नास्तिकता आणि अज्ञेयवाद : वैश्विक सुरचना तत्त्व

26 Aug 2025 21:54:14

भारतीय समाजावरील युरोपीय वसाहतवादी तत्त्वज्ञानाचा विचार करताना जसा त्यांच्या ‘रिलिजन’चा विचार आवश्यक आहे, तसेच धर्माच्या पाठोपाठ निर्माण झालेल्या नास्तिकता आणि अज्ञेयवाद या चिंतनाचा विचारही आवश्यक ठरतो. धर्माला प्रत्युत्तर म्हणून इहवादी ‘सेक्युलॅरिझम’ कसा निर्माण झाला, ते आपण थोडयात पाहिले. याच तत्त्वज्ञानाच्या क्रमागत विकासातून ईश्वराचे अस्तित्व आणि त्याचे कार्य याविषयी काय विचार मांडले गेले, त्याची थोडी चर्चा आपण या व पुढील लेखात पाहू.


आजचा युरोप ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वज्ञानापासून काहीसा दूर गेलेला जो आपल्याला दिसतो, त्या दूर जाण्याची प्रक्रिया ही गेली काही शतके सुरू आहे. त्यामुळे वसाहतवादाचे तत्त्वज्ञान हे काहीसे आजच्या परिभाषेत ‘पोस्ट-रिलिजन’ प्रकारचे आहे. मात्र, या सर्व नवीन विचारांची झेप ही मूळ धर्माच्याच चौकटीत कशी होती, ते आपण ‘सेयुलॅरिझम’च्या तत्त्वाची चर्चा करताना पाहिले आहे. तसाच प्रकार नास्तिकता आणि अज्ञेयवाद या चिंतनाचा कसा आहे आणि भारतीय चिंतनाशी हा विचार मुळातून फारकत का घेतो, हे समजून घेणे आवश्यक आहे.

ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणे यासाठीचे दोन प्रमुख तर्क म्हणजे वैश्विक सुरचना आणि न्यायाचे तत्त्व. त्यांपैकी पहिले वैश्विक सुरचनेचे तत्त्व आपल्या नित्य व्यवहारात सुचारूपणे नियमित घडणार्या घटनांचा आधार घेऊन असे प्रतिपादन करते की, या सर्व सुरचनेचा आधार ईश्वरतत्त्व आहे. ग्रह-नक्षत्रांचे नियमित उदयास्त, चंद्राच्या कला, सूर्याचे अयनचलन, ऋतुचक्र, भौतिक नियमांच्या नित्यता या सर्वांच्या एकत्रित अनुभवातून असे प्रतिपादन करता येते की, या सर्व व्यवस्थेमागे कोणीतरी योजक असावा, जो या सर्व घटना नियमितपणे घडवून आणतो. हा योजक स्वतःच परिपूर्ण असल्याने त्याने बनवलेले हे विश्वही परिपूर्ण अशा नियमांनी बांधलेले असते. या विचाराचा आधार आपल्याला ख्रिस्तपूर्व युरोपातील ग्रीक संस्कृतीत दिसतो. परिपूर्ण अशा वर्तुळाकृतीच्याच साहाय्याने सूर्यमालेचे सिद्धांत बनवण्याची ग्रीक धडपड ही या योजक परमेश्वराच्या तत्त्वाचे स्वरूप शोधण्याचाच प्रयत्न होती. ख्रिस्ती विचाराने या विश्वनिर्मात्या परिपूर्ण ईश्वराला पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या परिपूर्ण नियमनाचेही काम दिले.

ख्रिस्ती संकल्पनेत ईश्वराने मानवाची निर्मिती स्वतःच्या स्वरूपात केली आहे. प्रत्यक्ष आकलनासाठी मात्र हे तत्त्व उलटे फिरवून ईश्वर तत्त्वाचे आकलन केवळ मानवी रूपात करणे, हे बंधन ख्रिस्ती धर्माने स्वतःवर लादून घेतले. ख्रिस्तपूर्व काळात अनेक प्रकारच्या ‘ईश्वर’ संकल्पना युरोपात अस्तित्वात होत्याच. त्यामुळे ईश्वराच्या अस्तित्वाची सिद्धता ही कदाचित दोन सहस्रकांपूर्वी अनावश्यक बाब होती. परंतु, काही काळ लोटल्यावर आणि ख्रिस्ती धर्म युरोपात प्रस्थापित झाल्यावर एक प्रश्न उभा राहू लागला, तो म्हणजे ख्रिस्ताने सांगितलेल्या ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रमाण काय? पुनरुज्जीवन काळातील तर्कप्रामाण्याचा आधार मानणार्या युरोपीय विचारवंतांना ईश्वराच्या अस्तित्वाचेही प्रमाण तर्काच्या आधारावर हवे होते. इसवी सनाच्या १२व्या-१३व्या शतकात उगम पावून १५व्या शतकात स्थिरपद झालेल्या युरोपातील तर्कप्रामाण्यवादामागे ब्रह्मगुप्ताच्या गणितग्रंथांची भाषांतरे कदाचित कारणीभूत होती का, हा संशोधनाचा विषय असू शकतो. ख्रिस्ती ईश्वर तत्त्वाच्या व्यत्यासी आकलनातून ईश्वरही मानवाप्रमाणेच तर्कप्रधान असला पाहिजे, असा विचार पुढे आला. १३व्या शतकातील प्रीस्ट थॉमस अक्विनास या चिंतनाचा प्रणेता होता. तर्कप्रधान ईश्वराच्या रचनेत चूक असूच शकत नाही. त्यामुळे असा ईश्वर जो सर्वशक्तिमानही आहे, त्याने केलेली विश्वरचना ही परिपूर्ण अशीच असणार, असा तर्क अक्विनास याने मांडला. ‘परिपूर्ण रचना’ ही ग्रीक चिंतनातील भौमितिक परिपूर्णतेच्या अनुषंगाने जाणारी होती. दैनंदिन अनुभवाला येणार्या सुरचनेच्या तत्त्वाचा आधार घेऊन या सर्व सुरचनेचे आदिकारण म्हणून ईश्वराचे अस्तित्व आपोआप सिद्ध होते, असा विचार युरोपात प्रस्थापित झाला. स्व-स्वरूपाविषयी चिंतन करताना देकार्तने या सुरचनेचे गणिती सिद्धांतन प्रस्थापित करत ज्याला आज आपण ‘कार्टेशियन पद्धती’ म्हणतो तिचा पाया घातला. पुनरुज्जीवन कालखंडातील वैज्ञानिक प्रगतीने या ईश्वरविषयक चिंतनास बळ दिले. न्यूटनचे गतीविषयक नियम आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत यांनी वैश्विक सुरचनेचा सिद्धांत दृढमूल केला.

वैश्विक सुरचना तत्त्वाची सखोल चिकित्सा उत्तर पुनरुज्जीवन काळात प्राधान्याने सुरू झाली, असे म्हणता येईल. स्पिनोझाने ईश्वराला सृष्टीचा तर्कप्रधान निर्माता आणि नियंता म्हणता येईल का, त्याचा विचार सुरू केला होता. ईश्वरतत्त्वात आणि निसर्गतत्त्वात भिन्नता मानता येईल का, हा त्याचा प्रमुख प्रश्न होता. परंतु, ईश्वर तत्त्व आणि निसर्ग तत्त्व एक मानले, तरी ईश्वर तत्त्व नाकारण्याकडे त्याचा कल नव्हता. स्पिनोझाच्या पुढील चिंतनाची पातळी डेव्हिड ह्यूम याने गाठली, असे म्हणता येईल. सुरचनेच्या तत्त्वाच्या कार्यकारणभावाचा विचार केल्यास, आपल्याला कार्य आणि कारणाची एक लांबलचक साखळीच बनवावी लागेल. परंतु, अशा साखळीच्या सुरुवातीस एक आदिकारण असेलच असे मात्र तर्काने सांगता येत नाही. ह्यूमचे हे प्रतिपादन ही अज्ञेयवादाची मांडणी होती. वैश्विक सुरचनेच्या तत्त्वाच्या आधारे ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याचा तर्कप्रणित प्रयत्न चुकीचा आहे आणि तर्काधिष्ठित मांडणीतून ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही, असे अज्ञेयवादाने दाखवून दिले. अनेक शतके स्थिर झालेल्या ख्रिस्ती समाजाच्या ईश्वरविषयक समजुतीला हा धक्का होता. अज्ञेयवादाने पहिला धक्का दिल्यावर नास्तिकतावाद स्वाभाविक पुढचे पाऊल होता. जर ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करता येत नसेल, तर ते असल्याचे का मान्य करावे, हे अनेक विचारवंत विचारू लागले. तर्कप्रणालीच्या आधारे शय नाही आणि इंद्रियगम्य अनुभवांचे आकलन करून घेण्यास आवश्यक नाही, अशा ईश्वर तत्त्वास प्रबोधन काळातील विचारवंतांनी नाकारले. मूलभूत शास्त्रीय तत्त्वांच्या आधारे ज्याप्रकारच्या विश्वाची संकल्पना निर्माण होते, ते स्वाभाविकपणे वैश्विक सुरचनेकडे घेऊन जाते. विविध शास्त्रीय नियमांमध्ये विवक्षित सममिती (ीूााशीीूं) निहित आहेत. या सैद्धांतिक सममितींचे प्रतिबिंब त्यांच्याबरहुकूम चालणार्या विश्वाच्या रचनेत पडते. त्यामुळे अशा विश्वाचा नियंता असा कोणीही ईश्वर अस्तित्वात नाही. निरीश्वरवाद, भौतिकतावाद अशा अनेकविध अंगांनी नास्तिकतेची मांडणी प्रबोधनकाळात द-होलबाख, डिडेरो इत्यादी विचारवंतांनी केली.

डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत विश्वाचा निर्माता या ईश्वराच्या स्थानालाही धक्का देणारा ठरला. बायबलमधील संकल्पनेनुसार ईश्वराने विविध प्रजातींची निर्मिती केलेली नसून, आजची वैविध्यपूर्ण जीवसृष्टी एकपेशीय सजीवापासून उत्क्रांतीच्या तत्त्वाच्या आधारे निर्माण झालेली आहे, असे प्रतिपादन डार्विनिझम करतो. अनेक कसोट्यांमधून सिद्ध झालेल्या या सिद्धांताने ईश्वराची आवश्यकता पूर्णपणे नाकारली. बायबलमधील काळाचे गणितही भूगर्भातील जीवाश्मांच्या संशोधनाने खोटे ठरवले गेले. १९व्या शतकात जीवसृष्टीच्या संदर्भात अनावश्यक ठरलेला अस्तित्ववाद २०व्या शतकात विश्वाच्या महास्फोट सिद्धांतामुळे संपूर्ण विश्वाकरिताही अनावश्यक ठरला. अशा प्रकारे ईश्वराच्या अस्तित्वाचा वैश्विक सुरचना तत्त्वाच्या आधारे केला गेलेला ख्रिस्ती धर्माचा दावा प्रबोधन काळात प्रामुख्याने विज्ञानवादाच्या आधारे पूर्ण फेटाळला गेला.

अक्विनासच्या तर्कप्रधान ‘ईश्वर’ संकल्पनेला छेद देणारी मांडणी करून ईश्वराचे अस्तित्व नास्तिकतावाद्यांनी नाकारले. परंतु, ज्या मानवी तर्कप्रधानतेचे आरोपण ख्रिस्ती विचारवंतांनी ‘ईश्वर’ तत्त्वावर केले, त्याच तर्कप्रधानतेचे आरोपण या सममितींच्या माध्यमातून नास्तिकतावाद्यांनी विज्ञानावर आणि त्याद्वारे निसर्गावर व संपूर्ण जडविश्वावर केले. त्यामुळे विश्वाचे यथास्थिती आकलन करून घेऊन त्याविषयी नियम बनवण्याऐवजी तर्कप्रधानता आणि सममिती या कल्पित आदर्शाच्या आधारे वैश्विक सुरचना तत्त्वाचा आभास निर्माण केला गेला. अशा प्रकारे ख्रिस्ती पार्श्वभूमीची युरोपीय नास्तिकता ईश्वराला नाकारते, ती एका वेगळ्या विज्ञान नावाच्या ‘ईश्वर’ तत्त्वास मान्यता देऊनच! त्यामुळेच आधुनिक वैज्ञानिक जग वैश्विक पार्श्वप्रारणाच्या सिद्धांतात सर्वप्रथम सममिती शोधते आणि त्यातील विषमता सर्वांना अस्वस्थ करून जाते, ती याच तर्कप्रधानतेच्या आग्रहातून. वसाहतवादी मानसिकता आपल्या मनोव्यापारांच्या क्षेत्रात कधीकधी इतकी खोलवर कुठेतरी दडलेली असते की आपले आकलन हे स्वाभाविकपणे युरोपीय चिंतकांच्या गेल्या काही शतकांच्या विचारांची तार्किक परिणीती आहे, हे आपल्या ध्यानातही येत नसते.

हिंदूंची विश्वनिर्मिती संकल्पना उत्पत्ती-स्थिती -लय या चक्रात अविरत फिरत असते. त्यासाठी कोणत्या विशिष्ट निर्मात्याची आवश्यकता हिंदू विचारात नाही. सांख्य मतानुसार तर पुरुष आणि प्रकृती ही भिन्न तत्त्वे असून प्रकृतीच्या चक्रात पुरुषाचा कोणताही हेतुपूर्वक सहभाग नसतो. प्रकृतीच्या चक्राच्या अविरत फिरत राहण्यास ईश्वर तत्त्वाची आवश्यकता बौद्ध आणि जैन मते नाकारतात. ईश्वरतत्त्वाचे इंद्रियगम्य नसणे आणि त्याची इंद्रियातीत अनुभवसिद्धता या तत्त्वाचेही प्रतिपादन अनेक हिंदू तत्त्वमते करतात. त्यामुळे एका अर्थी अज्ञेयवाद, निरीश्वरवाद किंवा नास्तिकतावाद हे हिंदूंच्या दर्शनांमध्ये प्राचीन काळापासूनच समाविष्ट आहेत. नैय्यायिकांनी आणि वैशेषिकांनी जडद्रव्यप्रधान विश्वाच्या आकलनाची तर्कप्रधान परंपरा जोपासली आहे. परंतु, या विविध दर्शनांच्या आकलनाला युरोपीय चिंतनातील नास्तिकता आणि अज्ञेयवादाशी समकक्ष समजणे चूक ठरेल. सर्वप्रथम ‘रिलिजन’ची ईश्वरसंकल्पना आत्मतत्त्वाच्या भारतीय संकल्पनेशी समकक्ष नाही, हे आपण पाहिलेलेच आहे. त्यामुळे मानवी बुद्धीच्या मर्यादा आणि बुद्धीच्या पलीकडचे ‘स्व’चे अस्तित्व या संकल्पना युरोपीय मनासाठी परकीय आहेत आणि तर्कप्रधानता हा ईश्वराचा आवश्यक गुणधर्म असल्याचे भारतीय मनास पटत नाही. आपल्या बुद्धीस न कळणार्या गोष्टी माया किंवा लीला आहेत असे समजून आपण सहज पुढे जाऊ शकतो. तर्कगम्य अशा ईश्वरीय हेतूच्या तत्त्वाचा अव्हेर भारतीय चिंतनाने केल्यामुळे ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धतेचे अवलंबित्व भारतीय संकल्पनेनुसार वैश्विक सुरचना तत्त्वावर नाही.

धर्म नाकारण्यातून आलेली तत्त्वे वसाहतवादी मानसिकतेतून तशीच्या तशी स्वीकारताना याच प्रकारच्या वैचारिक प्रवाहांनी कोणत्या दिशा आपल्या सांस्कृतिक इतिहासात अंगीकारल्या होत्या, त्याचे आकलन महत्त्वाचे आहे. या प्रवाहांचे युरोपातील विकसन वैश्विक सुरचना तत्त्वाच्या आकलनाच्या आधारे कसे झाले, ते आपण पाहिले. न्यायाच्या आणि नीतिमत्तेच्या तत्त्वाचा विचार नास्तिकता आणि अज्ञेयवादाच्या संदर्भात पुढील भागात आपण करू. या विचारप्रवाहांचे सुयोग्य ऐतिहासिक मूल्यमापन भारतीय परिप्रेक्षात करणे, निर्वसाहतीकरणाची दिशा ठरवण्यास आवश्यक आहे.

डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
९७६९९२३९७३


Powered By Sangraha 9.0