वंदे भारत महाराष्ट्राच्या समृद्धीचे द्वार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

26 Aug 2025 21:05:31

मुंबई, "मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी शासन गतिमान दळणवळणावर भर देत आहे. ' वंदे भारत एक्सप्रेस' ने नांदेड, राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आले असून यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वे गाडीचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना व इतर उच्च अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे कात टाकत आहे. प्रगत देशांसारखे आरामदायक सुविधा असलेली भारतात निर्मित वंदे भारत रेल्वे ही त्याचेच प्रतीक आहे. मुंबई ते नांदेड हे ६१० किलोमीटरचे अंतर ९.३० तासात पूर्ण होणार आहे. पूर्वी जालनापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहिब नांदेडपर्यंत जात आहे. या रेल्वे गाडीची क्षमता ५०० वरून १४४० पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच गाडीचे डब्बे ८ वरून २० पर्यंत वाढवण्यात आले आहे.नांदेड हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना, प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती ' वंदे भारत' एक्सप्रेसच्या माध्यमातून होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस च्या सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

वंदे भारत ट्रेनची वैशिष्ट्ये

- मराठवाड्यातील नांदेडला मुंबईशी जोडणारी पहिलीच वंदे भारत
- नांदेड ते मुंबई असा ६१० किमीचा प्रवास फक्त साडेनऊ तासात
- प्रमुख पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांदरम्यान वेगवान प्रवासाची सुविधा.
- हुजूर साहिब नांदेड हून बुधवार व सीएसएमटीवरून गुरुवार वगळता
आठवड्यातून सहा दिवस गाडीची सुविधा

Powered By Sangraha 9.0