टीओडी मीटरमध्ये छेडछाड,दोन घटना उघडकीस

28 Aug 2025 16:31:43

कल्याण, महावितरण कडून राज्यात जुने मीटर काढून नवीन टीओडी मीटर(टाईम ऑफ डे ) लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मीटर मध्ये छेडछाड करण्याच्या दोन घटना कल्याण परिमंडळातील बदलापूर आणि वसई येथे उघडकीस आल्या आहे.

कल्याण परिमंडळात देखील मोठ्या प्रमाणात वीज ग्राहकांचे जुने मीटर बदलून नवीन टीओडी मीटर लावले आहेत. वीज देयक कमी यावे यासाठी काही ग्राहक मीटरमध्ये छेडछाड करीत असतात. पण प्रत्यक्षात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत वीज वापर करणार्‍या ग्राहकांना ८० पैसे प्रति युनिट सुट मिळते आहे. महावितरण कडून लावण्यात येणाऱ्या टीओडी मीटरमध्ये छेडछाड करणे अवघड झाले आहे. नवीन टीओडी मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट लावले असल्याने ग्राहकाच्या क्षणाक्षणाच्या वीज वापराची माहिती महावितरण यंत्रणेला मिळत असते. जर ग्राहकांने यात छेडछाड केली तर त्या ठिकाणी जाऊन मीटरची तपासणी करून खात्री करण्यात येते.या टीओडी मीटरमध्ये छेडछाड केली तर वीज बिल कमी होण्या ऐवजी ते वाढले आहे.महावितरणच्या बदलापूर आणि वसई उपविभागातील गुणवत्ता नियंत्रण विभागाने अशा संशयित ग्राहकांच्या वीज वापरावर लक्ष ठेवले होते. प्रत्यक्ष ग्राहकाचे मीटर लावले त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता यात छेडछाड केल्याचे आढळून आले. अशा ग्राहकांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्याची कारवाई महावितरण कडून देण्यात सुरू झाली आहे.वीज मीटर मध्ये छेडछाड करणे हा दंडनीय अपराध आहे. वीज चोरी करणाऱ्यास कठोर कारावास किंवा आर्थिक दंडाची तरतूद वीज कायद्यात करण्यात आली आहे.

जर महावितरणच्या टीओडी मीटरमध्ये छेडछाड करीत असल्याचे आढळून आल्यास जवळच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी केले आहे.


Powered By Sangraha 9.0