नवी दिल्ली, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी टोकियो येथे झालेल्या भारत-जपान आर्थिक मंचात सहभाग घेतला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी अधोरेखित केले की भारत सध्या जागतिक आर्थिक वृद्धीत जवळपास १८ टक्के योगदान देत आहे आणि काही वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत-जपान सहकार्याचा विस्तार दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
यावेळी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आणि केइडनरेन (जपान बिझनेस फेडरेशन) यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या बैठकीत दोन्ही देशांतील प्रमुख उद्योगपती, इंडिया-जपान बिझनेस लीडर्स फोरमचे सीईओ आणि आघाडीच्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत-जपान विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारीचे महत्व अधोरेखित केले. गुंतवणूक, उत्पादन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतील सहकार्यामुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले. जपानी कंपन्यांना भारतात अधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन करताना मोदी म्हणाले की, भारताची आर्थिक वाढ ही जपानी उद्योगांना नवीन संधी उपलब्ध करून देणारी आहे. सध्याच्या जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर विश्वासू मित्रदेशांमधील भागीदारी अधिक महत्त्वाची ठरते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी सांगितले की, भारतातील राजकीय स्थिरता, धोरणांची निश्चितता, सुधारणांबद्दल सरकारची कटिबद्धता आणि ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’मुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. याचाच परिपाक म्हणून आंतरराष्ट्रीय क्रेडिट एजन्सीजनी भारताच्या रेटिंगमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणुकीसाठी भारत हा सर्वात विश्वासार्ह व आकर्षक गंतव्यस्थान बनत असल्याचे मोदी यांनी ठामपणे नमूद केले.
दरम्यान, जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी भारतीय कौशल्य व जपानी तंत्रज्ञान यांची सांगड घालून मजबूत आणि लवचिक सप्लाय चेन निर्माण करण्याविषयी जपानी कंपन्यांचा वाढता रस असल्याचे सांगितले. भारत-जपान सहकार्याकरिता त्यांनी तीन प्रमुख प्राधान्य क्षेत्रांचा उल्लेख केला – पीपल-टू-पीपल भागीदारी बळकट करणे, तंत्रज्ञान आणि हरित उपक्रमांचे एकत्रीकरण आणि उच्च व उदीयमान तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये, विशेषतः सेमीकंडक्टरमध्ये, भागीदारी वाढविणे.
या मंचाच्या निमित्ताने इंडिया-जपान बिझनेस लीडर्स फोरमच्या १२व्या अहवालाचे सादरीकरण दोन्ही पंतप्रधानांसमोर करण्यात आले. जेट्रोचे अध्यक्ष आणि सीईओ नोरिहिको इशिगुरो यांनी भारतीय आणि जपानी उद्योगांमधील भागीदारींवर प्रकाश टाकला. त्यांनी जाहीर केले की स्टील, कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश संशोधन, शिक्षण व कौशल्य विकास, स्वच्छ ऊर्जा आणि मानवी संसाधन या क्षेत्रांमध्ये भारतीय व जपानी कंपन्यांदरम्यान अनेक बिझनेस टू बिझनेस सामंजस्य करार झाले आहेत.
पाच क्षेत्रात भारत – जपान भागिदारी
१. उत्पादन क्षेत्र – बॅटरी, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर, जहाजबांधणी आणि अणुऊर्जा.
२. तंत्रज्ञान व नवकल्पना – कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), क्वांटम कॉम्प्युटिंग, अवकाश संशोधन आणि बायोटेक.
३. हरित ऊर्जा संक्रमण – स्वच्छ व अक्षय ऊर्जेकडे संक्रमण.
४. पुढील पिढीचे पायाभूत सुविधा – हाय-स्पीड रेल्वे, आधुनिक वाहतूक व्यवस्था व लॉजिस्टिक्स.
५. कौशल्यविकास आणि पीपल-टू-पीपल संबंध – मानवी संसाधनांची देवाणघेवाण व सहकार्य.