मुंबई : पाकिस्तानमध्ये दरवर्षी सुमारे १ हजार अल्पसंख्यांक मुलींचे अपहरण केले जाते आणि त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर घडवले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मूव्हमेंट फॉर सॉलिडॅरिटी अँड पीसने दिलेल्या माहितीनुसार या मुलींचे वय साधारणपणे १२ ते २५ वर्षे इतके असून सध्या परिस्थिती अशी आहे की पोलीस अशा प्रकरणांत कारवाई करत नसल्याचे लक्षात येत आहे.
या प्रकरणी मानवाधिकार संस्था जुबली कॅम्पेन आणि ओपन डोअर्स यांनी दावा केला आहे की अल्पसंख्यांक मुलींच्या अपहरण आणि धर्मांतराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. २०२४ मध्ये १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अनेक मुलींचे अपहरण करण्यात आले. त्याच बरोबर अशी माहिती आहे की, अनेक मुली अशा शोकांतिकेनंतर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आजारी पडल्या. तर दुसरीकडे आरोपी मात्र खुलेआम फिरत आहेत. न्यायालय अनेकदा अशा प्रकरणांत आरोपींचे हे युक्तिवाद मान्य करते की मुलीने स्वतःच्या इच्छेने धर्मांतर करून निकाह केला आहे.
ईशनिंदा कायद्याचा अल्पसंख्याकांविरुद्ध गैरवापरपाकिस्तानात धार्मिक अल्पसंख्यकांची स्थिती अत्यंत वाईट असून 'द व्हॉइस ऑफ पाकिस्तान माइनॉरिटी'ने याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. संस्थेचे म्हणणे आहे की पाकिस्तानमध्ये ईशनिंदा कायदा लागू झाल्यानंतर त्याचा वापर अल्पसंख्यकांना धमकावण्यासाठी आणि हिंसा भडकावण्यासाठी होत आहे. संस्थेने असेही सांगितले की अल्पसंख्यकांचे जबरदस्तीचे धर्मांतर आणि लहान वयात होणारे निकाह सुरूच आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायद्यांचा येथे काहीही उपयोग होत नाही. ईशनिंदा कायदा आल्यापासून अल्पसंख्यकांची अवस्था अधिकच दयनीय झाली आहे. इस्लामी जमाव कोणालाही याचा बळी बनवतो. न्यायालयात बार असोसिएशन देखील त्यांचाच पक्ष घेतो. कट्टरपंथी मानसिकतेविरुद्ध कोणीही बोलत नाही.