चाकोरीबद्ध नोकरीचा पर्याय नाकारत, गावात राहून ‘गिरीमा अॅग्रो’ नावाचा यशस्वी ब्रॅण्ड चालविणाऱ्या तरुण शेतकरी आणि उद्योजिका कामिका नार्वेकर यांच्याविषयी...‘शहरात वाढलेली मॉडर्न मुलगी ही गावाकडे येऊन काय करणार?’, ‘चार दिवस युट्यूबवर बघून कोणी शेती नाही करू शकत’, ‘ज्या वेगाने इकडे आली त्याच वेगाने शहरात जाणार निघून,’ अशा कित्येक टोमण्यांना खोटं ठरवतं, तिने स्वतःला सिद्ध केले. तिने कृषी क्षेत्रात स्वतःची कंपनी स्थापन करून, आपल्या शेतमालाला ब्रॅण्ड मध्ये परावर्तीत केले. ही कहाणी आहे, रत्नागिरीच्या छोट्याशा खेड्यात ‘गिरीमा अॅग्रो’च्या माध्यमातून यशस्वी व्यवसाय करणार्या कामिका गिरीधर नार्वेकर या कृषीकन्येची.
कामिकाचे मूळ गाव राजापूरमधील कुवेशी. हे गाव राजापूरपासून ३७ किमी अंतरावर आणि रत्नागिरीपासून ५९ किमी अंतरावर आहे. मात्र, कामिकाचा जन्म आणि संपूर्ण शिक्षण पुणे-मुंबईसारख्या महनगरांमध्येच झाले. कामिकाने ‘बॅचलर इन अॅग्रीकल्चर मॅनेजमेंट’ पदवी मिळवली आहे. यानंतर ‘टाटा इन्स्टिट्यूट’मधून ‘अॅग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट’ या विषयात एक वर्षाचा ‘पोस्ट ग्रॅज्यूएशन डिप्लोमा’ही तिने केला. ‘कोविड’पूर्वी कामिका वर्षभर पुण्यात एका फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत होती. मात्र आपण व्यवसाय करावा असेच कामिकाला कायम वाटत असे. मात्र व्यवसायाच्या स्वरुपाबद्दल ती थोडी साशंक होती.
कामिका आणि तिची बहीण सातत्याने आपला काय व्यवसाय असावा याच्या शोधात असतानाच, त्यांना काळीमिरीच्या बाजारपेठेविषयी माहिती मिळाली. कोकण आणि महाराष्ट्र एकेकाळी काळीमिरीच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध होते. ती ओळख पुसली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हेच ओळखून, काळीमिरीच्या उत्पादनासाठी काय करता येईल? याचा शोध कामिकाने सुरू केला. एका तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कामिकाने सव्वा गुंठा क्षेत्रांत कळिमिरीची लागवड केली. कामिकाने कुवेशीमध्ये स्वमालकीच्या २३ गुंठ्यांपैकी, सव्वा गुंठ्यात ‘व्हर्टिकल फार्मिंग’ने काळीमिरीचा प्रकल्प उभारला. यासोबतच कामिका इतर हंगामी पीके देखील घेते. यात भात, हळद, पालेभाज्या आणि इतर पिकांचा समावेश आहे.
कामिका व्यवसाय वाढीसाठी अधिकाधिक प्रदर्शनात सहभागी होते आणि समाजमाध्यमांचा पुरेपूर वापरही करतेे. ज्यामुळे तिचा व्यवसाय आज झपाट्याने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचतो. ‘गिरीमा’ हे कंपनीचे नावही, कामिकाने आई आणि वडिलांच्या नावाच्या एकत्रीकरणातून तयार केले. कामिकाच्या आईचे नाव सीमा. त्या सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत; तर कामिकाचे वडील गिरीधर हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जीन्स बनविणार्या कंपनीमध्ये व्यवस्थापक होते. मात्र, कालांतराने त्यांनी कामिकाला तिच्या व्यवसायात मार्गदर्शन अअणि मदत करु लागले. आईवडील दोघेही आता पूर्णवेळ व्यवसाय वाढीसाठी कामिकाला प्रोत्साहन देत आहेत, तर कामिकाची बहीण कंपनीचे संपूर्ण ब्रॅण्डिंगसाठी काम करते. आज ‘गिरीमा अॅग्रो’ हा नार्वेकर कुटुंबाचा कौटुंबिक व्यवसाय आहे. २०२२ साली कामिकाने ‘गिरीमा अॅग्रो’ला ब्रॅण्ड म्हणून स्थापित केले. ‘एमएसएमई’ म्हणूनही कामिकाने कंपनीची नोंदणी केली. इथूनच ‘गिरीमा अॅग्रो’चा प्रवास खर्या अर्थाने सुरू झाल्याचे कामिका सांगते. गावात शेती करण्याचा निर्णय कुटुंबाने अत्यंत विश्वासाने स्वीकारल्याचे कामिका आवर्जून सांगते. कामिकाचे वडीलांना कायमच गावाकडे ओढ होती. त्यामुळे आज माझे बाबा आणि मी आमचे स्वप्न जगत आहोत, असेही कामिका सांगते.
कामिका शेतात कोणतेही पीक घेण्यापूर्वी त्याचा संपूर्ण अभ्यास करून, अधिकाधिक पारंपरिक आणि केवळ ऑरगॅनिक पद्धतीनेच शेती करते. कामिका सांगते, "प्रदर्शनात जेव्हा आम्ही आमचे उत्पादन विक्रीला ठेवतो, तेव्हा ग्राहक त्याच्या किमतींची तुलना इतरांशी करतात. मात्र, आमचे उत्पादन हे सेंद्रिय पद्धतीने वाढवलेले आहे. त्यामुळे ते शुद्ध आणि अधिक सात्विक आहे.”
"कोरोनानंतर काही व्यवसाय होते जे तारले गेले, त्यात शेती हा एक व्यवसाय आहे. त्यामुळे शेती हा कायमच एक उत्तम पर्याय आहे. आपल्या घरात जर शेती असेल, तर आपण किमान आपल्या कुटुंबाला पुरेल इतके धान्य तरी, सेंद्रिय पद्धतीने आपल्या शेतात घ्यावे. यातून मिळणारा आनंद हा शहरातील नोकरीत मिळू शकत नाही,” असेही कामिका सांगते. कामिकाचे मित्र-मैत्रिणी जेव्हा तिच्याकडे भेट द्यायला येतात, तेव्हा कामिका त्यांना शेतात कापणी, मळणी, पेरणी यांसारखे अनुभव देते. आज शेतीसाठी अनेक नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. यामुळेच तरुणांनी शेतीकडे वळावे, असे आवाहन कामिका आवर्जून करते. आपल्या ब्रॅण्डसोबतच आपल्या गावचे नावही उज्ज्वल करावे, अधिकधिक महिलांनी आणि तरुणांनी शेतीकडे वळावे, यासाठी कामिका प्रयत्नशील आहे. जे गावकरी ही शहरातील मुलगी गावात काही टिकणार नाही असे म्हणत होते, त्याच गावातील शेतकरी आज कामिकाच्या प्रयोगशीलतेचे कौतुक करत, मार्गदर्शन घेण्यासाठी उत्सुक असतात. कामिकाचा ‘गिरीमा अॅग्रो’च्या माध्यमातून यशस्वी उद्योजिका होण्याकडे सुरू झालेला प्रवास, निश्चितच अधिकाधिक प्रगती वेगाने वाढो यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेकानेक शुभेच्छा!