बीडीडीचा ‘तो’ कार्यक्रम अन् मोतीलाल नगरच्या आशा पल्लवित! ५५६ कुटुंबांना वेळेत घराच्या किल्ल्या मिळाल्याने जनमताचा रेटा पुनर्विकासाकडे

26 Aug 2025 19:32:45

मुंबई, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वरळीच्या बीडीडी चाळीतील ५५६ कुटुंबांना त्यांच्या नव्या घराच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या. ही घटना मुंबईच्या अनेक प्रलंबित पुनर्विकास प्रकल्पांच्या आणि तेथील रहिवाशांच्या आशा पल्लवित करणारी ठरली असून गोरेगावातील मोतीलाल नगरसारख्या वसाहतींत जनमताचा रेटा आता मोठ्या प्रमाणात म्हाडाच्या, पर्यायाने पुनर्विकासाच्या बाजूने झुकताना दिसत आहे.

वरळीतील बीडीडी चाळीचा पुनर्विकास प्रकल्प हा अनेक वर्षे असंख्य अडथळ्यांची मोठी मालिका असलेला प्रकल्प ठरला. मात्र ही मालिका यशस्वीपणे पार करत अखेर पहिल्या टप्यातील ५५६ कुटुंबांना पुनर्वसन करून नव्या घरांचा ताबा देण्यात म्हाडाला यश मिळाले. १४ ऑगस्ट रोजी माटुंग्यात यशवंत नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच, महाराष्ट्र सरकारमधील अनेक प्रमुख मंत्री, प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. अशा ‘व्हीव्हीआयपी’ कार्यक्रमातून नव्या सदनिकांचा ताबा रहिवाशांना देत शासनाने मुंबईतील अनेक रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांतील हजारो रहिवाशांना ‘योग्य तो’ संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

वरळी बीडीडीमध्ये शासनाने विकासक न नेमता खुद्द म्हाडामार्फतच जागतिक निविदा काढून पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे आधीचा विलंब टाळून निर्धारित वेळेत, दर्जेदार बांधकामासह प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात ही बाब अधोरेखित करताना मुंबईतील अन्य प्रकल्पांचा उल्लेख करत शासन त्यांच्याही पूर्ततेकरिता कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुंबईच्या पुनर्विकास प्रकल्पांना निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकल्पात ‘सेलेबल कॉम्पोनंट’इतकीच दर्जेदार घरे स्थानिक रहिवाशांना देण्यात आल्याची बाब अधोरेखित केली. त्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा आता मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांवर होऊ लागल्याचेही दिसत आहे. तसेच, मोतीलाल नगरसारख्या भागांतही आतापर्यंत सुरु असलेल्या प्रकल्पविरोधी समित्या-संघटनांचा प्रचाराचा जोर नाहीसा होऊ लागला असून म्हाडाच्या बाजूने उभे राहण्याकडे कल वेगाने वाढताना दिसत आहे.

‘ही सोन्यासारखी गुंतवणूक’.. मुख्यमंत्र्यांचा इशारा कोणाला?

“वरळी बीडीडीत आधीच्या १६० चौ. फुट घरांऐवजी ५५० चौ. फुटांचे घर देण्यात आले आहे. हे केवळ बांधकाम नसून तुमच्या पुढील पिढ्यांसाठी सोन्यासारखी गुंतवणूक आहे. त्यामुळे हे घर विकू नका.”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी माटुंग्यातील कार्यक्रमात ठळकपणे सांगितले. मोतीलाल नगरसारख्या कमी घनतेच्या वसाहतीत विद्यमान २८० चौ. फुट बांधकाम क्षेत्राच्या सदनिका धारकांना म्हाडाने तब्बल १६०० चौ. फुट बांधकाम क्षेत्राचे घर देऊ केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ वाक्य केवळ बीडीडीपुरते नसून मोतीलाल नगरसारख्या अनेक ठिकाणच्या रहिवाशांसाठी मोलाचा सल्ला आहे. रहिवाशांनी याचा गर्भितार्थ ओळखून लवकरात लवकर म्हाडाच्या पाठीशी उभे राहायला हवे, असे मत मोतीलाल नगर वसाहतीत दीर्घकाळ राहिलेल्या एका ज्येष्ठ रहिवाशाने व्यक्त केले.

आता शासनाच्या अजेंड्यावर मोतीलाल नगर?

गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगर १, २ व ३ च्या पुनर्विकासासाठी म्हाडाने सी&डीए म्हणजेच बांधकाम व विकास संस्था नियुक्त करून आपल्याच नियंत्रणात प्रकल्प राबवण्याचे ठरवले आहे. राज्य शासनानेही याला ‘विशेष प्रकल्पा’चा दर्जा दिला आहे. १४२ एकर जागेवर सुमारे ३७०० सदनिका धारकांना १६०० चौ. फुट बांधकाम क्षेत्राची घरे तर सुमारे ३०० व्यावसायिकांना ९८७ चौ. फुट बांधकाम क्षेत्राचे व्यावसायिक गाळे मिळणार आहेत. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानेही नुकतेच या प्रकल्पातील सर्व अडथळे कायदेशीररित्या दूर केले. यामुळे फडणवीस सरकारच्या अजेंड्यावर धारावीप्रमाणेच मोतीलाल नगर हादेखील ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असल्याचे स्पष्ट होत आहे.

मोतीलाल नगरमध्ये ‘बीडीडी’चे सकारात्मक पडसाद

“बीडीडीच्या लोकांना मिळालेली नवी घरे खूपच आकर्षक असल्याचे आम्ही टीव्हीवर पाहिले. आम्हालाही पुनर्विकास हवा आहे. बीडीडीमधील लोकांना मिळाली त्यापेक्षा तिप्पट, जवळपास १६०० चौ. फुटांची घरे आम्हाला मिळणार असल्याचे मला समजले. त्यामुळे म्हाडाने लवकरात लवकर आमच्या पुनर्विकासाचे काम सुरु करायला हवे.”, अशी प्रतिक्रिया मोतीलाल नगरमधील रहिवासी मोहम्मद शेख यांनी दिली. तसेच, “आम्हाला नवी आणि प्रशस्त घरे आधुनिक सोयी-सुविधांसह हवी आहेत तीही आमच्याकरिता नव्हे तर आमच्या मुलांसाठी आणि त्यांच्या पुढच्या पिढीसाठी. या अशा दुरवस्थेत आम्ही आणखी किती काळ राहणार?” असा प्रश्न उपस्थित करत, “२०१० पासून आम्ही पुनर्विकासाची वाट पाहत आहोत. नुकतीच नवी घरे प्राप्त झालेले बीडीडी चाळीतील रहिवासी खूपच नशीबवान आहेत. आम्हालाही हा दिवस पाहायला मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.”, असे मत नेहा गुप्ते यांनी व्यक्त केले. “आम्ही वर्षानुवर्षे गळक्या, जीर्ण-असुरक्षित घरांत राहत असून त्यामुळेच म्हाडाचा पुनर्विकास प्रकल्प ही आमच्या सुरक्षित, सुखी-समृद्ध जीवनासाठीची सुवर्णसंधी असेल”, अशी प्रतिक्रिया शर्विन देसाई यांनी दिली. या प्रतिक्रिया पाहता बीडीडीच्या कार्यक्रमाचे मोतीलाल नगरमध्ये सकारात्मक पडसाद उमटले असून जनमत पुनर्विकासाच्या बाजूने झुकले असल्याचेच स्पष्ट होत आहे.


Powered By Sangraha 9.0