
आमचा राजा दूर गेला,
शत्रूंनी त्याचं डोकं चोरलं,
पण आमच्या छातीत
त्याचं हृदय अजूनही धडधडतंय... शतकभर मादागास्कर देशातील मेरिना वंशाचे लोक राजा टोयाच्या शिराबद्दल नेहमी असे म्हणायचे. पण, आता वंशसन्मानाचे, सांस्कृतिक वारशाच्या लढाईचे वर्तुळ पूर्ण झाले. फ्रान्सने ते राजाचे चोरलले शिर तब्बल १२८ वर्षांनी पुन्हा मादागास्करच्या मेरिना समुदायालाा परत केले आहे. जगभरातील प्रत्येक राष्ट्राचे स्वतःचे अस्तित्व, परंपरा आणि प्रेरणा आहेत. त्यांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी इतिहासात प्रत्येक राष्ट्र प्राणपणाने लढले आहे. याच अनुषंगाने मादागास्कर देशातील मेरिना समुदायाचीही एक विशिष्ट परंपरा-संस्कृती होती आणि आहे. मात्र, १८८३ पासून १८९६ पर्यंत, म्हणजे साधारण १३ वर्षांच्या काळात फ्रान्सने मादागास्करवर आक्रमण केले आणि १८९६ मध्ये मादागास्करला गुलाम बनवले. मादागास्करच्या स्थानिकांवर फ्रान्सने अनन्वित अत्याचार केले. तिथल्या स्थानिकांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि त्या जमिनीवर शेतीमध्ये राबण्यासाठी त्या जमीनमालकांनाच गुलाम केले. इथल्या मूळच्या लोकांची संपत्ती लुटली, त्यांचे धर्मांतरण केले. मात्र, तरीही इथे आजही २६ टक्के लोकसंख्या मेरिना समुदायाची आहे.
जसे आपल्या इथे मुस्लीम आक्रमणकर्त्यांनी, इंग्रजांनी मंदिरावर, धर्मश्रद्धांवर हल्ले केले, तसेच फ्रान्सनेही मादागास्करमध्ये केले.
या देशातील लोकसंस्कृतीचे अस्तित्व आणि प्रतीक म्हणजे पूर्वजांच्या मृतदेहाच्या अवशेषांचे पूजन-सन्मान हे आहे. दर पाच-सात वर्षांनी मेरिना समुदायातील कुटुंब थडग्यातून पूर्वजांचे अवशेष काढून त्याचे पूजन करतात. त्यांना नव्या कपड्यात घालून परत थडग्यात ठेवतात. हा एक मोठा उत्सव असतो आणि त्या उत्सवाला ‘फामादिहाना’ म्हणतात. फ्रान्सच्या आक्रांत्यांनी हेरले की, मेरिना समुदायाच्या पूर्वजांच्या थडग्यावर हल्ला केला, त्यांची विटंबना केली, तर मेरिना समुदायाचा आत्मविश्वास कमी होईल. कारण, मेरिना लोक मानतात की, माणसाचा मृत्यू झाला की त्याचा आत्मा हा त्याच्या कुटुंबाचे रक्षण करतो. पूर्वजांचे आत्मे झानाहारीला (मेरिना समाजाचा मुख्य देव) सांगून कुटुंबाच्या मनातील इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे फ्रान्सच्या आक्रांत्यांनी मेरिना समाजाच्या श्रद्धास्थानावर, त्यांच्या पूर्वजांच्या थडग्यांवर हल्ले केले. ते ज्या राजाला आपला देव मानायचे, त्या टोया राजाच्या राजाच्या मृतदेहाची विटंबना केली. त्याचे शिर धडावेगळे केले. ते कैदेत ठेवले.
हे का केले, तर त्यांना मेरिना समाजातील लोकांना दाखवून द्यायचे होते की, तुम्ही ज्या टोया राजाला पूर्वज देव मानता, जो तुमचे रक्षण, कल्याण करतो असे मानता त्याचे शिरच आमच्या ताब्यात आहे. त्यालापण आम्ही पराजित केले. तुमचा देवदूत हरला आणि तुमचा झानाहारी देवही आम्हाला काहीच करू शकला नाही. आता तुम्हाला आमचे गुलाम व्हावेच लागेल. फ्रान्सने केलेल्या अत्याचाराविरोधात हातपाय गाळून बसलेला मेरिना समाज टोया राजाच्या या विटंबनेने, पेटून उठला. त्यांनी फ्रान्सविरोधात प्रचंड लढा उभारला. शेवटी दि. २६ जून १९६० मादागास्कार देश फ्रान्सच्या गुलामीतून बाहेर आला. पण, मेरिना समाजाच्या मते त्यांच्या पूर्वज देवाचे म्हणजे टोया राजाचे शिर जोपर्यंत त्यांना मिळत नाही, तोपर्यंत ते स्वातंत्र्य स्वातंत्र्य नव्हते. मेरिना समाजाने फ्रान्सकडे सातत्याने राजाच्या डोक्याची मागणी केली. शेवटी फ्रान्समध्ये दि. २६ डिसेंबर २०२३ रोजी पारित झालेल्या कायद्यानुसार फ्रान्सने नुकतेच मादागास्करच्या राजाचे शिर परत केल. त्याचे पूजन करून ते आता दि. ३१ ऑगस्टला पुन्हा थडग्यात ठेवले जाईल. असो. फ्रान्सने गुलाम केलेल्या वसाहतीतील अशा प्रकारे ३० हजार अवशेष पॅरिसच्या म्यूसी डे ल’होमे संग्रहालयामध्ये ठेवले आहेत. यामध्ये एक तृतीयांश कापलेले शिर आणि हाडांचे सांगाडे आहेत. आता फ्रान्सने ते अवशेष त्या त्या देशांना परत करायचे ठरवले आहे. पण, त्यामुळे भूतकाळातील फ्रान्सचेे अत्याचार विसरता येतील का? स्वातंत्र्याचे गोडवे गाणार्या फ्रान्सचा हा भूतकाळ भयंकर आहे. पण, तरीही दि. ३१ ऑगस्ट २०२५ हा दिवस मादागास्करांच्या संस्कृतीविजयाचा आहे, त्यांच्या श्रद्धाविजयाचा आहे.