वराह जयंती: पराक्रम, नैतिकता आणि सृष्टीच्या संरक्षणाचा जागर

25 Aug 2025 13:03:19

भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरेत प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही दिवस प्रतीकात्मक अर्थ घेऊन येतात त्यातीलच वराह जयंती भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते. हा दिवस भगवान विष्णूंच्या तिसऱ्या अवताराच्या, म्हणजेच वराह अवताराच्या स्मृतीचा आणि त्यांच्या अतुलनीय पराक्रमाचा उत्सव आहे. वराह जयंती हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर तो आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांवर आधारित आहे.

आध्यात्मिक महत्त्व: धर्म आणि सृष्टीचे रक्षण
वराह जयंतीचे मूळ आध्यात्मिक कथांमध्ये दडलेले आहे. पौराणिक कथेनुसार, हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीला पाताळात घेऊन जाऊन समुद्रात बुडवले. यामुळे संपूर्ण सृष्टी अंधःकारात आणि अराजकतेत सापडली. अशा वेळी भगवान विष्णूंनी एका विशाल वराहाचे रूप धारण केले. त्यांनी आपल्या सुळ्यांवर पृथ्वीला वर आणले, हिरण्याक्षाचा वध केला आणि सृष्टीची पुनर्स्थापना केली.

वराह अवतारच का? हिरण्याक्षाला ब्रह्मदेवाचा वर होता. त्याला देव, मनुष्य किंवा राक्षस यांच्याकडून मरण येणार नाही त्यामुळे विष्णुंनी वराह आणि मनुष्य यांचे संयुक्त रुप घेतले. शिवाय त्यास शस्त्राने पण मरण येणार नाही म्हणुन सुळ्यांनी मारले. विष्णुंचे अवतार हे सजीव संक्रमणाचे प्रतिक आहे. जसे जलचर, उभयचर, जंगली प्राणी, मानव ई. वराह अवतार हे केवळ पृथ्वीच्या भौतिक संरक्षणाचे प्रतीक नाही, तर ते धर्म, नैतिकता आणि मानवी मूल्यांच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक आहे. जेव्हा समाजात अधर्माचे वर्चस्व वाढते, तेव्हा परमेश्वर स्वतः विविध रूपांत येऊन त्याचा नाश करतो आणि धर्म पुन्हा स्थापित करतो, हा संदेश या कथेतून मिळतो. म्हणूनच वराह जयंती हा दिवस वाईट शक्तींवर चांगुलपणाच्या विजयाचा आणि परमेश्वराच्या अनंत सामर्थ्याचा अनुभव घेण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी केलेले व्रत आणि पूजा-अर्चा नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात.

सामाजिक महत्त्व: एकता आणि संरक्षणाची शिकवण
हा दिवस आपल्याला एकत्र येण्याची आणि संरक्षणाची शिकवण देतो. जेव्हा पृथ्वी संकटात होती, तेव्हा सर्व देव आणि प्राणी हवालदिल झाले होते. अशा वेळी वराहाने पृथ्वीला बाहेर काढले. वराहाबरोबर वराहसेना होती त्यातून त्याकाळची एकता जाणवते.यातून असा संदेश मिळतो की, समाजाला जेव्हा जेव्हा संकटातून बाहेर काढण्याची गरज असते, तेव्हा सामूहिक प्रयत्न आवश्यक असतात. ज्याप्रमाणे वराहाने पृथ्वीला वाचवण्यासाठी पराक्रम केला, त्याचप्रमाणे आपणही आपल्या समाजातील दुर्बळ घटकांना मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे. हा दिवस आपल्याला पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्त्वही शिकवतो. पृथ्वीला वराहाने आपल्या सुळ्यांवर उचलून वाचवले, आपल्याला पृथ्वी, म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारीची आठवण वराह जयंती करून देते. आजच्या काळात वाढणारे प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदलाचे धोके पाहता, वराह जयंती आपल्याला निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी प्रोत्साहित करते.

सांस्कृतिक महत्त्व: परंपरा आणि नैतिकतेचे संवर्धन
वराह जयंती हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. हा दिवस आपल्याला आपल्या मूळ परंपरा आणि नैतिकतेशी जोडून ठेवतो. या दिवशी विविध धार्मिक विधी, भजन, कीर्तन आणि कथा वाचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. हे कार्यक्रम आपल्या पुढील पिढीला आपल्या प्राचीन परंपरा आणि कथांची ओळख करून देतात. वराहाचे रूप हे केवळ प्राण्याचे नसून, ते त्याग, पराक्रम आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक आहे. वराह अवतार कठीण काळातही आपले कर्तव्य आणि नैतिकता सोडू नये. आपल्याला कर्तव्यनिष्ठ राहण्याची आणि आपल्या मूल्यांवर ठाम राहण्याची प्रेरणा देतो. या दिवशी केले जाणारे दान आणि गरीबांना मदत केल्याने समाजात परोपकाराची भावना वाढण्यास मदत होते.

भगवान वराहांची पूजा केवळ एका अवताराची पूजा नाही, तर त्यांच्या पराक्रमातून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात चांगले बदल घडवण्याचा संकल्प करण्याची प्रेरणा मिळते. आपल्याला आध्यात्मिक मार्गाने सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करण्यास मदत होते.

अंजली तागडे
संपादक विश्व संवाद केंद्र, पुणे
Powered By Sangraha 9.0