आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची IMF च्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती

29 Aug 2025 14:58:22

नवी दिल्ली : (Urjit Patel Appointed As Executive Director of IMF) भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. २०१६ मध्ये रघुराम राजन यांच्या जागी ऊर्जित पटेल आरबीआयचे २४ वे गव्हर्नर पदभार स्वीकारला होता. परंतु, वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच २०१८ मध्ये राजीनामा दिला होता.

पटेल यांच्या कार्यकाळात अनेक महत्तवाचे निर्णय घेण्यात आले. त्यांच्याच कार्यकाळात केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदीसारखा मोठा निर्णय घेतला. उर्जित पटेल यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच पटेल यांनी महागाई नियंत्रित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी आरबीआयसाठी ४% ची महागाई मर्यादा निश्चित केली होती. ही मर्यादा लक्ष्य म्हणून ठेवून, मध्यवर्ती बँकेने आपले चलनविषयक धोरण राबविण्याचा निर्णय घेतला. उर्जित पटेल यांच्या अहवालाच्या आधारे, भारताने ४% सीपीआय (ग्राहक किंमत निर्देशांक) महागाई दर लक्ष्य म्हणून स्वीकारला होता.

आरबीआय गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी उर्जित पटेल यांनी मध्यवर्ती बँकेत डेप्युटी गव्हर्नर म्हणूनही काम केले. या काळात त्यांनी चलनविषयक धोरण, आर्थिक धोरण संशोधन, सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन, ठेव विमा आणि माहितीचा अधिकार यासारखे अनेक महत्त्वाचे विभाग हाताळले. 
डॉ. उर्जित पटेल यांची कारकीर्द केवळ आरबीआयपुरती मर्यादित नाही, तर त्यांचा अनुभव आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही पातळ्यांवर बराच विस्तृत आहे.

पटेल यांनी यापूर्वी पाच वर्षे आयएमएफमध्ये काम केले आहे. त्यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये आणि नंतर १९९२ मध्ये नवी दिल्लीमध्ये आयएमएफचे उपनिवासी प्रतिनिधी म्हणून काम केले. याव्यतिरिक्त, ते १९९८ ते २००१ पर्यंत अर्थ मंत्रालयाचे सल्लागार देखील होते. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज, आयडीएफसी लिमिटेड, एमसीएक्स लिमिटेड आणि गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशन सारख्या सार्वजनिक आणि खाजगी कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम केले आहे.




Powered By Sangraha 9.0