उपसंहार योग : एक जीवनशैली - लेखांक ५५ (भाग ६)

25 Aug 2025 22:11:47

योग म्हणजे कोणतेही काम करताना समतोल, एकाग्रता आणि समर्पणभावना. अशा या योगसाधनेला दि. २१ जून २०१५ रोजी हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून संयुक्त राष्ट्राने घोषित केल्यानंतर जागतिक पातळीवर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असले तरी, भारतीय संस्कृतीत योगाला फार पूर्वीपासून अद्वितीय स्थान आहे. पण, योगसाधना म्हणजे केवळ व्यायामप्रकार नाही, तर ती एक जीवनशैली आहे. तेव्हा, योगाचा विचार त्या दृष्टिकोनातून करायला हवा. या उद्देशानेच योगोपचारतज्ज्ञ समुपदेशक डॉ. गजानन जोग यांच्या प्रारंभ केलेल्या ‘योगसंदेश’ या लेखमालिकेतील हा शेवटचा भाग. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांना या लेखमालिकेतून योगसाधनेकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन प्राप्त झाला असेल, अशी आम्ही आशा करतो. आपल्या दैनंदिन जीवनातही ही योगसाधना अशीच निरंतर राहो आणि सर्वांना स्वास्थ्य प्रदान करो, हीच प्रार्थना...


माझ्या ५० वर्षांच्या अनुभवातून प्राप्त झालेले योगिक ज्ञान समाजापर्यंत पोहोचावे, या नम्र भावनेने, लठ्ठ पगाराची राष्ट्रीयकृत बँकेची नोकरी गुरूआज्ञेनुसार वयाच्या ४७व्या वर्षी, निवृत्तीच्या १४ वर्षे आधी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सोडली. स्वेच्छानिवृत्तीमागे माझा योगप्रसार हाच उद्देश होता. लगेचच गुरूंच्या नावाने श्री गजानन योगमंदिर हे केंद्र काढून योगोपचार व समुपदेशनाचे, जवळजवळ ३५ वर्षे निरनिराळ्या ठिकाणांहून शिकून अभ्यास करून मिळवलेले, ज्ञानप्रसाराचे कार्य सुरू केले. वैयक्तिक स्तरावर अनेक स्त्री, पुरुष, तरुण, वयस्कर, वृद्ध, किशोर यांना योगोपचाराचे वैयक्तिक पाठ देऊन तसेच संस्था स्तरावर समुपदेशक म्हणून योग-एक जीवनशैली आहे, हे समजावून देण्याचे गेली २४ वर्षे काम केले. त्याबद्दल बँका, इन्श्युरन्स कंपन्या, सरकारी आस्थापना व इतर संस्थांचे आभार. त्यांपैकी अनेक लहान, थोरांनी पुस्तक लिहा, अशा सूचना दिल्या. माझी योगाभ्यास समजावून देण्याची व समुपदेशनाची सोपी पद्धती आपले योगभ्यासी पंतप्रधान माननीय मोदी यांना खूप भावली असावी; त्यामुळे दरवर्षी प्रोत्साहनपर त्यांच्यातर्फे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा येतात. शेवटी लेख लिहावे, ही आज्ञा मिळाली. बर्याच वर्तमानपत्रांच्या संपादकांना विचारणा केली असता "एखादा-दुसरा लेख प्रसिद्ध करू, मालिका नाही,” असंच उत्तर यायचं. पण, लेखांचा विषय व मांडण्याची सोपी व सरळ पद्धत दै. ‘मुंबई तरुण भारत’ या वर्तमानपत्राला भावली व त्यांनी शेवटी या सेवाकार्यास होकार दिला व ‘योग संदेश’ या शीर्षकाखाली दर मंगळवारी याप्रमाणे एक दोन नव्हे, तर तब्बल ५४ लेख त्यांनी प्रसिद्ध केले, त्याबद्दल मी त्यांचा अंतरात्म्यापासून ऋणी आहे.

या सर्व लिखाणाचा उद्देश म्हणजे योग ही एक जीवनशैली आहे, केवळ व्यायामाचे शास्त्र नाही, हे समाजमनापर्यंत बिंबवणे हा आहे. याप्रकारे अभ्यास केला गेल्यास ती साधना ठरते व अशा योगसाधकांमध्ये धैर्य, निर्भयता, पर्याप्तता व पावित्र्यता हे सद्गुण विकास पावून, अशा व्यक्तीकडून चोरी, भ्रष्टाचार, गुन्हे, बळजबरी, बलात्कार कधीही घडणार नाहीत. या पद्धतीने शाळा-महाविद्यालये, कार्यालयातून योगाचा प्रसार-प्रचार झाल्यास एक दोषविरहित, निकोप, धैर्यशील, निर्वेर, निर्भय, समाधानी व जीवनात पावित्र्य राखणारा समाज निर्माण होण्यासाठी मदत होईल, हे निश्चित आहे.

आज अत्र-तत्र-सर्वत्र योग हे फक्त व्यायामाचे शास्त्र म्हणून शिकवलं जातं व समाजमनावर तसाच परिणाम होताना दिसत आहे. उदाहरणार्थ, एखाद्या घाणेरड्या बाटलीत, ती स्वच्छ न करता पिण्याचे पाणी भरून ते पाणी पिऊन जसे शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम होतील, तसेच योग हे निव्वळ आसने, प्राणायाम करून व्यायाम म्हणून स्वीकारल्याने होत आहे.

नाही पेक्षा याला अपवाद श्री जनार्दन स्वामी आश्रम, नागपूर, शिवानंद स्वामी उत्तर प्रदेश, धिरेंद्र ब्रह्मचारी, नैनीताल, ब्रह्मलीन योगीराज हरकरे, नागपूर इत्यादी, श्रेष्ठ योगसाधक होते, हे सांगणे न लगे.

योगाचा खरा परिणाम यम, नियम आचारणात आणून आसने निव्वळ व्यायाम नव्हे, तर योगासने म्हणून अवलंबिल्याने आपले जीवनावर होणार आहे. आपले जीवन बदलणार आहे, हे आज कोणीही लक्षात घेत नाहीत; कारण त्या पद्धतीने योग शिकवला जात नाही.

नवीन पिढी पुढे तर अल्प अनुभवाने, कमीत कमी कपड्यांत शरीराचे प्रदर्शन करत आसने करतानाचे असंख्य व्हिडिओत जे दिसतं, ते म्हणजेच योग, असं असत्य दर्शन योगशास्त्राच घडत आहे, हे दुर्दैव आहे.

हे म्हणजे योग नव्हे, हे लक्षात घेऊन आपण खर्या योगशास्त्राचा अभ्यास करून योगसाधना केली पाहिजे, ज्याने आपलं वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन व पर्यायाने राष्ट्रजीवन आदर्श बनणार आहे, हे लक्षात यावं, म्हणून हा लेखप्रपंच केला. तो वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं सहकार्य दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केले आहे. त्यामुळे या समाजसेवेत त्यांचे मोठं योगदान आहे, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

अनेक दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वाचक, सोशल मीडियाधारक यांनी लेख वाचून खूप चांगले अभिप्राय दिले. काहींनी या कार्यास आशीर्वाद दिले. ‘पुस्तक प्रसिद्ध करा,’ म्हणून सूचवले, तर काहींनी सोशल मीडियावर लेखांस नुसतेच अंगठे आणि नमस्कार पाठवले. त्यांनीही वाचले असावेत, असे मी गृहीत धरून चालतो.

शारीरिक व मानसिक रोग, व्याधी बरे करणे, हे देखील योगशास्त्राचे एक अंग आहे. त्याला ‘योगोपचार’ हे साजेसं नाव दिलं आहे. गेल्या २४ वर्षांच्या ‘योगोपचारतज्ज्ञ’ या भूमिकेतून गुरूंच्या कृपेने अनेक रोगी, व्याधिग्रस्त, मनोरुग्ण दूरस्त करून त्यांना स्वास्थ्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याच अनुभवातून संधिवात, अंगदुखी, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह इत्यादी सर्वत्र आढळणार्या व्याधींवर चित्र, आकृती व कृती यांसह काही लेख या ‘योगसंदेश’ लेखमालेत प्रसिद्ध केले. त्या लेखातील कृतींसंबंधी तांत्रिक शब्द जसेच्या तसे काहीही बदल न करता चित्रांसह छापले त्याबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’चे पुनश्चआभार.

लेखन पूर्ण करण्यापूर्वी सर्व दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकवर्गाचे व हेच लेख सोशल मीडियावर टाकलेल्या दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून आलेल्या सॉफ्ट कॉपीचे वाचन करणार्या वाचकवर्गाचे, वाचून उत्तम अभिप्राय देणार्या शुभचिंतकांचे तसेच सर्व लेखांचा संच करून पुस्तक प्रसिद्ध करावे, असे प्रोत्साहन देणार्या सर्वांचे मनापासून आभार.

सर्व लिखाणास, लेखणी काढी अक्षर| परी तो तिच्यांत नाही जोर| गुरू गजाननाची कृपा थोर| लेखन रूपी कार्याला| असे व्यक्त होऊन त्यांनी सांगून ठेवलेले वचन ॥सशक्त आपुल्या राष्ट्रातें| करणें असल्या योग शिका॥ हे आठवून आपली रजा घेतो.

इतःपर लेखांमध्ये अधिक-न्यून झाले असल्यास वाचकांची क्षमा मागून पुन्हा भेटू, हा आशावाद व्यक्त करतो.

डॉ. गजानन जोग
(लेखक योगोपचारतज्ज्ञ समुपदेशक आहेत.)
९७३००१४६६५

Powered By Sangraha 9.0