धर्माचा अर्थ रिलीजन नसून जीवन जगण्याची व्यापक पद्धती आहे ; डॉ. मनमोहन वैद्य यांचे प्रतिपादन

28 Aug 2025 18:32:06

मुंबई : "प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात परमेश्वर निवास करतो. आपल्या अंतरात्म्यातल्या दैवी शक्तीला जागृत करण्यासाठी कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोग हे चार मार्ग सांगितले गेले आहेत. धर्माचा अर्थ रिलीजन नसून जीवन जगण्याची व्यापक पद्धती असा आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले. हिमाचल प्रदेश विद्यापीठातील अभ्युदय अध्ययन मंडळ यांच्यावतीने “भारताची भारतीय संकल्पना” या विषयावर एक संगोष्ठी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

उपस्थितांना संबोधत ते म्हणाले, इंग्रजांनी भाषा आणि मौलिकतेच्या आधारावर भारताचे अनेक भाग विभाजित केले आणि त्यातूनच 'इंडिया' आणि 'भारत' अशी दोन नावे प्रचलित झाली. स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटून गेल्यानंतरही राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपण कोणता मार्ग स्वीकारावा हा प्रश्न कायम आहे. त्यांनी एका युरोपीय लेखकाच्या 'हू आर वी' या पुस्तकाचा उल्लेख करून सांगितले की, त्यात 'आपण कोण आहोत, आपली मुळे कुठे आहेत आणि आपले पूर्वज कोण आहेत?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, पी. मुन्शी यांनी लिहिलेल्या “पिल्ग्रिमेज टू फ्रिडम या ग्रंथाचा उल्लेख करून त्यात प्राचीन भारतीय अर्थव्यवस्था आणि उद्योगधंद्यांवर सविस्तर प्रकाश टाकल्याचे सांगितले.

भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगताना डॉ. वैद्य म्हणाले की, “एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति” म्हणजेच सत्य एकच आहे, पण ज्ञानीजन त्याचे अनेक प्रकारे वर्णन करतात. भारताची आत्मा म्हणजेच “विविधतेतून एकता” हीच आहे. हिंदू हे कोणतेही संकुचित धर्मनाव नसून जीवन जगण्याची एक पद्धत म्हणजेच 'वे ऑफ लाईफ' आहे.

पुढे ते म्हणाले, नव्या सरकारच्या आगमनासोबत भारतीय संस्कृतीला सुसंगत अशा शासन पद्धतीचा आरंभ झाला, जो समाजात दीर्घकाळ सुरू असलेल्या कार्याचा परिणाम आहे. इंग्रजांनी येथे सत्तेसाठी इंडियन पेनल कोड तयार केले, ज्याचा उद्देश भारतीयांना दंडित करणे हा होता. पण आता भारतीय न्याय संहिता लागू करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देणे हा आहे.


Powered By Sangraha 9.0