सरकार उलथविण्याची भाषा चीड आणणारी! ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे पाटलांना ठणकावले

26 Aug 2025 20:24:08

मुंबई, महायुती सरकार तीन कोटी १७ लाख मते आणि ५१.७८ टक्के मताधिक्याने निवडून आले आहे. अशा मजबूत सरकारला उलथवण्याची भाषा चीड आणणारी आहे, असे सांगत महाराष्ट्र वैयक्तिक टीका कदापि सहन करणार नाही, खपवून घेतली जाणार नाही, अश्या शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना ठणकावले.

ते माध्यमाशी बोलत होते. मराठा आरक्षणासह कोणत्याही मागण्यांसाठी संयम आणि सकारात्मक चर्चेचा मार्ग अवलंबावा. आम्ही सर्वांचे हक्क मांडण्यास मोकळीक देतो, पण अशा भाषा आणि धमक्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाहीत. चिथावणीखोर आणि अर्वाच्य भाषा टाळली पाहिजे, असे सांगून बावनकुळे म्हणाले, आंदोलन आणि मागण्या मांडण्याचा सर्वांना हक्क आहे, पण चिथावणीखोर आणि एकेरी भाषा वापरणे, विशेषतः आमच्या आया-बहिणी आणि नेत्यांच्या कुटुंबियांबाबत बोलणे कोणीही अजिबात सहन करणार नाही.”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर

बोलताना बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योगदानाची प्रशंसा केली. रात्रंदिवस अभ्यास करून, कायदे अभ्यासकांची मते घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फडणवीस यांनी स्वतः आर्थिक-सामाजिक सर्वेक्षण केले. कायदा तयार केला. हा कायदा विधिमंडळ आणि हायकोर्टात टिकला; पण उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने तो रद्द केला. फडणवीस यांनी मराठा समाजासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली.

मराठा समाजासोबत महायुती सरकार

महायुती सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे बावनकुळे यांनी अधोरेखित केले. “आमचे सरकार लुळपांगळ नाही, तर मजबूत आहे. मराठा समाजाला जे काही द्यायचे आहे, ते फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार देईल. सरकार मराठा समाजासोबत होते, आहे आणि राहील.” असे त्यांनी ठामपणे सांगितले.


Powered By Sangraha 9.0