न्यायाचे राज्य म्हणजेच हिंदूराष्ट्र – सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

27 Aug 2025 14:18:43

नवी दिल्ली, भारत हे प्राचीन काळापासूनचे राष्ट्र आहे. त्यास आधुनिक आणि पाश्चात्त्य ‘नेशन’ या संकल्पनेशी जोडता येणार आहे. संघर्ष नव्हे तर समन्वय हे भारताचे तत्त्व असून हिंदू विरुद्ध अन्य असा वाद नाही. समन्वय हाच हिंदूंचा स्वभाव असून न्यायाचे राज्य म्हणजेच हिंदूराष्ट्र असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंगळवारी केले.

रा. स्व. संघाच्या शताब्दीचे औचित्य साधून ‘१०० वर्ष की संघयात्रा – नए क्षितीज’ या विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी सरसंघचालकांनी रा. स्व. संघाची स्थापना, त्यामागील विचार, भारताची प्रगती आदी विषयांवर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, संघर्ष नव्हे तर समन्वय हा हिंदूंचा मूळ स्वभाव आहे. त्यामुळे एकत्र राहण्यावर आणि समन्वय साधण्यावर हिंदूंचा भर असतो. हिंदू, हिंदवी, सनातन हे परस्परांचे समानार्थी शब्द आहेत. या शब्दांमागे भारतीयांच्या पूर्वजांची परंपरा असून गेल्या ४० हजार वर्षांपासून भारतीयांचा डीएनए हा समान आहे. त्यामुळे हिंदू विरुद्ध इतर अशा संघर्षाचे हिंदूराष्ट्रात कोणतेही स्थान नसून न्यायाचे राज्य म्हणजेच हिंदूराष्ट्र, असे सरसंघचालकांनी म्हटले.

रा. स्व. संघाच्या स्थापनेमागचा विचार हा समाज घडविण्याचा होता, असे सरसंघचालकांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, १८५७ साली पहिले स्वातंत्र्ययुद्ध झाले; त्यात भारतीयांना अपयश आले. त्यानंतर स्वातंत्र्यासाठी क्रांतीचा मार्ग आणि राजकीय सुधारणांचा मार्ग असे दोन प्रवाह प्रमुख ठरले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे तर क्रांतीमार्गाचे देदीप्यमान रत्न होते. पुढे ब्रिटीशांनी क्रांती चळवळ चिरडून टाकली आणि भारतीयांच्या असंतोषास सनदशीर मार्गाने वाट करून देण्यासाठीची व्यवस्था सुरू झाली. काँग्रेसला त्या काळातील भारतीय पुढाऱ्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या मार्गाकडे वळवले. त्याचप्रमाणे त्याच काळात सामाजिक सुधारणांचाही एक मार्ग कार्यरत होते, त्याचप्रमाणे आपल्या मुळांकडे परत जायला हवे; असे सांगणारा चौथा मार्गही होता. स्वामी दयानंद आणि स्वामी विवेकानंद हे या मार्गाचे अर्ध्वयू सांगता येतील. डॉ. हेडगेवार हे या चारही मार्गांमध्ये कार्यरत होते. त्यांचा या काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू आदी धुरिणांशी संपर्क आला. या सर्वांचे समाजातीस दुर्गुणांना दूर करण्यावर आणि त्यासाठी सामाजिक उन्नती गरजेची असल्याविषयी एकमत होते. त्यामुळे डॉ. हेडगेवार यांनी त्याकामी पुढाकार घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, असे सरसंघचालकांनी नमूद केले.

संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करणे हे संघाचे मूळ ध्येय असून हिंदू हे नाव लावणाऱ्यांची देशाप्रती जबाबदारी असल्याचे संघ मानत असल्याचे सरसंघचालकांनी आपल्या संबोधनात स्पष्ट केले. मनुष्यास तयार करणे आणि त्यांनी समाजासाठी काम करणे ही संघाची दोन मुख्य कामे आहेत. स्वयंसेवकांनी समाजात सक्रिय होणे, विविध क्षेत्रात कार्यरत राहणे आणि स्वत्त्वावर आधारित समाजाची पुनर्रचना करणे हे स्वयंसेवकांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. स्वयंसेवकांचा संघाशी अतुट संबंध असतो, मात्र संघ स्वयंसेवकांवर कधीही दबाव टाकत नाही. स्वयंसेवकांच्या विविध संघटना स्वयंपूर्ण होतात, तेथेही संघ सल्ला ऐकण्याचा दबाव टाकत नाही. मतभेद असावेत, मनभेद नव्हे यावर संघाचा विश्वास आहे. त्यामुळेच स्वयंसेवकांचा ‘विचार – आचार - संस्कार’ हे योग्य असावेत, यावर संघाचा नेहमी भर असतो, असेही सरसंघचालकांनी यावेळी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, उत्तर क्षेत्राचे संघचालक पवन जिंदल आणि अनिल अग्रवाल होते. त्याचप्रमाणे उपस्थितांमध्ये संघाचे अखिल भारतीय पदाधिकारी, विविध देशांचे राजदूत, दुतावासातील अधिकारी, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आदी उपस्थित होते.

समाजाचीही जबाबदारी

समाजातील दुर्गूणांना दूर करायचे असेल कर त्यासाठी केवळ राजकीय व्यवस्थेवर अवलंबून राहून चालणार नाही. समाजात सुधारणा करण्यासाठी समाजातूनच नायक उभे रहायला हवे, असे रविंद्रनाथ ठाकूंरांचे मत होते. त्यामुळे एखादा पक्ष, एखादा नेते आणि एखाद्या सरकारला समाजसुधारणेचा ठेका देऊन टाकण्याची सवय योग्य नाही. समाजानेच जबाबदारी घेऊन चांगले वागण्याची गरज आहे.

संघ हा आत्मनिर्भर आहे

संघास समाजाने स्वीकारले आणि सांभाळून घेतले आहे. संघाचे कार्य हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उपेक्षा सहन करू सुरू झाले. प्रचाराची साधने नाही आणि विचारांना मान्यता नाही, असा तो काळ होता. त्याचप्रमाणे दीर्घकाळ कटू आणि कठोर विरोध अन्य कोणत्याही संघटनेला झाला नाही, तोही संघाने स्वीकारला. खोटे आरोप ते हिंसा आणि हत्या असे त्या विरोधांचे स्वरूप होते. मात्र, समाजाने प्रेम स्वीकारतो, तसा रोषही स्वीकारायला हवा हा गुरूजींचा विचार होता. त्यानुसार संघाने समाजात राहूनच कार्यकर्ते मिळवले. त्याचप्रमाणे संघाची आर्थिक गरजही स्वयंसेवक दरवर्षी गुरुपौर्णिमेस गुरुदक्षिणा देऊन भागवतात.

डॉ. हेडगेवार हे जन्मजात देशभक्त

डॉ. हेडगेवार हे जन्मजात देशभक्त होते. त्यांनी १९०५ च्या सुमारास शाळेत असतानाच वंदे मातरम् चळवळीत भाग घेऊन माफी मागण्यास नकार दिला होता. त्यांच्यातील हाच गुण पाहून नागपूरमधील तत्कालीन पुढाऱ्यांनी त्यांना कोलकात्यात वैद्यकीय शिक्षण घेण्यास पाठवले. मात्र, त्यामागील खरा उद्देश हा अनुशीलन समितीशी समन्वय साधून पश्चिम भारतातही क्रांतीकार्य वाढवणे हा होता. त्यानंतर पुढे ते १९२० साली काँग्रेसच्या कार्यात सहभागी होऊन तेथेही त्यांनी विविध स्वातंत्र्य आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता.


Powered By Sangraha 9.0