‘चिमणराव’चे गुंड्याभाऊ गेले, अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन

    28-Aug-2025
Total Views |


मुंबई : मराठी सिनेविश्वातून अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालं आहे. बाळ कर्वे यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. त्यांची दूरदर्शनवरील चिमणराव ही मालिका विशेष गाजली होती. या मालिकेतील गुंड्याभाऊ हे पात्र ते अक्षरशः जगले होते. या भूमिकेमुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती. बाळ कर्वे यांचं आज सकाळी १०.१५ च्या सुमारास निधन झालं अशी माहिती त्यांच्या कन्या स्वाती कर्वे यांनी दिली आहे. कर्वे हे ८६ वर्षांचे होते.

चिमनराव मालिकेत अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह ते दिसले होते. दोघांनीही एकेकाळी प्रेक्षकांच्या मानावर राज्य केलं होतं. बाळ कर्वे यांनी विजया मेहता आणि विजया जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नाट्य प्रवासाची सुरुवात केली. लालन सारंग यांच्याबरोबर ‘रथचक्र’, ‘तांदूळ निवडता निवडता’, भक्ती बर्वेंबरोबर ‘मनोमनी’, ‘आई रिटायर होते’, डॉ. गिरीश ओकांबरोबर ‘कुसूम मनोहर लेले’ अशी नाटकांमध्ये काम केलं होतं. रंगभूमीवरचा त्यांचा हा आजवरचा प्रवास अविस्मरणीय ठरला.

याशिवाय चिं. वि. जोशी यांच्या ‘चिमणराव’ या मालिकेत त्यांनी गुंड्याभाऊंची भूमिका छोटय़ा पडद्यावर साकारली होती. आणि या मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने करुन दाखवले. खरंतर या भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचे नाव विचारात होते, पण काही कारणाने हे घडले नाही आणि ही भूमिका बाळ कर्वे यांना मिळाली. त्यांनी ती भूमिका अजरामर केली. आजही ही भूमिका प्रेक्षकांचं मनमुराद मनोरंजन करते. ही मालिका १९७९ मध्ये प्रसारित झाली होती. आणि त्यानंतर बाळ कर्वेंना लोक गुंड्याभाऊ या नावानेच हाक मारु लागले होते.

अभिनेते बाळ कर्वे यांचा जन्म २५ ऑगस्ट १९३९ ला झाला होता. तर वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे खरे नाव ‘बाळकृष्ण’. पण पूर्ण नाव घेण्याऐवजी नुसतेच ‘बाळ’ म्हणू लागले आणि पुढे हेच नाव रूढ झाले. ‘कॉलेज ऑफ इंजिनीअिरग पुणे’ येथून ते ‘स्थापत्य अभियंता’ झाले. त्यानंतर ते मुंबई महानगरपालिकेत स्थापत्य अभियंता म्हणून नोकरीला लागले. त्यांनी बत्तीस वर्षे नोकरी केली. नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईत पार्ल्यात एका नातेवाईकाकडे राहात होते. त्याच ‌इमारतीत सुमंत वरणगांवकर राहायचे. ते रंगभूमीशी संबंधित होते. नाटकाची आवड असल्यामुळे त्यांची मैत्री झाली आणि दोघांनी मिळून ‘किलबिल बालरंगमंच’ अशी छोटीशी संस्था स्थापन केली आणि नंतर ते बालनाट्ये बसवू लागले.