ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सरकारची भूमिका

28 Aug 2025 12:40:47

नागपूर,
ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सरकारची भूमिका आहे. त्या भूमिकेतून सरकार पुढे जात आहे. मात्र, जरांगे पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वारंवार अपमान केला जातो. त्यांचा अपमान आता महाराष्ट्र सहन करणार नाही, आणि महाराष्ट्रातील जनता त्यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

बावनकुळे पुढे म्हणाले की, जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत आहे. आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र, राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर आंदोलन करता आले असते. ज्या राजकीय पक्षांनी या आंदोलनाला समर्थन दिलं आहे त्यांनीही याचा विचार करायला हवा होता. हिंदूच्या सर्वात मोठ्या उत्सवात गालबोट लागू नये याची काळजी घ्यायला पाहिजे.

अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे जवळपास झाले असून ते अपलोड झाले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदतीची कार्यवाही सरकार करत आहे. मुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सर्व पालकमंत्र्यांना यासंबंधीची दखल घेण्यात सांगितले आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणातील वेंगुर्ले येथे गवळी वाडा फ़्री होल्ड करण्याचा शासन निर्णय आम्ही जाहीर केला. तसेच नागपूर आणि अमरावती येथील नझुलच्या जागेवर असलेल्या घरांना त्यांच्या जागेचे मालकी पट्टे देण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीत आम्ही महसुली पंधरवडा साजरा करणार आहोत.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत ते म्हणाले की, या भेटीला राजकीय अर्थाने बघू नये, दोन कुटुंब एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करत असतात.

यंदाचे वर्ष हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पालकमंत्री यांच्या निवासस्थानी बाप्पाची स्थापना...

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली. यावर्षी पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यांनी सहकुटुंब विधिवत बाप्पाची पूजा, आराधना केली. तसेच सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत सर्वांना सुख, समाधान व समृद्धी देण्याची प्रार्थना बाप्पाचरणी केली.



Powered By Sangraha 9.0