पारंपरिक चौकटी भेदत विद्यादान

    29-Aug-2025
Total Views |

विद्यादान करताना पारंपरिक चौकटी भेदणाऱ्या आणि सामाजिक कार्यात बहुमूल्य योगदान देणाऱ्या प्रा.योगेश हांडगे यांच्याविषयी...

द्यादानासारखे पवित्र कार्य नाही. आज शिक्षक-विद्यार्थी नाते याबाबत अनेक प्रवाह आहेत. मात्र, जे निष्ठेने हे कार्य पार पाडतात, त्यांत प्रा. योगेश हांडगे यांची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. विद्यार्थ्यांबाबत तळमळ असणार्या योगेश यांच्या शिक्षणाबद्दलच्या संकल्पना अगदी तरुणपणी विकसित होत गेल्या. उत्तर महाराष्ट्रात बालपण रमले, चांदवडमधील शाळेत शिक्षणाचे बाळकडू घेत त्यांनी आपल्या गुरूजनांना वंदन करीत करिअरमध्ये त्यांचे विद्यादान सार्थकी लावत आपली वाटचाल जोमाने सुरू ठेवली आहे.

काळानुसार बदलत्या शिक्षणाचा उपयोग हा भावी पिढीला त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी झालाच पाहिजे. मात्र, समाजासाठीदेखील हे शिक्षण उपयुक्त ठरले पाहिजे, अशी त्यांची ठाम धारणा. त्यामुळे ते अवयवदान, पर्यावरण संरक्षण आणि पक्षीसंवर्धनासारख्या कार्यातदेखील पुढाकार घेऊन याबाबत समाजात जागृती करीत आहेत. त्यामुळे ते जसे विद्यार्थ्यांमध्ये ‘आवडते शिक्षक’ म्हणून परिचित आहेत, तसेच समाजातदेखील आपली चांगली ओळख निर्माण करून आहेत.

प्रा. योगेश हांडगे यांनी आता भविष्यात विद्यार्थ्यांची आदर्श अशी समाजोपयोगी पिढी निर्माण करण्याचा पण केला आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी ते नेहमीच तयार असतात. त्यामुळे विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना या क्षेत्रात आणि समाजात मान आहे. कोणत्याही पुरस्कारापेक्षा हे प्रेम त्यांना मौलिक वाटते. उत्तर महाराष्ट्र ते पश्चिम महाराष्ट्र असा त्यांचा प्रवास प्रेरक आहे. शिक्षणपंढरी असलेल्या पुणे जिल्ह्यात विद्यादान करण्याची संधी त्यांना चालून आली.

शिक्षक असले की विद्यार्थ्यांच्या मनात वेगळीच भीती असते. मुळात शिक्षक म्हटले की कडक शिस्तीचे व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभे राहते. परंतु, प्रा. योगेश हांडगे हे याला अपवाद. विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये कोणतीही अडचण आली की, विद्यार्थी हक्काने हांडगे सरांकडे धाव घेतात. आपली अडचण सांगतात आणि त्यावर त्यांना लगेच तोडगाही मिळतो. एवढेच नाही तर ते विनामूल्य करिअर मार्गदर्शनदेखील करतात.

प्रा. योगेश हांडगे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील चांदवडचा. त्यांचे प्राथमिक चांदवड येथील शिक्षण नेमनाथ जैन विद्यालय येथे झाले. त्यानंतर केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयात निवड होऊन सहावी ते दहावी या कालावधीत त्यांनी मोफत रहिवासी शाळेत शिक्षण घेतले. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी पुन्हा आपल्या गावी परत येत त्यांनी अकरावी आणि बारावीचे शिक्षण नेमनाथ जैन विद्यालय येथे पूर्ण केले. पुढे नाशिकमधूनच संगणक अभियांत्रिकी शाखेत पदवी घेतली. उच्चशिक्षणासाठी त्यांनी बंगळुरु गाठले. येथे केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना विश्वविद्यालय सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.

शालेय जीवनापासूनच त्यांना समाजकार्याची आवड होती. ओळखीचा असो वा अनोळखी असो, मदतीसाठी केव्हाही, कुठेही अशी भावना हांडगे सरांच्या मनात कायम असते. कोणाला काहीही मदत हवी असेल, ते हक्काने सरांना सांगतात. सरकारी शाळांमधील मुलांना करिअरबद्दल फारशी माहिती मिळत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन ते करतात. विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि विद्यार्थ्यांना त्या अडचणींवर मात करायला ते शिकवतात.

आपला वाढदिवस केवळ शुभेच्छांच्या गडबडीत किंवा जल्लोषात साजरा न करता, तो समाजोपयोगी कार्यासाठी समर्पित करतात. यावर्षी पुणे महानगरपालिकेच्या आंबेगाव बुद्रुक शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित केले. या सत्रात प्रा. हांडगे यांनी विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडताना घ्यावयाची काळजी, भविष्यातील क्षेत्रांची संधी, स्पर्धा-परीक्षांची तयारी, कौशल्यविकासाचे महत्त्व, तसेच तंत्रज्ञान आणि नव्या रोजगारसंधींबाबत सविस्तर माहिती दिली. "स्वप्नं मोठी ठेवा, प्रयत्न सातत्याने करा आणि योग्य मार्गदर्शकांचा सल्ला घ्या,” हा संदेश ते विद्यार्थ्यांना देत असतात. तसेच त्यांच्याकडून अवयवदान नोंदणी मोहिमेचे आयोजन केले जाते. नागरिकांना अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगत अवयव नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करतात आणि इतरांनाही प्रोत्साहित करतात.

हांडगे सरांचे पक्षांवरही प्रेम आहे. पक्ष्यांसाठी दरवर्षी उन्हाळ्यात घरटी व पाणवठा उपक्रम ते हाती घेतात. या माध्यमातून पर्यावरण व निसर्ग संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करतात. गावाकडे, शहरात पक्षांसाठी पाणवठे बनवण्यासाठी प्रयत्न करतात. तसा प्रसारदेखील ते करतात. घरात सहज उपलब्ध असणार्या वस्तूंचा वापर करून पाणवठे तयार करण्यासाठी ते प्रोत्साहित करतात.

अनेकदा ऑनलाईन लग्नांचे संकेतस्थळ, ऑनलाईन खरेदी यामुळे अनेकांची फसगत होत असते. यावर काय काळजी घ्यावी, काय करावे, काय करू नये, यासाठी शय त्या ठिकाणी ते जागृती करतात. हांडगे सरांना लिखाणाची आवड आहे. ते सतत विविध विषयांवर लिखाण करत असतात. आपल्याकडील ज्ञान जेवढे वाटू, तेवढे ते वाढते, या भावनेतून ते ज्ञानदानाचे काम करत असतात. त्यांच्या या कार्याला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने अनेक शुभेच्छा.

शशांक तांबे
(अधिक माहितीसाठी संपर्क: ९४२३०७७९६३)