एका दिवसात हनुमानजींच्या नऊ प्रतिमा चोरीला! मंदिरांचे संरक्षण करण्याबाबत फिजी सरकारला हिंदूंचे आवाहन

29 Aug 2025 17:41:17

मुंबई : फिजी या देशात हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले आणि देवप्रतिमांच्या सतत होणाऱ्या चोरीच्या घटना यामुळे येथील सांस्कृतिक सहिष्णुतेच्या बिघडत चाललेल्या परिस्थितीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. हा केवळ स्थानिक हिंदू समाजासाठीच चिंतेचा विषय राहिलेला नाही. एका दिवसात हनुमानजींच्या नऊ प्रतिमा चोरीला जाण्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

अनेक हिंदू संघटनांनी या घटनांचा तीव्र निषेध करताना सरकारला हिंदू व त्यांच्या मंदिरांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. वर्ल्ड हिंदू फेडरेशनने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. या घटनाक्रमानंतर फिजी सरकारही हालचालीला लागली असून तिने काहीशी कडक भूमिका घेतली आहे.

फिजीमधील हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले ही काही नवी बाब नाही, परंतु गेल्या काही दिवसांपासून वारंवार असे घडणे हा चिंतेचा विषय झाला आहे. एका मंदिरात स्थापित ७० वर्षे जुनी हनुमानजींची प्रतिमा एका रात्रीत गायब झाली. यापूर्वी समबुला शिव मंदिरातील १०० वर्षे जुन्या मूर्तींची विटंबना करण्यात आली होती. या घटना दर्शवतात की पंथिक असहिष्णुतेचे हे प्रकार एखाद्या व्यक्तीचा केवळ क्षणिक आक्रोश नसून त्यामागे काहीतरी सुनियोजित कारस्थान आहे.

भारताने नेहमीच प्रवासी भारतीयांच्या सुरक्षेला व सांस्कृतिक अधिकारांना प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या 'वसुधैव कुटुंबकम्' या धोरणांतर्गत भारताने अनेकदा परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या हितांचे संरक्षण केले आहे. फिजीमधील हिंदू मंदिरांवरील हल्ले ही एक गंभीर चेतावणी आहे की पंथिक सहिष्णुता केवळ कायद्यांनीच नव्हे, तर सामाजिक जागरूकता आणि राजकीय इच्छाशक्तीनेही जपली पाहिजे.

वर्ल्ड हिंदू फेडरेशनचा पुढाकार आणि भारताची प्रतिक्रिया यामुळे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. आता फिजी सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी दिलेल्या 'शून्य सहिष्णुता' या वचनाची अंमलबजावणी करून दोषींना शिक्षा मिळवून द्यावी.


Powered By Sangraha 9.0