नवी दिल्ली, सध्याच्या जगात संघर्षाचे वातावरण आहे. ‘वोकीझम’सारख्या आव्हानाने सर्वच देश चिंतेत आहेत. अशा जागतिक अस्वस्थतेच्या काळात जगाला संतुलन साधणारा ‘धर्म’ देण्याची जबाबदारी भारताची आहे. जगाला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय समाजानेही समर्थ होणे गरजेचे असून त्यासाठी ‘पंचपरिवर्तन’ गरजेचे आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी बुधवारी केले. विज्ञान भवन येथे आयोजित ‘१०० वर्ष की संघयात्रा – नए क्षितीज’ या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते
.
जगात सध्या संघर्षाचे वातावरण असून कलह आणि कट्टरतावादाचा प्रभाव वाढत आहे. जगात संस्कार नसावेत, असे मानणारा वर्ग त्यास खतपाणी घालत असतो. जगातील सर्वच देशांमध्ये जडवाद वाढून आत्मकेंद्रीतपणाने टोक गाठले आहे. त्यामुळे संस्कारांची हानी झाली असून न पटणाऱ्या विचारास ‘कॅन्सल’ करण्याची संस्कृती वाढली आहे. त्यासोबतच ‘वोकीझम’च्या आव्हानाने संपूर्ण जग चिंतेत आहे. त्यासाठी जगामध्ये १८० अंशांच्या कोनात बदल घङविणे गरजेचे असून त्यासाठी ‘धर्म’ हाच एकमेव मार्ग आहे. विविधतेचा स्वीकार करून संतुलनाची भूमिका घेणे म्हणजेच ‘धर्म’. ही प्राचीन जीवनविद्या असून ती भारताने यापूर्वीच साधली आहे. आजचे जग हे परस्परसंबंधांना आसुसलेले असून त्यामुळेच ते भारताकडे आशेने पाहत आहेत. त्यासाठी हिंदू समाजाने संघटित होऊन विश्वशांतीचे प्रवर्तन करणारा धर्म जगास देण्यासाठी सज्ज व्हावे, असे मत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.
भारताने नेहमीच स्वत:च्य़ा नुकसानाकडे दुर्लक्ष करून जगाच्या हितास प्राधान्य दिल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, संघातही विश्वाचा विचार करण्याची गरज श्रीगुरुजींपासून रज्जूभैयांपर्यंत वेळोवेळी व्यक्त करण्यात आली आहे. जगाला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय समाजात चरित्रनिर्माण आणि देशभक्ती यावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी संघाव्यतिरिक्तही अनेक व्यक्ती, संघटना कार्यरत आहेत. त्यांच्यामध्ये परस्परसमन्वय साधण्यासाठी संघ आता काम करत आहे. समाजातील विखुरलेल्या सज्जनशक्तीस एकत्र आणणे आवश्यक असून त्याशिवाय वेगाने व्यक्तीनिर्माण होणे शक्य नाही. त्याचप्रमाणे संघाची शाखा आणि संघकार्यही समाजाच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक कुटुंबात नेण्यासाठीही संघ सज्ज आहे. त्यासाठी कुटुंबप्रबोधन, पर्यावरण, सामाजिक समरसता, आत्मनिर्भरता आणि संविधान पालन या पंतपरिवर्तनावर संघाचा भर आहे, असेही संरसंघचालकांनी नमूद केले आहे.
आत्मनिर्भरता ही गुरुकिल्लीआत्मनिर्भऱता हे सर्व समस्यांचे उत्तर आहे. आपला देश आत्मनिर्भर झाला पाहिजे, त्यासाठी स्वदेशीच्या वापरास प्राधान्य देण्याची गरज आहे. आत्मनिर्भरतेचा अर्थ जगाशी संबंध तोडणे असा होत नाही. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापार तर आवश्यक आहेच. मात्र, आंतरराष्ट्रीय व्यापार हा दबावाने नव्हे तर स्वेच्छेनेच होईल; असे सरसंघचालकांनी सांगितले आहे.
दुरावा दूर करण्यासाठी संवाद आवश्यकसमाजाच्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी काम करण्याची गरज आहे. त्यासाठी विविध समाजांच्या धुरिणांशी स्वयंसेवक संवाद साधत आहेत. त्यासाठी सकारात्मकता गरजेची आहे. आपल्या देशात परकीय आक्रमणांच्या रुपाने आलेल्या विचारधारा आहेत, त्या विचारधारा मानणारे लोकही आहेत. त्यांच्यासोबत काही कारणाने दुरावा असल्यास तो दूर करण्यासाठी संवाद आवश्यक आहे.
शेजारी देशांचा विकास ही भारताचीही जबाबदारीकधीकाळी आपलाच भाग असलेल्या मात्र आता स्वतंत्र देश झालेल्यांशी संपर्क आवश्यक आहे. त्यांच्या विकासासाठी भारताने योगदान देणे गरजेचे आहे. तेथे शांतता नांदावी आणि स्थैर्य यावे, यासाठी भारताचा पुढाकार गरजेचा आहे.