मुंबई: (Reliance Industries AGM 2025) रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ४८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित करताना जिओचा आयपीओ पुढच्या वर्षी म्हणजेच २०२६ च्या पहिल्या सहामाहीत येणार असल्याची माहिती दिली.
यावेळी बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, "मला अभिमान आहे की जिओ आपल्या आयपीओसाठी अर्ज करण्याच्या तयारीत आहे. आमचे लक्ष्य २०२६ च्या पहिल्या सहामाहीत जियोला सूचीबद्ध करणे आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की, जिओ आपल्या जागतिक प्रतिस्पर्धांप्रमाणेच मूल्यनिर्मिती करेल. ही गुंतवणूकदारांसाठी अत्यंत आकर्षक संधी ठरेल, याची मला खात्री आहे."
यावेळी अंबानी यंनी स्पष्ट केले की, रिलायन्स जिओने आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. कंपनीच्या ग्राहकसंख्येने ५० कोटींचा आकडा पार केला आहे. भागधारक आणि ग्राहकांचे आभार मानताना मुकेश अंबानी म्हणाले की, "जिओने अनेक अकल्पनीय गोष्टी केल्या आहेत. ज्यामध्ये व्हॉईस कॉल मोफत करणे, डिजिटल पेमेंटच्या पद्धती बदलणे, आधार, यूपीआय, जनधनसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना वाव देणे आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या स्टार्टअप इकोसिस्टमचा कणा बनणे यांचा समावेश आहे."