मुंबई : आसामच्या धुबरी जिल्ह्यात जून महिन्यात सांप्रदायिक तणावामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी धुबरी जिल्ह्यात रात्रीच्या वेळी शूट-ॲट-साईटचा थेट आदेश दिला. तोच आता दुर्गापूजा पर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोकराझार येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की हा निर्णय खबरदारी म्हणून घेतला आहे, जेणेकरून धुबरीमध्ये शांतता टिकून राहील आणि तेथील सनातन धर्मीय अल्पसंख्याकांना कट्टरपंथीयांपासून संरक्षण मिळेल.
सध्या जिल्ह्यातील परिस्थिती शांत आहे आणि कोणतीही नवी हिंसक घटना घडलेली नाही. परंतु, जर कोणी अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट ईशारा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडून देण्यात आला आहे. त्यांच्या मते सीमेवर वसलेल्या संवेदनशील जिल्ह्यात काही सांप्रदायिक शक्ती वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना रोखणे अत्यावश्यकच आहे.