
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अधूनमधून आंदोलनाचा बडगा उगारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा वाणीवर संयम नाही, हे महाराष्ट्राने यापूर्वीही अनेकदा पाहिले, ऐकले. आता पुन्हा मुंबईत आंदोलनाचा इशारा देतानाही, त्यांची जीभ अशीच घसरली. यंदा तर ते मुख्यमंत्र्यांच्या आईबहिणीवर घसरल्याची टीका भाजप नेत्यांनी करताच, ‘मी असे काही बोललोच नाही’ म्हणून जरांगेंनी सारवासारव केली. म्हणजे एकीकडे छत्रपती शिवरायांचे नाव घ्यायचे, त्यांची प्रतिमा, पुतळे आंदोलनात सर्रास वापरायचे आणि त्याच व्यासपीठावरून बोलताना अशा गुंडगिरीच्या भाषेचा प्रयोग करायचा, हे वागणे मराठ्यांच्या नेत्याला कितपत शोभणारे? पण, दुर्दैवाने आंदोलकांना उकसवण्यासाठी म्हणा किंवा समोरची गर्दी पाहून टाळ्या मिळवण्यासाठी, जरांगे अशी अर्वाच्च भाषा वापरताना दिसतात. एवढेच नाही, तर मुख्यमंत्र्यांसह अन्य नेतेमंडळींचा एकेरी उल्लेख करणे, सरकारला, प्रशासनाला वारंवार धमक्या देणे, हे सुजाण आंदोलकाचे नक्कीच लक्षण नाही. त्यात यंदा ऐन गणेशोत्सवात मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाचा जरांगेंचा निर्णय हा सरकारवर दबाव वाढवण्यासाठीच आहे. पण, या आंदोलनामुळे आधीच २४ु७ कर्तव्यावर तैनात मुंबई पोलिसांवर गणेशोत्सवादरम्यान असलेला ताण किती वाढेल, याची जरांगेंना पुरती कल्पना असूनही त्यांनी मुद्दाम हा घाट घातलेला दिसतो. एवढेच नाही तर गर्दी जमवण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधवांना मुंबईत गर्दी करण्याचे आवाहनही जरांगेंनी केले. म्हणजे घरी गणपती असताना मराठा बांधवांनी घरदार सोडून आंदोलन करायचे, हा कुणीकडचा हटवादीपणा म्हणायचा? तसेच, मुंबईत गणेशभक्त अधिक मराठा आंदोलक अशी प्रचंड गर्दी एकाच वेळी उसळल्यामुळे चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना घडली, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी जरांगे स्वीकारणार का? त्यामुळे जरांगेंनी किमान सणउत्सवाच्या काळात तरी मराठ्यांना, पोलिसांना, प्रशासनाला वेठीस धरण्याचा आततायीपणा करू नये. आंदोलनाचेही काही नियम, नीतिमत्ता असते. अण्णा हजारे असतील, अथवा शरद जोशी, त्यांनीही आंदोलने केली; पण ती लोकशाही मार्गाने आणि आक्रस्ताळेपणा न करता! तेव्हा जरांगेंनी आंदोलनाचे ‘शस्त्र’ वारंवार उगारून त्याची धार बोथट करण्यापेक्षा, आंदोलनाचे ‘शास्त्र’ समजून घेतले असते, तर असा विलाप करायची वेळ आली नसती.
जबान को लगाम दो...समाजमाध्यमांवरील ‘इन्फ्ल्युएन्सर्स’ किंवा ‘कंटेट क्रीएटर्स’चीही गत जरांगेंसारखीच, त्यांचेही वाणीवर तारतम्य नाहीच. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण काहीही बोललो, काहीही दाखवले, तरी चालते, या अविर्भावात यापैकी काही मंडळी समाजमाध्यमांवर मोकाट सुटलेली दिसतात. यापैकी काहींच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा इतकी त्वरेने भिनते की, आपण म्हणजे फार मोठे तत्त्वज्ञ, समाजसुधारक किंवा कलाकार-सेलिब्रिटी वगैरे झाल्याच्या भ्रामक दुनियेतच ते रममाण असतात. याच अनुषंगाने काल सर्वोच्च न्यायालयाने अशा ‘इन्फ्ल्युएन्सर्स’चा कंटेट ‘फ्री स्पीच’ नाही, तर ‘कमर्शियल स्पीच’ मानला जाईल, असे सांगत या जमातीचे चांगलेच कान टोचले.
स्टॅण्डअप कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गोट लेटंट’ या कार्यक्रमात रणवीर अलाहाबादियाच्या अभद्र टिप्पणीमुळे आधीच वाद ओढवला होता आणि नंतर रणवीरला माफीही मागावी लागली होती. पण, याच शोमध्ये अन्य अशाच काही ‘इन्फ्ल्युएन्सर्स’नी दिव्यांगांविषयी असंवेदनशील टिप्पणी केली होती. रैनाने ‘स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी’ अर्थात ‘एसएमए’ या आजारावरील दोन मुलांच्या उपचारखर्चांची खिल्ली उडवली होती, तर आणखी एका कार्यक्रमात अंध व्यक्तींची चेष्टा करण्यात आली होती. ‘एसएमए’ग्रस्त मुलांच्या पालकांनी रैनाविरोधात तक्रार केली होती. यावर सुनावणीवेळी अशा ‘इन्फ्ल्युएन्सर्स’नी केवळ माफी मागून चालणार नाही, तर त्यांनी समाजमाध्यमांवर दिव्यांगांच्या हक्कासाठी ते समाजमाध्यमांचा सकारात्मक वापर करतील, असे शपथपत्र देण्याचे आदेशही दिले. तसेच, भविष्यात अशा प्रकरणात दंडही ठोठावला जाऊ शकतो, अशी तंबीही न्यायालयाने दिली. त्यामुळे हास्यविनोदाच्या नादात आपण कळत-नकळत कोणाच्याही भावना दुखावू नये, याचे भान ‘इन्फ्ल्युएन्सर्स’नी बाळगणे नितांत गरजेचे. महाराष्ट्रातही अशाच एका उत्साही ‘इन्फ्ल्युएन्सर’ने मुस्लीम धर्मीय मूर्तिकाराकडून हिंदू व्यक्ती गणेशमूर्ती खरेदी करण्याच्या रिलवरून असाच वादंग उठला. या ‘इन्फ्ल्युएन्सर’वर सर्व स्तरातून टीका झाल्याने, त्याने तो व्हिडिओ समाजमाध्यमांवरून हटविला आणि नंतर माफीही मागितली. पण, यानिमित्ताने ‘इन्फ्ल्युएन्सर्स’ने आशयनिर्मिती करताना सामाजिक भान जपण्याची गरज प्रकर्षाने अधोरेखित होते. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने ‘जबान को लगाम दो’ अर्थाने दिलेला हा अंतिम इशाराच!