समरसता म्हणजे समतेच्या दिशेने सुरू असलेला ज्ञानयज्ञ!

03 Aug 2025 13:21:20

नांदेड : " समरसतेचा विचार हा माणसांना जोडणारा विचार आहे. समरसता म्हणजे समतेच्या दिशेने सुरू असलेला ज्ञानयज्ञ आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. " असे प्रतिपादन ज्येष्ठ प्राचार्य कमलाकर कांबळे यांनी केले. नांदेड येथे आयोजित केलेल्या २० व्या समरसता साहित्य संमेलनातील एका परिसंवादात ते बोलत होते.

दि. २ ऑगस्ट रोजी, नांदेडच्या श्री गुरुगोविंद सिंगजी साहित्यनगरी येथे २० वे समरसता साहित्य संमेलनाचा पहिला दिवस संपन्न झाला. यावेळी इथे वेगवेगळ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. " वंचितांचे नव्वदोत्तरी साहित्य " या विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते ज्याचे अध्यक्ष स्थान ज्येष्ठ प्राचार्य कमलाकर कांबळे यांनी भूषवले. यावेळी त्यांनी समरसता आणि मराठी साहित्य या विषयावर भाष्य केले. सदर परिसंवादात विजय तुंटे यांनी दलित उपेक्षित समाजातील आत्मकथने या विषयावर विचार मांडले. आपले मत मांडताना ते म्हणाले की आत्मकथन सजीव असतात, त्यांच्या माध्यमातून एक सामाजिक भान आपल्या भवताला प्राप्त होतं. एकविसाव्या शतकातील वेगवेगळ्या आत्मकथनांच्या माध्यमातून आपल्याला केवळ व्यक्तीचेच जीवन कळते असे नाही तर, या चरित्रांच्या माध्यमातून सभोवतालाची विस्तारित जाणीव होते. " लेखक जयेश मेस्त्री यांनी " नव्वदोत्तर काळातील चित्रपट, कथा, नाटक इत्यादी माध्यमातून दलित वंचित व महिलांचे चित्र " यावर भाष्य केले. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की समाजमाध्यमांमुळे वंचित समूहाचा आवाज बुलंद झाला. मराठीमध्ये पूर्वीपासूनच एक समांतर चित्रपटांचा प्रवाह होता ज्या माध्यमातून एक सशक्त अभिव्यक्ती पुढे आली. आजमीतिला समाजाला एकत्र जोडून ठेवणारे साहित्य कलाकृती निर्माण होणे आवश्यक आहे. "

लेखिका माया रंभाळे यांनी नव्वदोत्तरी साहित्यातील दलित वंचित काव्याचे बदलते रूप या विषयावर भाष्य केले. यावेळी साहित्यविश्वात उत्तर आधुनिक काळात कवितेचा उमटलेला नवा सूर, त्याला आलेलं वर्डरात्मक अस्तित्ववादी वळण, त्याचबरोबर लैंगिक जागरूकता आणि भान विषयावर केलेलं भाष्य याबद्दल आपले विचार मांडले.
Powered By Sangraha 9.0