मुंबई मेट्रो एकची सेवा आता रात्री १ वाजेपर्यंत; मुंबई उपनगराकडे गर्दीच्या वेळी मेट्रोने प्रवास शक्य

26 Aug 2025 21:17:40

मुंबई, गणेशोत्सवात लाखो भाविक मुंबईतील गणपती दर्शनासाठी, देखावे पाहण्यासाठी तसेच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी अनेक भक्त बाहेर पडतात. या पार्श्वभूमीवर मुंबई वनने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई मेट्रोने आपली सेवा रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई मेट्रो वनने दि.२७ ऑगस्ट ते दि. ६सप्टेंबर २०२५ या काळात गणेशोत्सवासाठी रात्री १ वाजेपर्यंत सेवा वाढवली. त्यानुसार, शेवटची ट्रेन वर्सोवाहून घाटकोपरकडे रात्री १२.१५ वाजता आणि घाटकोपरहून वर्सोवाकडे रात्री १२.४० वाजता सुटेल अशी माहिती मुंबई मेट्रो कडून देण्यात आली आहे. विसर्जनाच्या काळात विशेषतः रात्री उशिरापर्यंत गर्दी होत असल्याने प्रवाशांना मेट्रो एक सुरक्षित, वेगवान आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.या सोयीमुळे प्रवाशांचा मोठा फायदा होणार आहे. उपनगरांमध्ये राहणाऱ्यांना रात्री उशिरा परतण्यासाठी मेट्रो सेवा सोयीस्कर पर्याय उपलब्ध असणार आहे

विस्तारित वेळापत्रक जाहीर

२७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान एकूण ११ दिवस हे विस्तारित वेळापत्रक मुंबई मेट्रोने जाहीर केले आहे. यामध्ये आधीची मेट्रो सेवा रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असायची, मात्र आता तीच सेवा नव्या वेळापत्रकनुसार रात्री १ वाजेपर्यंत सुरू असणार आहे. गणपती दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यासाठी दरवर्षी लाखो मुंबईकर रात्री उशिरापर्यंत प्रवास करतात. त्यामुळे भाविकांना परतीच्या प्रवासात त्रास होऊ नये यासाठी मेट्रोच्या वेळेत वाढ केली आहे, असे रिलायन्स मुंबई मेट्रोकडून सांगण्यात आले.

Powered By Sangraha 9.0