
‘आधी स्वत:ची चांगली काळजी घ्या’ असे आपण सातत्याने ऐकत असतो आणि इतरांना सूचवितही असतो. पण, ‘स्वत:ची काळजी घेणे’ याचा अर्थ प्रत्येकजण आपल्या सोयीने लावतो. कुणी व्यायामाकडे वळतं, तर कुणी अध्यात्माकडे. पण, या ‘स्व-देखभाली’त केवळ शारीरिक काळजी घेणे, एवढाच अर्थ अपेक्षित नसून यामध्ये मानसिक, भावनिक देखभालही तितकीच महत्त्वाची. तेव्हा, नेमके स्वत:ची काळजी घ्यायची, स्व-देखभाल करायची, म्हणजे नेमके काय करायचे, ते समजून घेऊया. ताणावावर स्वतः नियोजन करत मात करण्याचे उपाय प्रत्येकासाठी एकसारखे प्रभावी नसतात. प्रत्येक परिस्थिती वेगळी असते, तसेच प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये वेगळी असतात. त्यामुळे स्व-देखभाल आणि तणावावर नियंत्रण ठेवण्याची पद्धत वैयक्तिकरित्या निवडणे आवश्यक आहे. ज्या गोष्टी एका व्यक्तीस शांतता देतात, त्या कदाचित दुसर्यासाठी उपयुक्त असतीलच, असे नाही आणि हे अगदी नैसर्गिक आहे. "तुला कसं जमलं? मला का नाही जमत?” यात कुणाला काहीच न्यूनगंड वाटू नये. महत्त्वाचे म्हणजे, तुमच्यासाठी सर्वाधिक प्रभावी अशी तणावमुक्तीची रणनीती शोधणे आवश्यक आहे. लोकांसाठी योगासने, धावणे किंवा इतर शारीरिक व्यायामातून समाधान मिळते, तर काही लोक छंद ध्यान, लेखन किंवा आत्मपरीक्षण यातून मनःशांती अनुभवतात.
स्व-देखभालविषयीचे गैरसमजआज समाजमाध्यमांवर आणि बाजारपेठेत ‘स्व-देखभाल’ हा शब्द खूप गाजत आहे. त्यामुळे त्याबद्दल अनेक गैरसमज तयार झाले आहेत. बरेच लोक मानतात की, ‘स्व-देखभाल’ म्हणजे महागडी उत्पादने विकत घेणे, सुट्ट्या काढणे किंवा ऐशआरामात राहणे. स्व-देखभाल म्हणजे फक्त शरीराची काळजी घेणे, असा अर्थ काढणे इथे चुकीचे आहे. व्यायाम आणि झोप शरीरासाठी महत्त्वाची असली, तरी मनःशांती, सकारात्मक विचार, मानसिक संतुलन यांचाही यात महत्त्वाचा समावेश आहे. ही कधीमधी मनाला वाटले की केलेली गोष्ट आहे-चुकीचे आहे. सातत्याने केलेल्या छोट्या छोट्या सवयीच खरी स्व-देखभाल घडवतात. नियमित व्यायाम, पौष्टिक आहार, नियमित झोप यामुळेच तणाव कमी होतो. प्रत्यक्षात हे खरे नाही. खरी स्व-देखभाल यापेक्षा कितीतरी व्यापक सर्वांगीण आणि परिणत संकल्पना आहे. मित्र, कुटुंब, शेजारी यांच्यासोबत नात्याची वीण घट्ट करणे, जरूर पडल्यास मदत मागणे, हेही ‘स्व-देखभाली’चाच भाग आहे.
वैयक्तिक ‘स्व-देखभाल’ का महत्त्वाची?प्रत्येक व्यक्तीची गरज वेगवेगळी असते. काहींना सकाळी धावणे आनंद देतं, तर काहींना संध्याकाळी शांतपणे फिरायला जाणं जास्त उपयोगी ठरतं. समाजाभिमुख स्वभावाच्या लोकांना मित्रांच्या सहवासात ऊर्जा मिळते, तर अंतर्मुखांना एकांताची गरज भासते.
म्हणूनच ‘स्व-देखभाल’ ही सर्वांसाठी एकच मापदंड पद्धतीने होत नाही. ती पूर्णपणे वैयक्तिक असते. आपल्याला सुरक्षित, शांत आणि पोषक वाटेल, अशा पद्धती निवडणे हा या प्रवासाचा मुख्य आधार आहे.
स्व-देखभालीचे फायदे१. स्वतःच्या गरजा आपल्याला ओळखता येतात.
‘स्व-देखभाल’ करताना आपण स्वतःकडे हेतुपुरस्सर लक्ष देतो. ही जागरूकता जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत करते. आपल्या देशात स्त्रियांसाठी हा दृष्टिकोन आवश्यक आहे.
२. तणाव कमी होतो
आजच्या युगात तणाव टाळता येत नाही. पण, ‘स्व-देखभाल’ तणावावर नियंत्रण ठेवते. झोपेचे प्रश्न, थकवा, हृदयविकाराचा धोका हे सगळे कमी होऊ शकतात.
३. नाती अधिक निरोगी होतात
स्व-देखभालीमुळे मन प्रसन्न होते, आत्मविश्वास वाढतो आणि आपण नात्यांमध्ये अधिक प्रामाणिक व सकारात्मक होतो.
४. संपूर्ण कल्याणाचा अनुभव येतो
शरीर निरोगी, मन शांत आणि वैयक्तिक व सामाजिक नाती समाधानकारक असतील, तर जीवन अधिक अर्थपूर्ण वाटते. यालाच खरी सर्वांगीण स्व-देखभाल म्हणता येईल.
‘स्व-देखभाल’ नियोजन कसे करावे?
‘स्व-देखभाल’ हा आयुष्याच्या विविध पैलूंना समतोल राखण्याचा एक मार्ग आहे. सुरुवात करण्यासाठी काही सोप्या पद्धती उपयुक्त ठरतात. गेल्या काही दिवसांत तुम्हाला आनंद व समाधान दिलेल्या गोष्टी आठवणे, स्वतःच्या आवडीनिवडी, स्वभाव व जीवनशैलीचा विचार करणे, तसेच छोट्या कृतींपासून सुरुवात करणे, जसे की दररोज दहा मिनिटे चालणे किंवा आठवड्यातून एकदा मित्राला फोन करणे. दिनचर्येत ‘स्व-देखभाली’साठी वेळ ठरवणे आणि स्वतःशी सकारात्मक संवाद साधणे, उदाहरणार्थ मी स्वतःची काळजी घेण्यास पात्र आहे किंवा माझे मन व शरीर माझी जबाबदारी आहे, हे मनोबल वाढवते. काही वेळा स्वतःहून हे सर्व सुरू करणे जमत नसेल, अशा वेळी थेरपी किंवा समुपदेशन खूप उपयोगी ठरते. ‘स्व-देखभाली’चे विविध पैलू मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि सामाजिक असतात. मानसिक ‘स्व-देखभाल’ म्हणजे छंद जोपासणे, नवीन शिकणे, ध्यान करणे, गरज भासल्यास समुपदेशकांची मदत घेणे, शारीरिक ‘स्व-देखभाल’ म्हणजे पौष्टिक आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि डॉटरांची तपासणी, आध्यात्मिक स्व-देखभाल म्हणजे निसर्गात वेळ घालवणे, प्रार्थना करणे, मूल्यांनुसार जगणे आणि आत्मचिंतन, तर सामाजिक स्व-देखभाल म्हणजे नाती घट्ट करणे, मदत मागणे, गरज असल्यास नाही म्हणणे आणि समाजाशी जोडलेले राहणे.
या सर्व पैलूंचा समतोल राखल्यास मनःशांती, शरीराची तंदुरुस्ती आणि जीवनात संतुलन साधता येते. ‘स्व-देखभाल’ म्हणजे फक्त स्वतःवर प्रेम करणे नाही, तर जीवन अधिक समृद्ध, संतुलित आणि अर्थपूर्ण बनवण्याचा मार्ग आहे. ती आपल्या कृतींमध्ये आहे. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढणे, मनाशी प्रामाणिक राहणे आणि छोट्या छोट्या सवयी सातत्याने जोपासणे, यातूनच खरी स्व-देखभाल घडते. स्व-प्रेम हे प्रेमाचा मूलभूत पाया आहे, स्वतःवर प्रेम नसेल, तर इतरांवर प्रेम करण्याची क्षमता साध्य होत नाही. प्रिन्सेस डायना यांचे एक सुंदर उद्धरण येथे समर्पक ठरेल. "एकमेकांबद्दल आपली प्रेमळ माया व्यक्त करणे हे आवश्यक आहे, पण या प्रक्रियेत आपण स्वतःला विसरून चालणार नाही.”
डॉ. शुभांगी पारकर