बारामतीतील एका सामान्य कुटुंबात लहानाचे मोठे होत, पुढे समाजसेवेचे व्रत अंगीकारणाऱ्या अॅड. अक्षय गायकडवाड यांच्याविषयी... अक्षयच्या संघर्षकथेला वेगळेपण आहे कारण, ती केवळ वैयक्तिक नाही तर समाजाच्या सार्वत्रिक विकासासाठी झटणारी आहे. अक्षयने स्वतःचे आयुष्य केवळ जगले नाही, तर समाजाच्या वाटेवर चालत अनेकांना साथ दिली आहे. लहानपणापासूनच मेहनत, प्रामाणिकपणा आणि समाजसेवा हीच जीवनाची दिशा मानून ते मोठे झाले. परिस्थिती कितीही कठीण असो, पण संघर्ष हा थांबण्याचा नव्हे, तर पुढे जाण्याचा मार्ग आहे या विश्वासावर त्यांनी प्रत्येक पाऊल धैर्याने टाकले. त्यांचे जीवन प्रेरणास्थान म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर! शिक्षण हेच शस्त्र आहे, संघर्ष हा उन्नतीचा मार्ग आहे हे बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या जीवनात रुजवले.
शैक्षणिक प्रवास हा अक्षय यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा संघर्ष काळ. आर्थिक अडचणींच्या छायेत शिक्षण सुरू ठेवणे ही त्यांच्यासाठी मोठी धडपड होती. तरीही त्यांनी बारामतीच्या एमएसओ हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातून ‘एमएस्सी’चे शिक्षण ‘ऑर्गेनिक केमिस्ट्री’ या विषयातून पूर्ण केले. पुढे नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक विधी महाविद्यालयातून, ‘एलएलबी’ची पदवीही मिळवली. ‘एलएलबी’ पूर्ण करत अक्षय यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली. मात्र, त्यांची वकिली केवळ व्यावसायिक कमाईसाठी नव्हती, तर समाजातील शोषित, वंचित आणि अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारीही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. ‘अट्रोसिटी’ कायद्याशी संबंधित २० हून अधिक खटले त्यांन लढले असून, पीडितांना केवळ कायद्याचा आधारच नाही, तर मानसिक धैर्यही दिले. पीडित घटकांना न्याय मिळवून देताना, तेे स्वतः त्या कुटुंबाचा आधारस्तंभ झाले. यानंतर त्यांचे कार्य केवळ कायदेशीर चौकटीपुरते मर्यादित राहिलेले नाही. विविध सामाजिक आंदोलनांतदेखील त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी थेट लढा दिला आहे. समाजासाठी झगडताना आलेले अडथळे त्यांच्या जिद्दीसमोर फार काळ टिकले नाहीत.
२०१५ सालापासून अक्षय यांची समाजकार्यातील ठाम भूमिका लोकांना दिसू लागली. बारामती नगरपरिषदेत नागरिकांच्या समस्या मांडणे, पाणीटंचाईविरोधी हंडा मोर्चा, वीजदर वाढीविरोधातील संघर्ष, पथविक्रेत्यांच्या हक्कांसाठी लढा अशा विविध चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या लढ्यात अक्षय यांनी स्वतःच्या सोयीसुविधांचा विचार न करता, समाजाच्या हक्कासाठी झटण्याच्या वृत्तीचे दर्शन घडवले. समाज हा स्वतःच्या आयुष्यापेक्षा मोठा आहे असा विचार करणारे अक्षय आज स्वतःच्या कमाईतून, या घटकांच्या न्यायासाठी सर्व ठिकाणी उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा समाजकार्याचा हा विचार केवळ तत्त्वज्ञानापुरता मर्यादित न ठेवता, अक्षय यांनी तो प्रत्यक्ष आचरणातही आणला.
यासोबतच अक्षय यांनी सामाजिक क्षेत्रामध्येही अनेक ठळक उपक्रम राबवले. रक्तदान शिबिरे आयोजित करून, तरुणांनाही या जीवनदान देणार्या समाजकार्यात सामील करून घेतले. वृक्षारोपण मोहिमेत १०० हून अधिक झाडे लावून, त्यांचे संगोपन करत पर्यावरण संवर्धनाचा संदेशही त्यांनी दिला. कोरोना काळात अनेक गरजूंना धान्य, मास्क, औषधे, कपडे पुरवून मानवतेची खरी सेवा केली. विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरांमधून, वंचित घटकातील तरुणांना स्पर्धा परीक्षांची दिशा दाखवली. व्यसनमुक्ती अभियान आणि महिला सक्षमीकरण उपक्रम यांच्या माध्यमातून, अक्षय यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने समाजात सकारात्मकतेचा संदेश दिला. आपल्या संघर्षाच्या वाटचालीतील अक्षय गायकवाड हा तरुण समाजकारण करत मुख्य प्रवाहात आला असल्याचे सांगताना, त्यांचे प्रमुख मार्गदर्शक यशपाल भोसले आणि धर्मपाल मेश्राम यांचे आणि सर्व मार्गदर्शकांचे अक्षय यांनी आभारही व्यक्त केले.
अशा प्रभावी वाटचालीने समाजासाठी काम करणार्या अक्षय यांची भविष्यातील स्वप्नेही, त्याच्या विचारांइतकीच मोठी आहेत. लोकांच्या विश्वासावर चालत शाळा, महाविद्यालये, सहकारी संस्था व अनन्य क्षेत्रातील संस्था उभारण्याचा त्यांचा मानस आहे. या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, सर्व समाजघटकांमधील प्रत्येकापर्यंत शिक्षण पोहोचावे आणि समाजाला उन्नतीच्या मार्गावर नेण्यासाठी मी सदैव उपलब्ध राहीन, अशी त्यांची निर्मळ भूमिका आहे.
समाजासाठी दिलेला अक्षय यांचा संदेशही तरुणाईला दिशा दाखवणारा आहे. संघर्षाशिवाय यश नाही आणि एकतेशिवाय समाज उभा राहत नाही. प्रत्येकाने आपल्या वाट्याचे काहीतरी समाजाला द्यावे, हीच खरी देशसेवा आहे, असे अक्षय समाजातील अन्य तरुणांना सांगतात. तसेच त्यांना समाजासाठी सकारात्मक काम करण्याचे आवाहन करतात. आज बारामतीसारख्या भूमीतून उभा राहिलेले अक्षय संघर्ष, शिक्षण आणि सेवाभावाच्या बळावर पुढे आले. याचे कारण म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत त्याच्या अंतःकरणात पेटलेली आहे. म्हणूनच त्याच्या प्रवासाला दिलेले शीर्षक सार्थ ठरते. समाजसेवेचे व्रत अंगीकाणार्या अक्षय गायकवाड यांना दै. ’मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
सागर देवरे