातील बुद्धिमत्ता राष्ट्रविकासासाठी उपयुक्त ठरत असताना, अशा चांगल्या गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून हे विरोधी लोक जनतेची दिशाभूल करण्यात धन्यता मानत आहेत. ही शोकांतिका असली, तरी जनतेने यांना त्यांची योग्य जागा दाखवली, हेदेखील तितकेच खरे.

उगा नको त्या गोष्टींना हवा देत ती पेटवत राहणारे या देशात म्हणा गल्लोगल्ली आहेत. यांना समाजात कोणतेही प्रतिष्ठेचे स्थान नाही, मात्र केवळ प्रसिद्धी माध्यमांना हाताशी धरून हे लोक देशवासीयांना संभ्रमात ठेवण्यासाठीच कार्यरत आहेत. कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी ज्या आवेशात आजकाल बोलत आहेत, ते तर अत्यंत हास्यास्पद. सामान्य माणूस त्यांच्या बोलण्याची सहज खिल्ली उडवत आहे. तरीही या लोकांना देशातील प्रगतीचे, सामाजिक एकोप्याने दिसत असलेले वातावरणच बघवत नाही. त्यामुळे उठसूठ हे लोक अशी कामे करीत असतात. राहुल गांधी यांच्या आरोपात तथ्य नाही, हे खुद्द त्यांच्या निष्ठावान असलेल्या उरल्यासुरल्या मतदारांनादेखील ठावूक आहे, मात्र एखादी निवडणूक आली की, या लोकांना चेव येतो आणि यातून मग मोहम्मद रिझवीसारखे लोक गजाआड होतात. यातून साध्य काहीच होत नाही. नरेंद्र मोदी यांच्यावरील लोकांचा विश्वास यामुळे ढळत नाही, तर दृढ होतो, हे अनेकदा सिद्ध झाले. पण, काँग्रेसला आणि त्यांच्या चेलेचपाट्यांना कितीही वेळा तोंडावर आपटले, तरी अक्कल येणार नाही. हे गणराया, तूच यांना सुबुद्धी दे!!!

टोमणायकी

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात होऊ घातल्या आहेत. त्यामुळे येथील काही टोमणेबहाद्दरांनादेखील चेव येणार, हे वेगळे सांगायला नको. टोमणे या शब्दाचा समानार्थी शब्दच सध्या उबाठा. कारण, उबाठा आणि त्यांच्या नेत्यांनीही राज्यात त्यांचे टोमणे कौशल्य सिद्ध केले आहे. पण, मोहम्मद रिझवीसारखे नेते तर नित्य टीव्हीसमोर किंवा चारचौघांच्या सभेत बरळतच असतात. मात्र, या लोकांना कधी सरकारच्या विकासकामांवर बोलताना जनतेने बघितले नाही. जे काम सुरू आहे, त्यात राज्यहिताच्या दृष्टीने त्यांनी सरकारसोबत कधीही समोरासमोर चर्चा केल्याचे स्मरणात नाही. या राज्यात तर सुदैवाने अनेकदा मुख्यमंत्री म्हणून राहिलेले अनेक अनुभवी नेते आहेत, त्यांना प्रशासकीय कार्यपद्धतीचा तर आहेच, मात्र राज्यातील मूलभूत समस्यांचादेखील अभ्यास-अनुभव आहे, ‘जाणते नेते’ म्हणून ख्यात असलेल्या या लोकांनी कधीही सरकारच्या चांगल्या कामात लोकहिताच्या सूचना केल्याचे दिसले नाही. उलट जनतेसमोर जाऊन समृद्ध कामाची बदनामीच केली. आज याच समृद्धीमुळे कितीतरी लोकांची कामे सुलभ झाली आहेत, वेळेची बचत झाली. सौरऊर्जेमुळे शेतकरी वर्ग भरमसाठ वीजबिलातून हळूहळू मुक्त होत आहे. तरुणाई कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करीत असल्याने रोजगाराकडे वळू लागली आहे, मात्र सकाळी उठून काही भोंगे मोहम्मद रिझवीसारखे बेताल बोलत असतात, त्यांना आपणच खरे जनतेचे तारणहार आहोत, हे दाखवायचे असते. मात्र, पोलीस मोहम्मद रिझवीला अटक करून घेऊन जातात, हे या मूर्खांना कुणी सांगावे बरे?

आता एकेकाळी भोंग्यांना विरोध करणारेदेखील या भोंगेबहाद्दरांमध्ये सामील झाल्याने राज्यातील लोकांचे मनोरंजनच अधिक होत आहे. मालिका चित्रपट निर्माण करणार्यांना म्हणूनच जनता भाव देत नाही बहुदा. जाऊ द्या. आगामी निवडणूककाळात टोमणे ऐकायला जनता सिद्ध आहे. ना त्यांना या विरोधी लोकांच्या आरोपात रस आहे, ना त्याच्या कर्तृत्वावर. जे काही दिवे लावायचे होते, ते त्यांनी लावून पाहिले, मात्र जनतेने त्यांचा फ्यूज उडविला!

अतुल तांदळीकर