उत्तराखंडमध्ये ‘ऑपरेशन कालनेमी’ - ३०० हून अधिक बनावट साधूंना अटक

26 Aug 2025 18:19:37

नवी दिल्ली, उत्तराखंडमध्ये संत-साधूंच्या वेषात लोकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात ‘ऑपरेशन कालनेमी’ नावाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ३०० हून अधिक बनावटी बाबांना अटक करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्यांमध्ये एका बांगलादेशी नागरिकाचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या निर्देशानुसार गेल्या महिन्यात ही मोहीम सुरू करण्यात आली. धार्मिक भावनांचा गैरवापर करून, आपली खरी ओळख लपवून फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा सरकारचा निर्धार असल्याने राज्य पोलिसांनी मोठ्या प्रमाणात छापे आणि पडताळणी मोहीम हाती घेतली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत राज्यातील तब्बल ४,००० हून अधिक संशयितांची पडताळणी करण्यात आली असून त्यापैकी ३०० पेक्षा अधिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेषतः हरिद्वार, देहरादून आणि उधमसिंहनगर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे.

हरिद्वार जिल्ह्यात २,३०१ जणांची ओळख पटविण्यात आली असून १६२ जणांना अटक झाली आहे. देहरादूनमध्ये ८६५ संशयितांची पडताळणी करून ११३ जणांना अटक करण्यात आले, तर उधमसिंहनगर जिल्ह्यात १७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर जिल्ह्यांमध्येही ही मोहीम सुरू असून पोलिसांकडून सतत तपास व कारवाई सुरू आहे.

देहरादूनच्या सहसपूर परिसरात साधूचा वेष धारण करून राहत असलेला बांगलादेशी नागरिक रुक्न राकम उर्फ शाह आलम यालाही पोलिसांनी अटक केली आहे. तो साधू बनून स्थानिक लोकांची दिशाभूल करीत असल्याचे उघड झाले आहे.

ही मोहीम सुरू करताना मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी म्हणाले होते की, जसा कालनेमी राक्षस साधूचा वेष धारण करून लोकांची दिशाभूल करीत होता, तसेच आजही काही लोक संत-साधूंचा मुखवटा लावून गुन्हेगारी कृत्यांत गुंतलेले आहेत. देवभूमीत बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांना, आपली खरी ओळख लपवून फसवणूक करणाऱ्यांना किंवा धार्मिक भावना दुखावणाऱ्यांना अजिबात सोडले जाणार नाही.

राज्यातील ही मोहीम सध्या सर्व जिल्ह्यांत सक्रिय असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बनावट साधूंच्या नावाखाली चालणारी फसवणूक मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलल्याने या कारवाईकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


Powered By Sangraha 9.0