नवी दिल्ली, जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निर्दोष २६ पर्यटकांची धर्म विचारून हत्या करण्यात आली होती. यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून दहशतवाद्यांना धडा शिकवला. भारतीय सैन्यदलाने दहशतवाद्यांचा बंदोबस्त त्यांच्या धर्मावरून नव्हे तर त्यांच्या कर्मावरून केला, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केले.
राजस्थानातील जोधपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते. त्यांनी पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत सांगितले की, दहशतवादी निर्दोष नागरिकांचा बळी घेत होते, मात्र भारतीय सैन्याने प्रत्युत्तर देताना केवळ पूर्वनिश्चित लक्ष्यांवर अचूक हल्ले केले. पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या तळांना उध्वस्त करण्यात आले. भारत ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाचा अनुयायी आहे. जगाला आम्ही एक कुटुंब मानतो. जाती-धर्मावरून भेदभाव करण्याची परंपरा भारताची नाही. मात्र देशावर हल्ला करणाऱ्यांना भारत कधीच सोडणार नाही. त्यांच्या दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सदैव सज्ज आहे, असा पुनरुच्चार संरक्षण मंत्र्यांनी केला.
संरक्षणमंत्र्यांनी ठामपणे नमूद केले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय वायुदल व सैन्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाकिस्तानातील दहशतवादी केंद्रे व त्यांच्या पायाभूत सुविधांचा अचूक नायनाट केला. ही कारवाई पाकिस्तानला स्पष्ट संदेश देणारी ठरली असून, भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही टोकाला जाण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले.