पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींविषयी अपशब्द वापरणे हे विरोधकांचे नैतिक अध:पतन - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा घणाघात

29 Aug 2025 19:26:09

नवी दिल्ली,
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वर्गीय मातोश्रींबद्दल केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. विरोधकांनी वैयक्तिक पातळीवर केलेली ही टीका केवळ निंदनीय नाही तर सार्वजनिक जीवनातील अध:पतनाचे उदाहरण आहे. अशा वक्तव्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान, त्यांच्या दिवंगत मातोश्री व देशाच्या जनतेची माफी मागावी, असे त्यांनी म्हटले आहे.

आज जगभरात भारताबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान वाढला आहे. तब्बल २७ देशांनी मोदींना आपल्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले असून हा भारतासाठी मोठा अभिमानाचा विषय आहे. एका बाजूला जग पंतप्रधान मोदींचा गौरव करत असताना दुसऱ्या बाजूला मुख्य विरोधी पक्षाचे नेते द्वेष, तिरस्कार आणि नकारात्मक राजकारणाचा मार्ग अवलंबत आहेत.

बिहारमधील एका कार्यक्रमात मोदींच्या स्वर्गीय मातोश्रींबाबत अपमानास्पद वक्तव्य करून विरोधकांनी अत्यंत घृणास्पद कृत्य केले आहे. हे केवळ निंदनीय नसून सार्वजनिक जीवनाला गर्तेत नेणारे आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून विरोधकांकडून सतत अपशब्दांचा मारा होत आला आहे. मात्र अशा भाषेचा उपयोग करून जनादेश मिळवता येणार नाही. प्रत्येक निवडणुकीत अपमानास्पद भाषेचा अवलंब करून विरोधकांना पराभवाचा सामना करावा लागला, तरी त्यांनी काही धडा घेतलेला नाही, असे शाह यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींनी गरीबी असतानाही आपल्या मुलांना संस्कारित केले आणि त्यांना इतक्या उंचीवर नेले की त्यांचा पुत्र आज जगाचा नेता बनला आहे. अशा जीवनाचा अपमान भारताची जनता सहन करणार नाही. हे सार्वजनिक जीवनातील सर्वात मोठे अध:पतन आहे, असे ते म्हणाले.


Powered By Sangraha 9.0