लाडकी बहिण योजना Update ; ‘त्या’ लाभार्थी महिला अपात्र

25 Aug 2025 19:28:36

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे २६ लक्ष लाभार्थी महिला अपात्र असून त्यांच्यावर योग्य कारवाई होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. सोमवार, २५ ऑगस्ट रोजी त्यांनी ‘एक्स’ अकाऊंटवरील पोस्टमध्ये यावर भाष्य केले.



मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे २६ लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. सदर सुमारे २६ लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे.”

“छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल. तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पुवर्वत सुरु राहील,” असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0