म्हाडा कोकण मंडळ अर्ज सादरीकरणासाठी मुदतवाढ ; १२ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार

29 Aug 2025 15:40:14

मुंबई, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे आयोजित सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला दि. १२ सप्टेंबरपर्यंत दुसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अनामत रकमेसह प्राप्त पात्र अर्जांची सोडत आता दि. ९ ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.

नवीन वेळापत्रकानुसार या सोडतीसाठी दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत आहे. दि. १३ सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करता येणार आहे. दि. १५ सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत आरटीजीएस/एनईएफटीद्वारे अर्जदारांना बँकेत अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे.

सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी दि. २२ सप्टेंबर, रोजी सायंकाळी ६ वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी दि. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता 'म्हाडा'च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. ९ ऑक्टोबर रोजी सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३००२ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १६७७ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणार्‍या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दि.१५ जुलै रोजी 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या शुभहस्ते सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. मंडळातर्फे पहिल्यांदा दि.२८ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यास अर्जदारांना मुदतवाढ देण्यात आली होती.


Powered By Sangraha 9.0