मुंबई, गणेशोत्सवाचे दिवस जसे जवळ येऊ लागले आहेत, तशी वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होताना बघायाला मिळते आहे. लाडक्या बाप्पासाठी मखर, रांगोळी, कपडे, मिठाई, आदी गोष्टींची खरेदी जोमने सुरु आहे. गणेशोत्सव आणि फूलं हे तर आपलं भोवताल समृद्ध करणारे समीकरण. अशातच आता दादर रेल्वे स्थानकाजवळील फूल बाजारामध्ये ग्राहकांची अलोट गर्दी आपल्याला बघायाला मिळत आहे. गणेशोत्सवासाठी ग्राहकांच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर, फुलांची आवाक वाढल्याचे चित्र आपल्याला बघायाला मिळते. एकाबाजूला सुट्या फुलांची मागणी वाढत असताना, दुसऱ्या बाजूला तयार फुलांचे हार सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे.
मागच्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्राभर पावसाची संततधार आपल्याला अनुभवायाला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी फूलांचे दर आटोक्यात आले आहेत. त्याचबरोबर फुलांची आवाक वाढल्यामुळे एकंदरीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण आपल्याला बघायाला मिळाले आहे. बोंड्याची मिश्र फुलांची सुरुवात ५० रुपये पाव किलोपासून होत असून, ग्राहकांनी सजावटीसाठी या फुलांना पसंती दर्शवली आहे. पूजेच्या विधीसाठी आवश्यक असणारी केळीची पानं प्रत्येकी १० ते १५ रुपयांना बाजारात उपलब्ध आहेत. झेंडूची फुलांची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली असून १५० ते २०० रुपये किलोच्या दरामध्ये ग्राहकांना ही फूलं उपलब्ध आहेत. गणपतीचे आवडते फूल म्हणून जास्वंदाची मागणी सुद्धा बाजारात वाढली आहे. मात्र यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. एका डझनासाठी ग्राहकांना ३० ते ४० रुपये मोजावे लागत आहेत. शेवंतीच्या सुट्या फुलांना सुद्धा ग्राहाकांनी पसंती दाखवली असून २०० ते २५० रुपये किलोने याची खरेदी सध्या बाजारात सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे गुलाबाचे दर सुद्धा वाढले असून, २० गुलाबांच्या जोडीसाठी ग्राहकांना ६० ते ८० रुपये मोजावे लागत आहेत. चाफ्याचा बारमाही बहर गणेशोत्सवात सुद्धा आपले वेगळेपण टिकून आहे. दर शेकडा चाफा २५० ते ३०० रुपयांना बाजारात विकला जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एकूणच बाजारामध्ये मंगलमय वातावरण असल्याचे पहायाला मिळाले.
भाविकांना आकर्षित करते दुर्व्याची माळ!
गणपती बाप्पाला वाहणाऱ्या दुर्व्याच्या फुलांचे धार्मिक महत्व सर्वश्रुत आहे. फुलांमध्ये गुंफलेली हीच दुर्व्यांची माळ सर्वांना आकर्षित करणारी ठरली. गुलाबाचे फूल असो वा जाई जुई, या माळेमध्ये दुर्वा आपले वेगळेपण टिकून आहे. दुर्व्यांची माळीचे दर ७० ते ८० रुपयापासून दादरच्या फूल मार्केटमध्ये आपल्याला आढळून येतात.