
माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे, ही अॅरिस्टॉटल या ग्रीक तत्त्वज्ञाने हजारो वर्षांपूर्वी म्हटलेली गोष्ट आजसुद्धा तितकीच संयुक्तिक आहे. माणूस हा एका विशिष्ट व्यवस्थेमध्ये जन्माला येतो. त्या व्यवस्थेच्या चौकटीतच तो जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर या संस्कृतीचा गाडाही तो पुढे नेत असतो. मानवासाठी समाजव्यवहार हा केवळ त्याच्या जीवनउत्कर्षाचा भाग नसून, तो त्याच्या अस्तित्वाच्या लढाईचाही भाग ठरतो. काळाच्या ओघात समूहभावनेतून मानवी विश्व, उत्तरोत्तर समृद्ध होत गेले. मात्र, या समूहातूनसुद्धा छोट्या छोट्या नात्यांचे बंध व्यक्तीसाठी आवश्यक असतात. शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर जशी आपली भाषेशी, अंकांशी ओळख होते, त्याचप्रकारे मैत्री ही भावनाही आपल्या मनामध्ये त्यावेळेपासूनच अलगद रुजते. पुढे मैत्रीचं नातं अधिकाधिक जीवाभावाचं होतं आणि आपल्या जीवनाची पायवाट सोपी होते.
आधुनिक काळात तंत्रज्ञानामुळे आपलं आयुष्य सोपं होतं गेलं. मात्र, रंजनासाठीसुद्धा जेव्हा या तंत्रज्ञानातील उपकरणांवर माणूस अवलंबून राहू लागला, तेव्हा त्याचा एकलकोंडेपणा वाढतो आहे की काय? अशी भूमिका काहींनी व्यक्त केली. मात्र, पुन्हा पुन्हा मैत्र जीवांचे किती आवश्यक असतात याची माणसाला प्रचिती आलीच. आताच्या घडीला मात्र मैत्रीच्या स्नेहबंधनाला महागाईचे ग्रहण लागले आहे की काय? असा प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे. अमेरिकेमध्ये या संदर्भात एक नवीन शब्द सध्या प्रचलित आहे, तो म्हणजे ‘फ्रेण्डफ्लेशन.’ ‘फ्रेण्ड’ अर्थात ‘मित्र’ आणि ‘इनफ्लेशन’ म्हणजे ‘महागाई.’ या दोन शब्दांच्या जोडगोळीतून हा शब्द जन्माला आला आहे.
मित्र एकत्र येतात. त्यातूनच त्यांचा जीवनव्यवहार समृद्ध होतो. मात्र, एकत्र येणं याला काहीतरी निमित्त असावे लागते. अथवा सहज भेटायचे आहे हा विचार जरी मनामध्ये आणला, तरी कुठल्याशा रेस्टोरंटमध्ये किंवा कॅफेमध्ये भेटावे लागते. मात्र, अशा या सार्वजिनक ठिकाणी जाताना पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च होतात, याची जाणीव आताच्या ‘जेन झी’ आणि ‘मिलेनियल’ पिढीला झाली आहे. अमेरिकेसारख्या ठिकाणी सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना, आता खिशाला अधिकची कात्री लावावी लागत आहे. नुकतंच ‘अॅली बँक’ या संस्थेच्या माध्यमातून ‘द फ्रेण्डशिप टॅब’ आशयाचे सर्वेक्षण झालेे. या सर्वेक्षणांतर्गत युवकांच्या सार्वजनिक जीवनाचे आकलन करण्यात आले. मैत्री टिकवण्यासाठी लागणार्या सामाजिक व्यवहाराच्या आर्थिक बाजूवर यामाध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. या सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले की, ४४ टक्के ‘जेन झी’, ‘मिलेनियल’ गटातील मुला-मुलींनी खर्चाचा विचार करून, अनेक सामाजिक कार्यक्रमांना व क्रमाने मित्रांना न भेटण्याचा निर्णय घेतला. सरासरी अशा सामाजिक कार्यक्रमांमध्ये जेव्हा एखादा युवक व युवती सहभागी होते, त्यावेळेस दरमहा २५० डॉलर्सपर्यंतचा खर्च त्यांना करावा लागतो. यामध्ये मित्रांना भेटण्यासाठी बारमध्ये जाणं, जंगी वाढदिवस साजरा करणं, लंच आणि डिनरसाठी कधी कधी एकत्र येणे या गोष्टींचा समावेश आहे. यातील ४२ टक्के युवकांच्या मते, ठरवलेल्या खर्चापेक्षा वर्षाला सार्वजनिक ठिकाणी मित्रांबरोबरच जास्त खर्च होतो. ३२ टक्के युवक-युवती, दर आठवड्याला मित्रांना भेटण्यासाठी नियमितपणे रेस्टोरंटमध्ये जातात. या सर्वेक्षणातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे, केवळ १८ टक्के युवकांकडेच जमाखर्चाचे बजेट तयार असते. यामुळे त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीमध्ये कुठल्याही प्रकारे आर्थिक व्यत्यय येत नाही. आर्थिक नियोजन ही यशाची गुरुकिल्ली आहे, हे आपण दैनंदिन जीवनात ऐकतोच. परंतु, आता समाजव्यवहारासाठीसुद्धा व्यक्तीने काटेकोरपणे नियोजन करणे अपेक्षित आहे का? याचा आता अमेरिकेतील युवकांनी विचार करणे गरजेचे आहे.
या सर्वेक्षणामुळे अमेरिकेत वाढणारी महागाई, सार्वजनिक जीवनातील खर्च, उत्पन्न व खर्च करण्याची क्षमता यांवर पुन्हा एकदा विचारविमर्श सुरू झाला आहे. नोकरीचे बदलणारे स्वरूप, त्यातून निर्माण होणारी आर्थिक आव्हाने या गोष्टींचा समग्र विचार होणे आवश्यक आहे. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांची इतर राष्ट्रांना असलेली ओळख म्हणजे, व्यवसायाच्या संधींपासून ते राहणीमानाच्या सोयींपर्यंत परिपूर्ण असलेला देश. या परिपूर्ण राष्ट्रांमधील आर्थिक आव्हाने नेमकी काय आहेत, याचेसुद्धा आकलन होणे गरजेचे आहे.