वादग्रस्त इन्फ्लूएन्सर्स ते लोकप्रिय अभिनेते, 'बिगबॉस १९'च्या घरात कोणी कोणी केली एन्ट्री?

    25-Aug-2025
Total Views |


मुंबई: छोट्या पडद्यावरचा अत्यंत वादग्रस्त शो म्हणजेच बिग बॉस (Bigg Boss). बिग बॉस हिंदीचं हे १९वं पर्व आहे. तर या पर्वाची सुरुवात रविवार २४ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. रविवारी Bigg Boss 19 बिग बॉसचा ग्रँड प्रीमियर पार पडला. गेले काही दिवस शोमध्ये कोणकोण स्पर्धक असणार याची चर्चा रंगली होती. शोमध्ये अनेक वादग्रस्त स्पर्धकांची एन्ट्री झाली असून, शोचा होस्ट सलमान खानने या भागातील सर्वांची ओळख करुन दिली. या सीझनला 16 स्पर्धक सहभागी झाले आहेत. पुढचे काही महिने हे 16 स्पर्धक बिग बॉसच्या एकमेकांविरुद्ध लढताना दिसतील.

बिग बॉसच्या घरात नेहमीच चर्चेत राहणारे चेहरे पाहायला मिळतात. यावेळीही अशाच स्पर्धकांना निवडण्यात आलं आहे. एकूण 16 स्पर्धकांची एन्ट्री झाली असून, 3 वाइल्ड कार्ड स्पर्धकही लवकरच या शोमध्ये सहभागी होणार आहेत. यावर्षीच्या पर्वात काही अभिनेते-अभिनेत्री, इन्फ्लूएन्सर्स, गायक, कॉमेडियन आणि वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहेत. एक मराठी इन्फ्लूएन्सर देखील यावेळी शोमध्ये पाहायला मिळत आहे. 'घरवालों की सरकार' अशी यंदाच्या पर्वाची थीम आहे. यामुळे बिग बॉसच्या घरात असा ट्वीस्ट असेल की, या सीझनमध्ये सर्व घरातील सदस्य संपूर्ण घराचे नियंत्रण त्यांच्या हातात घेतील. यामुळे कोण कोणाशी युती करणार आणि कोण कोणाचे सरकार पाडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. एकूनच तगडं राजकारण छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

यावेळी बिगबॉसने कोणाला संधी दिली?

‘गँग्ज ऑफ वासेपूर’ फेम अभिनेता झीशान कादरी, बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी अशनूर कौर, महाकुंभमेळ्यादरम्यान चर्चेत आलेली तान्या मित्तल यांची सुरुवातील एन्ट्री झाली. त्यानंतर आवेज दरबार आणि नगमा मिरजकर या इन्फ्लूएन्सर जोडीची एन्ट्री झाली. सोशल मीडियावर त्यांचे एकत्र अनेक रील व्हायरल होतात, शिवाय दोघे रिलेशनशिपमध्येही आहेत. मॉडेल नेहल चुडासमा, अभिनेता बशीर अली आणि अभिनेता अभिषेक बजाज यांचीही शोमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली.

हिंदी टीव्हीवरील प्रेक्षकांचा लाडका अभिनेता गौरव खन्नाही या शोमध्ये सहभागी झाला आहे. 'अनुपमा' या मालिकेतून त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली होती, याशिवाय अलीकडेच त्याने सेलिब्रिटी मास्टरशेफ हा शोही जिंकला होता. या पर्वात Natalia Janoszek ही परदेशी मॉडेलही सहभागी झाली आहे.

तर मराठी स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरेही या पर्वात दिसणार आहे. काहीच दिवसांपूर्वी तो एका मोठ्या वादात सापडला होता. अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वीर पहाडियाची खिल्ली उडवणे त्याला महागात पडलेले. वीर पहाडिया हा माझी मुख्यमंत्री शुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. तर सोलापूरात प्रणीतला मारहाण झाल्याचे समोर आले होते. पण वीरने स्पष्ट केले होते की, या प्रकरणात त्याचा काहीही संबंध नाही.

तसेच 'लैला मजनू' फेम अभिनेत्री फरहाना भट्ट, भोजपुरी अभिनेत्री नीलम गिरी, ज्येष्ठ अभिनेत्री कुनिका सदानंद, युट्यूबर मृदुल तिवारी यांचीही BB19 च्या घरात एन्ट्री झाली. गायक अमाल मलिक या पर्वाच्या ग्रँड प्रीमियरमध्ये बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणारा शेवटचा स्पर्धक ठरला. अमाल बॉलिवूडचा लोकप्रिय गायक असून तो संगीतकार डबू मलिक यांचा मुलगा, तर अनू मलिक यांचा पुतण्या आहे. असे स्पर्धक यावेळी बिगबॉसच्या घरात राजकारण करताना दिसतील.