तरूणाईला व्यसनधीनतेपासून लांब ठेवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज- डॉ. कृष्णा भावले

03 Aug 2025 21:25:59

कल्याण, आदीवासी आणि ग्रामीण भागात व्यसनधीनतेचे प्रमाण वाढत आहे. तरूण पिढीमध्ये देखील व्यसनधीनतेचे प्रमाण अधिक आहे असे दिसून येत आहे. तरूण पिढीला व्यसन लागूच नये याकरिता शाळा आणि महाविद्यालयीन जीवनात जनजागृती केली पाहिजे. तरूण या व्यसनधीनतेकडे वळले आहेत. त्यांचा आजार समजून घेऊन त्यांना त्यातून बाहेर काढले पाहिजे, असे मत डॉ. कृष्णा भावले यांनी व्यक्त केले.

सहयोग सामाजिक संस्था आणि निलेश शिंदे फाउंडेशन यांच्यातर्फे दारू मुक्त घर दारू मुक्त कल्याण पूर्व करण्यासाठी नशामुक्ती शिबीर रविवारी आयोजित केले होते. यावेळी डॉ. भावले बोलत होते. निलेश शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात या शिबीराचे आयोजन केले होते. निलेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पहिला डोस पूर्णपणो मोफत देण्यात आला. सहयोग सामाजिक संस्थेचे विजय भोसले यांच्या पुढाकाराने हे शिबीर भरविण्यात आले. या शिबीरासाठी नागरिकांनी चांगली उपस्थिती लावली होती.

डॉ. भावले म्हणाले, महाराष्ट्र, गुजरात,मध्यप्रदेश अशा विविध ठिकाणी गेल्या १४ वर्षापासून काम करत आहे. गुजरात राज्यात सुरत शहरात पाच वर्षापासून काम केले आहे. मध्यप्रदेशमध्ये ही काम सुरू आहे. सातपुडा पर्वत मध्ये ४४ हजार आदीवासीसाठी काम सुरू आहे. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, धुळे , नंदुरबार येथे ही सतत काम सुरू आहे. मागच्या १४ वर्षापासून २ लाखापेक्षा जास्त लोकासोबत काम केले आहे. रोहिणी गाव व्यसनमुक्त करण्यात आम्हाला यश आले आहे. व्यसन हा शारिरिक आणि मानसिक दोष आहे. त्या व्यक्तीकडे आजारी म्हणून पाहावे. तो व्यक्ती व्यसनधीनतेतून बाहेर पडेल तर कुटुंब ही बाहेर पडू शकते. आर्थिक परिस्थिती नाही त्यांना उपचार देऊन बाहेर काढणो गरजेचे आहे. ग्रामीण भागात व्यसनधीनतेतून बाहेर काढणारे हात सुध्दा नाही. त्या कुटुंबांसाठी आम्ही काम करतो असे त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0