राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू असून, येत्या विजयादशमीला (दि. २ ऑटोबर २०२५) संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. संघ स्थापनेपासून या संघटनेने सातत्याने विस्तार, संघटनात्मक बळकटी करून आपला प्रभाव वाढवला. ज्यामुळे निश्चितच लोकांमध्ये संघकार्याबद्दल जाणून, समजून घेण्याची उत्सुकता वाढली. संघाला समजायचे असेल, तर सर्वप्रथम रा. स्व. संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना समजून घेणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी तरुणाईला समजेल आणि उमजेल अशा स्वरूपात डॉटरांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘अक्षय शेट्टी प्रोडशन’ प्रस्तुत ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के जनक डॉ. हेडगेवार’ हा चित्रपट आपल्या भेटीला आला आहे. गेल्या शुक्रवारीच याचा प्रीमिअर शो मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानिमित्ताने...डॉ.हेडगेवार हे एक महान राष्ट्रभक्त तर होतेच; त्यासोबतच त्यांनी भारताच्या राष्ट्रजीवनात नवचैतन्यही निर्माण केले आणि राष्ट्रभक्तीची दीपज्योतदेखील सामान्य जनतेत जागवली. ब्रिटिश सत्तेविरोधातील कार्यातून त्यांनी जाणले की, केवळ शस्त्रक्रांती पुरेशी नाही, तर समाजरचनेतच राष्ट्रप्रेमाची सुदृढ पायाभरणी करणे तितकेच गरजेचे आहे. डॉटरांचे हे विचार या चित्रपटात सुरुवातीपासूनच पाहायला मिळतील. ज्येष्ठ लेखक, पत्रकार ना. ह. पालकर यांनी लिहिलेल्या ‘डॉ. हेडगेवार’ यांच्या या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे.
चित्रपटाचे निर्माते जयानंद श्याम शेट्टी यांनी स्वतः चित्रपटात डॉ. हेडगेवारांची भूमिका साकारली आहे. त्यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलल्याचे चित्रपट पाहताना दिसून येते आणि जयानंद शेट्टी यांच्याच संकल्पनेतून हा चित्रपटदेखील उभा राहिला आहे. आजच्या ‘जेन-झी’ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय आहे? त्याचे संस्थापक डॉ. हेडगेवार हे किती महान व्यक्तिमत्त्व होते, हे सहसा ठावूक असण्याची शक्यता तशी कमीच. ही बाजू शेट्टींनी ओळखली आणि त्या अनुषंगाने चित्रपटाची सुरुवात आजोबा आणि नातवातील गोष्टस्वरूपी संवादाने चित्रीत केली आहे. ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी हे त्या आजोबांच्या भूमिकेत आहेत, जे आपल्या नातवाला संघ काय आहे आणि संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे कार्य किती अफाट होते, याविषयी सांगतात. म्हणजे अगदी आताचा ‘कोरोना’ आणि तेव्हाचा ‘प्लेग’ अशी काही उदाहरणे देऊन नातवाला कळेल, समजेल अशा पद्धतीने हा संवाद रंगलेला दिसतो.
डॉ. हेडगेवार यांचा दृष्टिकोन व्यापक, दूरदृष्टीचा होता, जो त्यांना त्यांच्या समकालिनांपेक्षा वेगळे ठरवतो. या काळात अनेक आध्यात्मिक आणि सामाजिक संघटना उदयास आल्या, ज्यांनी भारताच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. संघाची स्थापना पूर्णपणे या मोठ्या चळवळीशी सुसंगत होती. तथापि, स्थापनेपासूनच हे स्पष्ट होते की, संघ केवळ समाजात एक छोटे संघटन म्हणून काम करणार नाही, तर संपूर्ण हिंदू समाजाचे मूर्त स्वरूप म्हणून काम करेल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे या दोघांचीही हिंदुत्वासाठीची भरीव कामगिरी असल्याने, ते दोघेही डॉटरांच्या आदर्श स्थानी होते. चित्रपटात डॉ. मुंजे यांची भूमिका प्रफुल्ल गवास यांनी साकारली आहे, तर तात्याराव म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका संतोष हिरासिंघानी यांनी साकारली आहे. दोघांनीही आपापल्या भूमिका उत्तम वठविल्या आहेत. चित्रपटात आपण पाहिले, तर डॉ. हेडगेवार बालवयात ‘केसरी’ वृत्तपत्र वाचताना दिसतात. म्हणजे इंग्रजांविरोधी, पारतंत्र्याच्या विरोधी आक्रमकतेची भूमिका ही टिळकांच्या प्रेरणेतून डॉटरांमध्ये आली, हे यावरून कळते. लोकमान्य टिळक हे डॉ. मुंजे यांचे राजकीय गुरू होते. एकीकडे समाजकार्य चालू असताना त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी महत्त्वाची भूमिकादेखील बजावली. १९२० साली असहकाराचे पर्व सुरू झाले. पण, गांधीजींच्या असहकार तत्त्वावर डॉ. मुंजे यांचा अजिबात विश्वास नव्हता. गांधींच्या अव्यवहार्य अहिंसा धोरण व खिलाफत आंदोलनातील मुस्लीम तुष्टीकरणाला विरोध करून डॉ. मुंजे यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली.
चित्रपटातील संवाद अत्यंत बोलके आणि डॉटरांच्या राष्ट्रप्रखर भूमिकेला साजेसे असेच आहेत. त्यांच्या शब्दांना असलेली धार यातून दिसून येते. डॉटरांना जेव्हा अटक झाली होती, तेव्हाचा एक प्रसंग चित्रपटात आहे. एका धर्मांध कैद्याने तुरुंगात गोमांस शिजते आहे, म्हणून आनंद व्यक्त केला होता. त्यावरून एक हिंदू कैदी त्याच्यावर धावून गेला. धर्मांध कैदी म्हणाला, "हम किसी से नहीं डरते.” तेव्हा डॉ. हेडगेवार दोघांच्या मध्ये पडले आणि त्यावेळी डॉक्टरांनी त्या कैद्याला दिलेले उत्तर खरच विचारप्रवृत्त करणारे होते. ते त्या धर्मांधाला उद्देशून म्हणाले, "अगर तुम्हारे पूर्वज नहीं डरते तो हिंदू होते!” एकूणच चित्रपटातले संवाद लेखकाने तितयाच प्रखरतेने लिहिले आहेत, यात शंका नाही.
चित्रपटाची पटकथा अप्रतिम असली, तरी डबिंगमधील सुधारणेला निश्चितच वाव होता. मात्र, जयानंद शेट्टींसारख्या एका स्वयंसेवकाने समर्पणाच्या भावनेतून हा चित्रपट उभा केला असल्याने, हे बारकावे दुर्लक्षित करणे कदापि योग्य. चित्रपटाचे संगीत ऐकल्यास प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही, इतया तोडीचे ते आहे. अनुप जलोटा, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, शंकर महादेवन, अमोल बावडेकर, अवधूत गुप्ते या आणि अशा अनेक दिग्गजांचे स्वर या चित्रपटाला लाभले आहेत. संजयराज गौरीनंदन यांचे संगीत आहे. डॉटरांची हूबेहूब वेशभूषा साकारल्याने चित्रपट आणखी जिवंत झाल्याचा आभास होतो.
चित्रपटाच्या शेवटी डॉटरांचे देहावसान होण्याचे दुःख त्या नातवालाही होताना दाखवले आहे. तेव्हा नातू आणि आजोबा, अर्थात मोहन जोशी यांच्यातील संवाद भावनिक वातावरण तयार करतो. त्यात असे म्हटले आहे, "डॉटर शरीराने आपल्यात नसले, तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपात आजही आपल्यातच आहेत.” चित्रपटाचा समारोप ‘पद्मश्री’ शंकर महादेवन यांच्या गीताने केल्याने प्रेक्षक शेवटपर्यंत खुर्चीला चिकटून राहतो, यात वादच नाही. डॉ. हेडगेवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांनाही संघ शताब्दी वर्षात जाणून घ्यायचे असेल, तर हा चित्रपट प्रत्येकाने नक्की पाहावा.
संकल्पना व निर्माता : जयानंद श्याम शेट्टी
पटकथा व दिग्दर्शन : राधास्वामी अवुला
लेखक : विद्यासागर अध्यापक, मकरंद सावंत, राजेंद्र तिवारी
कलाकार : डॉ. हेडगेवार : जयानंद श्याम शेट्टी
माधव सदाशिव गोळवलकर (श्रीगुरुजी) : शीव
लक्ष्मीबाई केळकर : डिंपल कलशन
कथावाचक : मनोज जोशी
महात्मा गांधी : मुकुंद वासुले
लोकमान्य टिळक : रंजीत रांदिवे
स्वातंत्र्यवीर सावरकर : संतोष हिरासिंघानी
सुभाषचंद्र बोस : प्रेमचंद