भारतावर टॅरिफ लादणे म्हणजे उंदराचा हत्तीस ठोसा - अमेरिकी अर्थतज्ज्ञ रिचर्ड वॉल्फ यांचा ट्रम्प प्रशासनास टोला

29 Aug 2025 18:23:01

नवी दिल्ली, अमेरिक अर्थतज्ज्ञ रिचर्ड वॉल्फ यांनी अमेरिकेच्या भारतावरील आर्थिक कारवाईवर तीव्र टीका केली आहे. रशिया टुडे या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वॉल्फ म्हणाले की, भारताला अमेरिकेने रोखले तरी त्याच्या निर्यातीसाठी इतर देशांत प्रचंड बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे या पावलाचा परिणाम असा होईल की ब्रिक्स गट अधिक बळकट आणि पाश्चिमात्य देशांच्या पर्यायाप्रमाणे उभा राहील.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच भारताच्या अनेक उत्पादनांवर ५० टक्क्यांपर्यंत आयातशुल्क लावले आहे, जे आधीच्या शुल्काच्या दुप्पट आहे. यामागे उद्देश असा की भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, कारण ते उत्पन्न मॉस्कोच्या युक्रेन युद्धाला हातभार लावत आहे.

वॉल्फ यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर भाष्य करताना सांगितले, भारत आता संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार जगातील सर्वात मोठा देश आहे. अमेरिकेने भारताला काय करावे हे सांगणे म्हणजे जणू उंदीर हत्तीवर मुठीने प्रहार करतोय असे आहे. वॉल्फ यांच्या मते, या दबावाचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही. त्यांनी स्पष्ट केले, रशियाने जसा आपल्या ऊर्जेसाठी नवीन बाजार शोधला, तसाच भारतही आपली निर्यात अमेरिकेपेक्षा ब्रिक्स आणि इतर देशांकडे वळवेल.”

वॉल्फ यांनी आकडेवारी देत सांगितले की, “चीन, भारत, रशिया आणि ब्रिक्स देश मिळून जगाच्या उत्पादन क्षमतेपैकी ३५ टक्के वाटा घेतात, तर जी-७ देश आता २८ टक्क्यांवर आले आहेत. त्यांनी इशारा दिली की, ट्रम्प यांच्या कर धोरणांमुळे ब्रिक्स अधिक संघटित, अधिक मजबूत आणि पश्चिमेकडील अर्थव्यवस्थांना वास्तविक पर्याय म्हणून विकसित होत आहे.


Powered By Sangraha 9.0