भारतीय शेती पद्धती आणि देशी गोवंश पालनातून आत्मनिर्भरता साध्य होईल सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

23 Aug 2025 18:29:57

मुंबई : "देशी गोवंश आणि पारंपरिक शेती पद्धतीबद्दल लोकांचा विश्वास वाढत आहे. भारतीय शेतीचे आधुनिक रूप विकसित करूनच आपण कृषी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करू शकतो”, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्य मंदिरात आयोजित ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या २८ व्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होते.

या प्रसंगी पशुवैद्यक शास्त्रात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. प्रतिष्ठानच्या स्मरणीकेचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक दिवाण देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधत सरसंघचालक पुढे म्हणाले, “जो बोलू शकत नाही, उपचाराच्या वेळी विरोध करतो, त्याच्या दुःखालाही समजून त्यावर उपचार करण्याची कला आपल्या परंपरेत आहे. प्राचीन पशुवैद्य शालिहोत्र यांनी घोड्याचे आयुष्य आणि गुणधर्मांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून सांगितले होते. ती परंपरा आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. शेतीत पाश्चात्य तंत्रज्ञान आणि आधुनिकता जिथे आवश्यक आहे तिथे स्वीकारून, भारतीय पद्धतीनुसार शेती आणि पशुपालनाचा समन्वय साधला तर शेतकऱ्यांना फायदा होईल. भारतीय शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून पशुपालनासह मिश्र शेती स्वीकारल्यास शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल. जागतिक स्तरावर असलेल्या अनिश्चितता आणि आव्हानांच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर होणे अत्यावश्यक आहे"

कार्यक्रमात पशुपालन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पशुपालकांना आणि पशुवैद्यकीय स्नातकांना आदर्श पशुपालक, आदर्श गोपालक, उत्कृष्ट पशुवैद्य, आदर्श प्राध्यापक अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. संस्थेची सुरुवात प्रतिकूल परिस्थितीत झाली होती. अनेक सहकाऱ्यांच्या योगदानामुळे आज तिची क्षमता वाढली असून कामकाज इतके विस्तारले आहे की विविध पुरस्कार देण्यापर्यंत तिचा विकास झाला आहे.

Powered By Sangraha 9.0