रुग्णांची परवड थांबणार कल्याण ग्रामीणमध्ये आरोग्यवर्धिनी दवाखाने ‘मुंबई तरूण भारत’ ने फोडली होती वाचा

03 Aug 2025 18:31:13

डोंबिवली : कल्याण ग्रामीणमधील 27 गावातील उसरघर, घारीवली आणि पिसवली या गावात आयुष्यमान आरोग्य मंदीर आरोग्य वर्धिनी दवाखान्यांचे लोकार्पण आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत व सुलभ प्राथमिक आरोग्य सेवा मिळणार असून आरोग्य केंद्र अभावी होणारी परवड थांबणार आहे.

‘दैनिक मुंबई तरूण भारत’ ने समस्यांचे गाव अंतर्गत सुरू केलेल्या मालिकेत आरोग्य केंद्रांची गैरसोय हा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. या मालिकेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू होती. परंतु आता कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी ग्रामीण आरोग्य सेवेसाठी पुढाकार घेतला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातून 27 गावे वगळण्याच्या मागणीसाठी 27 गाव संघर्ष समितीने 32 वर्षापूर्वी लढा सुरू केला. महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्या 12 वर्षात महापालिकेचे दोन वेळा तर गेल्या 32 वर्षात दोन वेळा असे एकूण 4 वेळा विभाजन झाले. दहा वर्षापूर्वी पून्हा एकदा महापालिकेत समाविष्ट झालेली 27 गावे वगळण्याची मागणी आज ही कायम आहे. गेल्या 32 वर्षात परिस्थिती बदलली आहे. मात्र आजही कल्याण डोंबिवली महापालिका विरूध्द 27 गावे हा वाद आज देखील सुरूच आहे. 27 गावात आरोग्य सुविधांचा वानवा असल्याचे दैनिक मुंबई तरूण भारत ने समस्यांचे गाव मालिकेतून प्रकाशात आणले. आडिवली, निळजे अशा हातावर मोजण्याइतक्या गावातच आरोग्य केंद्र आहे. आरोग्य केंद्रात ही सुविधाचा अभाव आहे. निळजे आरोग्य केंद्रात आसपासच्या गावातील नागरिक उपचारासाठी जातात. लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून तीन आरोग्यकेंद्राची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. काही गावात छोटेसे आरोग्य केंद्र ही आहे. पण त्यांचा वापर केवळ लसीकरणासाठी केला जातो. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात याकरिता आयुष्यमान आरोग्य मंदिर आरोग्यवर्धिनी दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्य विभाग उपायुक्त प्रसाद बोरकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल, डॉ. राठोड, राजाराम पावशे, पूजा गजानन पाटील, अजरुन पाटील, गजानन पाटील, विलास भोईर, सुभाष पाटील, जयेश माळी, मिनार पाटील आदी उपस्थित होते. आरोग्य वर्धिनी दवाखान्यांचे ग्रामीण कार्यालयात उद्घाटन झाल्याने नागरिकांना ही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तसेच ग्रामस्थांनी मुंबई तरूण भारत ने या विषयाला वाचा फोडली यासाठी त्यांचे ही आभार मानले.

Powered By Sangraha 9.0