भारताचे उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त केलेले IPS अनिश दयाल सिंह कोण आहेत?

25 Aug 2025 16:23:25

नवी दिल्ली : (Deputy NSA Anish Dayal Singh) केंद्र सरकारने निवृत्त आयपीएस अधिकारी अनिश दयाल सिंग यांची भारताच्या उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. अनिश दयाल सिंग हे १९८८च्या बॅचचे मणिपूर केडरचे भारतीय पोलिस सेवेचे अधिकारी आहेत. उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची नवीन भूमिका स्वीकारल्यानंतर, सिंग भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणांच्या निर्मिती, अंमलबजावणी आणि सुधारणांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत काम करतील.

केंद्र सरकारने अनिश दयाल सिंग यांच्याकडे गेल्यावर्षी राष्ट्रीय सुरक्षा रक्षकच्या (NSG) महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता. तसेच ते सीआरपीएफचे महासंचालक होते. त्यापूर्वी ते आयटीबीपीचे महासंचालक देखील राहिले आहेत. याशिवाय त्यांनी सशस्त्र सीमा दलाचे (एसएसबी) महासंचालक (अतिरिक्त कार्यभार) म्हणून काम पाहिले आहे. ते डिसेंबर २०२४ मध्ये निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या आठ महिन्यात त्यांची उप एनएसए म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाकडून रविवारी देण्यात आली.

सिंग यांची मुख्य जबाबदारी देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित असेल. यामध्ये दहशतवादामुळे निर्माण होणा-या धोक्यांचे मूल्यांकन, डेटा उल्लंघन आणि चोरी, सायबर धोके, संबंधित एजन्सींची तयारी आणि सुरक्षा समस्या आणि बाबींशी संबंधित प्रमुख संस्थांमधील सहकार्य यांचा समावेश आहे. त्यांच्यासमोर जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती, नक्षलवाद आणि ईशान्येकडील बंडखोरी ही आव्हाने असतील.





Powered By Sangraha 9.0