आधीच मर्कट त्यात...

26 Aug 2025 22:14:12

राजकारणात नेत्यांनी, मंत्र्यांनी पुरेपूर सावधगिरी बाळगूनच वक्तव्ये केली पाहिजेत, अन्यथा त्याचे किती गंभीर परिणाम भोगावे लागतात, हे वेळोवेळी विविध प्रकरणांतून समोर आले आहेच. मात्र, तरीही काहीबाही बरळून मुद्दाम वाद ओढवून घेण्याची काही नेतेमंडळींची खुमखुमी काही केल्या कमी होत नाही आणि काहींची जीभ तर अगदी सैल सुटलेली. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारीही त्याला अपवाद नाहीत. राज्यातील वाढत्या नशेखोरीच्या समस्येवर बोट ठेवताना, त्यांनी मध्य प्रदेशच्या महिला या देशभरात सर्वाधिक मद्यपान करीत असल्याचे धक्कादायक विधान केले. साहजिकच, त्यांच्या या विधानावरुन गदारोळ उडाला आणि भाजपनेही त्यांच्यावर सडकून टीका केली. आपल्याच राज्यातील माताभगिनींविषयी बोलताना जितू पटवारींनी अक्षरशः सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा महिलांविषयक कलुषित दृष्टिकोन यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आला.

एवढेच नाही, तर "मध्य प्रदेशात बेरोजगारी वाढल्यामुळे जर तुमचा मुलगा घरी दारू ढोसून घरी येत असेल, तर त्यासाठी शिवराजसिंह चौहान, मोहन यादव आणि भाजपच जबाबदार आहे,” असा आरोपही पटवारींनी केला. मग ज्यावेळी कमलनाथ यांचे सरकार होते, तेव्हा मध्य प्रदेशात बेरोजगारी नव्हती का, याचेही उत्तर पटवारींनी द्यायला हवे. पण, तथ्यहीन बोलण्याची काँग्रेसमध्ये राहुल गांधींपासूनच म्हणा मोठी परंपरा, मग त्यात पटवारींसारख्या वाचाळवीरांनी तरी मागे का राहावे! या पटवारींनी माताभगिनींनाही मद्यपी ठरवून, मध्य प्रदेशच्या मातृशक्तीचा अपमानच केला. पटवारींच्या या वादग्रस्त वक्तव्यावर याविषयी काहीएक माहिती नसणार्यांचा कदाचित विश्वासही बसू शकतो. म्हणून माहिती घेतली असता, ‘राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणा(२०१९-२१)’नुसार, अरुणाचल प्रदेशात मद्यपान करणार्या महिलांची संख्या ही २६ टक्के असून, मध्य प्रदेशात हे प्रमाण १.६ टक्के नोंदवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आपल्याच राज्याला, राज्यातील माताभगिनींना राजकीय हेवेदाव्यांपोटी अशा प्रकारे बदनाम करणे, हे सर्वस्वी अशोभनीयच! त्यामुळेे मध्य प्रदेशात ‘लाडली बहना योजना’ यशस्वीरित्या राबवून, महिला सक्षमीकरणात बाजी मारणारे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कुठे आणि महिलांवर मद्यपानाचा ठपका ठेवणारे हे राजकीय पत घटलेले पटवारी कुठे!

बिहारप्रेमाचे भरते...

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची सध्या ‘व्होटर अधिकार यात्रा’ सुरू आहे. मोदी सरकारने मतचोरी करून कशा निवडणुका जिंकल्या, याचा अपप्रचार करीत, मतदारांची सहानुभूती लाटण्यासाठीच ही खरं तर राजकीय स्टंटबाजी! २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही राहुल गांधींनी ‘भारत जोडो’ नामक यात्रा केरळ ते काश्मीरपर्यंत काढून, अशीच वातावरणनिर्मिती करण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला होता. पण, तरीही सुज्ञ भारतीय मतदार राहुल गांधींच्या खोट्या आश्वासनांना कदापि भुलले नाही. आताच्या यात्रेतही एकटे राहुल गांधीच नाही, तर काँग्रेसचे देशभरातील नेतेही हजेरी लावताना दिसतात. गांधी घराण्याच्या ‘निष्ठावंत’ यादीत राहण्यासाठी असे क्षणभर का होईना, अशा यात्रा-जत्रांमध्ये काँग्रेसी नेत्यांनी झळकणे, म्हणा क्रमप्राप्तच!

परंतु, राहुल गांधींप्रमाणे काँग्रेसच्या अन्य राज्यांतील नेत्यांनाही बिहारी जनतेशी, तेथील संस्कृतीशी काहीएक देणेघेणे नाही. त्यांपैकी काहींना तर आपल्या राज्यात बिहारी स्थलांतरित नागरिकही डोळ्यांत सलतात. काल-परवा बिहारच्या या यात्रेत सहभागी झालेले तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी हेही त्यांपैकीच एक. २०२३ साली मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. रेड्डी म्हणाले होते की, "माझा डीएनए तेलंगणचा आहे. केसीआर यांचा डीएनए बिहारचा आहे. केसीआर हे कुर्मी जातीचे आहेत. ते बिहारमधून विजयनगरम्मध्ये आणि नंतर तेलंगणात स्थायिक झाले. पण, तेलंगणचा डीएनए हा बिहारच्या डीएनएपेक्षा उत्तम आहे.” त्यांच्या या विधानावर तेव्हा जदयु आणि काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राजदने आक्षेप नोंदवला होता. पण, रेड्डी यांनी माफी काही मागितली नाही. तशीच गत काँग्रेसचे पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांची. त्यांनी तर थेट युपी-बिहारींना हाकलण्याची भाषा केली होती आणि त्यावर प्रियांका गांधींनी तेव्हा टाळ्याही पिटल्या होत्या. पण, आज त्याच रेवंथ रेड्डी आणि प्रियांका गांधींना या यात्रेत निमंत्रित करून, तेजस्वी यादव यांनी बिहारचा, बिहारी जनतेचा अपमानच केला आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांचा ‘बिहारी बाणा’ आणि प्रादेशिक अस्मितेचा देखावा, हा जनतेसमोर आहेच. तेव्हा, बिहारला तुच्छ लेखणार्यांना तेथील जनता गुडघ्यावर आणते का, ते बघणे आता औत्सुक्याचे!

Powered By Sangraha 9.0