सपा – काँग्रेसच्या काळात संभलला हिंदूविहिन करण्याचे षडयंत्र – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

29 Aug 2025 18:45:39

नवी दिल्ली, समाजवादी पार्टी (सपा) आणि काँग्रेसच्या राजवटीत संभलला हिंदूविहिन करण्याचे षडयंत्र आखण्यात आले होते, असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी केला आहे.

संभल हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या न्यायिक समितीचा अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गुरुवारी सादर करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी प्रतापगढ येथील जाहिर सभेस संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी सपा – काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर प्रहार केला. ते म्हणाले, त्या काळात हिंदूंना नियोजित पद्धतीने लक्ष्य केले जात होते. निवडक भागांत दंगे घडवून आणले जात होते आणि अनेक ठिकाणे हिंदुविहीन करण्याचे प्रयत्न होत होते. परंतु आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. “डबल इंजिन सरकार”च्या कार्यकाळात असे कारस्थान रचणाऱ्यांना राज्य सोडून पलायन करावे लागत आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

योगी आदित्यनाथ यांनी संभल हिंसाचारावरील अहवालाचा उल्लेख करताना म्हटले की त्या काळात योजनाबद्धपणे दंगली घडवून आणल्या जात होत्या. या दंग्यांचा उद्देश हिंदूंना भयभीत करून त्यांचे पलायन घडवून आणणे हा होता. ही एकप्रकारे धार्मिक-सामाजिक असुरक्षिततेची परिस्थिती निर्माण करण्याची राजकीय डावपेच होती. मात्र आजच्या सरकारने कठोर कारवाई करून दंगेखोर, माफिया आणि गुंडांना राज्याच्या बाहेर हाकलून लावले आहे. परिणामी उत्तर प्रदेश दंगामुक्त बनले असून जनतेत सुरक्षिततेची भावना दृढ झाली आहे.

तर गुन्हेगारांनी याद राखावी

नवरात्र आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना योगी आदित्यनाथ यांनी कायदा-सुव्यवस्थेवर सरकारची ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका अधोरेखित केली. “जर कुठल्याही मुलीच्या किंवा व्यापाऱ्याच्या सुरक्षेला धक्का लावण्याचा प्रयत्न कोणी केला, तर त्याला पुढच्या चौकात यमराज भेटतील,” असा कठोर इशारा त्यांनी दिला. हुंडाबळी होऊ नयेत यासाठी सरकार संपूर्ण बांधिलकीने प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Powered By Sangraha 9.0