या लेखमालेच्या निमित्ताने दर आठवड्याला अनेक वाचक आवर्जून फोन करतात, मेसेज करतात, आपली मतं, मंदिरांमध्ये आवडलेल्या गोष्टी, त्यांना आलेले अनुभव, असे सगळे काही माझ्यासमोर मांडतात. त्याचबरोबर त्यांना अजून कुठल्या मंदिरांबद्दल जाणून घ्यायला आवडेल? हेदेखील हक्काने सांगतात. मागच्या काही आठवड्यांमध्ये वाचकांनी कंबोडिया देशातल्या ‘अंगकोर वाट’ या मंदिराबद्दल आम्हाला वाचायला आवडेल, असे सांगितले. या वाचक मंडळींच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी आजचा लेखनप्रपंच.
धारण दोन हजार वर्षांपूर्वी भारताच्या आग्नेय बाजूला असणार्या वेगवेगळ्या भूभागांमध्ये भारतीय संस्कृती रुजू लागली. त्या लोकांच्या हातात रामायण आले, महाभारत आले. भारताच्या सांस्कृतिक सीमारेषा सुवर्णद्वीपापर्यंत वाढल्या. तिथल्या लोकांनी भारतीय संस्कृतीचे पैलू हे फक्त आपलेसे केले नाहीत, तर ते या संस्कृतीशी एकरूप झाले. अतिशय अभिमानाने ही संस्कृती ते जगाला दाखवतात. या स्वीकारलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा देशाच्या वेगवेगळ्या भागात आहेत. पण, त्यातली सर्वांत मोठी खूण म्हणजे जगातले सर्वांत मोठे हिंदू मंदिर ‘अंगकोर वाट.’
कंबोडिया देशात साधारण हजार वर्षांपूर्वी ख्मेर नावाचे राजघराणे राज्य करत होते. यांच्यातला एक अत्यंत महत्त्वाचा राजा म्हणजे सूर्यवर्मन दुसरा. या सूर्यवर्मनाच्या काळात जलव्यवस्थापन, नगरव्यवस्थापन, व्यापार आणि मंदिरनिर्मिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली. आजही नगरव्यवस्थापन आणि जलव्यवस्थापन यांचे अध्ययन तिथे आपल्याला करता येते. अतिशय समृद्ध अशा या साम्राज्याच्या काळात सियाम रीप या गावात सर्वांत मोठ्या हिंदू मंदिराची निर्मिती झाली. भगवान विष्णुला अर्पण केलेले हे मंदिर आज जरी ‘अंगकोर वाट’ या नावाने ओळखले जात असले, तरी त्याचे प्राचीन नाव ‘परमविष्णुलोक’ असे होते. आपल्या ब्रह्मांडाचा केंद्रबिंदू समजल्या जाणार्या मेरू पर्वतासारखी रचना या मंदिराच्या स्थापत्याची आहे. इथल्या मंदिर स्थापत्यावर भारताच्या दक्षिणेला असणार्या द्राविड स्थापत्य शैलीचा मोठा प्रभाव दिसून येतो. या जागेचे महत्त्व लक्षात घेऊन १९९२ सालीच मंदिराचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला.
साधारण अडीचशे फुटबॉलची मैदाने बसतील, एवढ्या भव्य जागेमध्ये (१६२.६ हेटर) या मंदिराची रचना केलेली आहे. २०० मीटर रुंद आणि १ हजार, ५०० मीटर लांब असा खंदक चारही बाजूंनी बांधलेला आहे. तो ओलांडून आपण मंदिराच्या प्रकारात (परिसरात) प्रवेश करतो. इथल्या सर्व बांधकामांसाठी वालुकाश्म वापरलेला आहे. आपण चालत चालत त्या भव्य मंदिराकडे प्रवास सुरू करतो. वाटेत डावीकडे आणि उजवीकडे त्याकाळी वापरली जाणारी ग्रंथालये दिसतात, त्यांच्या समोरच दोन मोठे पाण्याचे साठेदेखील आहेत. या पाण्याच्या साठ्यात त्या मंदिरांचे प्रतिबिंब अतिशय सुंदर दिसते. अवकाशशास्त्राचा अभ्यास करून या मंदिराची रचना केलेली आहे, त्यामुळे साधारण जून महिन्यात मध्यभागी असणार्या सर्वांत उंच शिखराच्या बरोबर पाठीमागून सूर्योदय अनुभवता येतो. हे दृश्य बघायला जगभरातून हजारोंच्या संख्येने पर्यटक, अभ्यासक, छायाचित्रकार इथे येतात. हे मंदिर तीन थरांमध्ये निर्माण झालेले असून, गर्भगृह असणार्या अगदी वरच्या थरापर्यंतदेखील आपल्याला जाता येते. सर्वांत वरचा थर हा निमुळत्या उंच पायर्यांनी खालच्या थराबरोबर जोडलेला आहे. मंदिराचे मुख्य शिखर हे ६५ मीटर उंच आहे. त्यावरदेखील वेगवेगळी शिल्पं आपल्याला बघता येतात. या संपूर्ण भागात अप्सरांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिरावर १ हजार, ५०० पेक्षा जास्त वेगवेगळ्या अप्सरा कोरलेल्या आपल्याला दिसतात. यांची केशभूषा, वेशभूषा अतिशय वेगळी आणि आकर्षक आहे. त्या गावात होणार्या सांस्कृतिक नृत्य सभेमध्ये आजही तशाच पद्धतीची वेशभूषा करून नृत्यांगना अप्सरा नृत्य सादर करतात आणि मंदिरातली दगडी शिल्प आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतात.
अंगकोर मंदिराच्या चारही बाजूने सर्वांत खालच्या थरात वेगवेगळ्या शिल्पकथा (स्कल्पचर पॅनल) कोरलेल्या आहेत. ४० ते ५० मीटर लांब भिंतीवर ही पॅनेल कोरलेली आपल्याला दिसतात. इथल्या शिल्पांचे एक वेगळेपण म्हणजे, शिल्पांमधला उठाव अत्यंत कमी असून बारकाईने ही शिल्पं बघावी लागतात. मंदिराच्या चारही बाजूंना रामायण, महाभारत, समुद्रमंथन, देवता-दानव युद्ध, श्रीकृष्ण आणि बाण यांचे युद्ध, स्वर्ग आणि नरक, सूर्यवर्मनाने केलेल्या स्वार्या, अशा विषयांशी निगडित पॅनेल आपल्याला दिसतात. यातल्या काहींचा परिचय आपण इथे करून घेऊयात.
मंदिराच्या दक्षिण दिशेला गॅलरीमध्ये समुद्रमंथनाचे पॅनेल आहे. मधोमध मंदार पर्वत असून, वासुकी नागाचा वेटोळा हा त्याच्याभोवती असलेला दिसतो. नागाच्या चेहर्याच्या बाजूला ९२ असून शेपटीच्या बाजूला ८८ देवता कोरलेल्या दिसतात. मधोमध विष्णु असून पर्वत सागरामध्ये बुडू नये, म्हणून खालून पर्वताला आधार देतानादेखील कोरलेला आहे. मंदिर स्थापत्याच्या मोठ्या अभ्यासक विदुषी स्टेला क्रायमरीश यांनी त्यांच्या अभ्यासात समुद्रमंथनाचे हे शिल्प कालचक्र म्हणून कसे दिसते, हे दाखवून दिलेले आहे.
मंदिराच्या पश्चिमेला स्वर्ग आणि नरक यांचे पॅनेल आहे. मृत्यूपश्चात आत्मा कुठल्या अवस्थेतून प्रवास करतो, हे इथे दाखवले आहे. या पॅनेलसाठी स्थपतींनी गरुड पुराणाचा वापर केलेला दिसून येतो. यम प्रत्येकाचा निवाडा करून त्याला चित्रगुप्ताकडे पाठवतो आणि चित्रगुप्त काही लोकांना स्वर्ग आणि काही लोकांना नरक या ठिकाणी पाठवतो. यमदूत या लोकांना घेऊन तिकडे निघाले आहेत, नरकात जाताना लोकांच्या वेदना, तिथून बाहेर पडायची खटपट आणि तिथल्या शिक्षा या सर गोष्टी अतिशय विस्तृत तिथे कोरलेल्या आहेत. उसने पैसे घेऊन परत न देणे, खोटं बोलणे इत्यादी गोष्टींसाठी या शिक्षा केलेल्या आहेत.
अंगकोर वाट मंदिराची भेट हा आपल्याला समृद्ध करणारा अनुभव आहे. इथे राज्य करणार्या राजघराण्यांनी अनेक मंदिरांची निर्मिती केली. ‘बयॉन’, ‘ता प्रोह्म’, ‘बांते स्रि’ इत्यादी भव्य मंदिरे बांधली. ता प्रोह्म हे मंदिर सुप्रसिद्ध ‘टॉम्ब रायडर’ या हॉलिवूड चित्रपटात दिसते. हिंदू धर्माबरोबर बौद्ध धर्मालादेखील ख्मेर साम्राज्याने मोठ्या प्रमाणात दान दिले, राजाश्रय दिला. इथे भव्य सरोवरे आहेत, घनदाट जंगले आहेत, उंच डोंगरावर वाहणार्या नदीत सहस्रलिंग कोरलेले आहेत. आधुनिक युद्ध, अमानुष हुकूमशहा यामध्ये हा देश होरपळला गेला, तरीही आपली ओळख विसरलेला नाही. लाखोंच्या संख्येने सियाम रीप गावाच्या परिसरात अमेरिकेने भूसुरंग पेरले, त्यात लोकांनी आपले हातपाय गमावले, हीच लोकं मंदिराच्या बाहेर आपले संगीत सादर करून उपजीविका करतात.
सप्टेंबर ते फेब्रुवारी या काळात इथले वातावरण फिरण्यासाठी छान असते. इथे शुद्ध शाकाहारी हॉटेल्स पण आहेत, राहण्याची उत्तम सोयदेखील आहे. २०२४ साली अंदाजे २० लाख भारतीय पर्यटक थायलंडमध्ये भेट देण्यासाठी गेले. तिथून तासभर विमान प्रवास करून पोहोचू शकतो. अशा कंबोडियामध्ये फक्त ६८ हजार भारतीय पर्यटक गेले. आपणच आपल्या प्राथमिकतेचा विचार करणे गरजेचे आहे. भारताचा सांस्कृतिक सेतू असलेला हा देश आपली वाट बघतो आहे. तयारी करा आणि नक्की भेट द्या.
७८४१९३४७७४
इंद्रनील बंकापुरे