दि. १९ ते २५ ऑगस्ट मुंबईच्या नेहरु सेंटर कलादालन येथे ‘इनफायनाइट स्ट्रोस’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ६० कलाकारांच्या वेगवेगळ्या कलाकृती यावेळी कलारसिकांना बघायला, अनुभवायला मिळणार आहेत. याच पार्श्वभूमीवर चित्रसंगमाचा घेतलेला आढावा.
आपला भारत देश हा विविधतेने नटलेला. ही विविधता केवळ भाषिक, सांस्कृतिक नाही, तर इतकी भिन्नता घेऊन जगणारे हे राष्ट्र, इथली संस्कृती अनेकविध रंगांनी बहरलेली आहे. हेच रंग ज्यावेळी एखादा चित्रकार आपल्या कुंचल्यातून कागदावर साकारतो, तेव्हा एक वेगळे चित्रविश्व आपल्यासमोर उभे राहते. या चित्रविश्वामध्ये आपल्याला एकाच वेळेला आपल्या भोवतालाचं वेगळं दर्शनसुद्धा घडतं आणि त्याचबरोबर चित्रकाराची कलाकृतीसुद्धा अनुभवायला मिळते. मुंबईच्या नेहरू सेंटर कलादालन येथे अशाच वेगवेगळ्या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून प्रेक्षकांची अभिरुची जपली जाते. ‘हिना भट आर्ट वेन्चर’च्या माध्यमातून ‘इनफायनाईट स्ट्रोस’ या आगळ्या-वेगळ्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट, सकाळी ११ ते सायंकाळी ७ या कालावधीमध्ये सुरू असलेल्या या चित्रप्रदर्शनात एकूण ६० चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. वेगवेगळ्या शैलीतून, वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून एका प्रकारे भारतीय संस्कृतीचं जीवनाचं चित्रण आपल्याला या चित्रप्रदर्शनामध्ये बघायला मिळते.
या चित्रसंगमाचा मध्यवर्ती विचार सर्वसमावेशी आहे. प्रत्येक चित्रकाराची एक स्वतंत्र सौंदर्यदृष्टी असते. निसर्ग, पानं, फुलं, झाडं हा जसा त्याच्या चित्रांचा भाग असतो, त्याचप्रमाणे एखादं शहर, एखाद्या नदीचा घाट किंवा अगदी माणसांचा एके ठिकाणी जमलेला घोळका हासुद्धा त्याच्या चित्राचा मध्यवर्ती विषय होऊ शकतो. याचीच प्रचिती आपल्याला हे चित्रप्रदर्शन बघताना येते. एका बाजूला काश्मीरच्या दाल तलावातील नितळता आपल्या डोळ्यांना सुखावते, तर दुसर्या बाजूला गजबजलेल्या मुंबईचेसुद्धा वेगळा रूप चित्राच्या माध्यमातून आपल्यासमोर उभं राहतं. विषयानुरूप कॅनव्हासवर उमटणारी चित्रं वेगवेगळी असली, तरी त्याचा गाभा म्हणजे उत्कटता! या चित्रांकडे बघताना, आपण आकर्षित होतो, कारण चित्रकाराच्या मनातील ती उत्कटता त्या चित्रांमध्येसुद्धा उतरलेली आहे. परंतु, म्हणून ही चित्र कुठेही लिष्ट, एकसुरी वाटत नाही. त्याचं सौंदर्य हे रसिकाच्या काळजाला भिडणार आहे. गंगेचा घाट असो किंवा समुद्राची लाट, या दोन्ही गोष्टींना अत्यंत खुबीने आपल्या चित्रांच्या माध्यमातून सादर करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनातील आणखी एक आकर्षण म्हणजे, खर्याखुर्या भारतीय माणसाचं अस्तित्व चितारणारे पोर्ट्रेट्स. ही ती माणसं आहेत, जी आपल्या खांद्यावरून संस्कृतीचा, जीवनाचा, विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या चेहर्यावरच्या सुरकुत्यासुद्धा भाषेच्या पलीकडे जाऊन आपल्याशी संवाद साधतात, ही या चित्रांची ताकद.
या चित्रांसोबतच चित्रप्रदर्शनामागचा विचारसुद्धा तितकाच अद्भुत आहे. २०१९ साली चित्रकार हिना भट यांनी चित्रकारांसाठी ‘हिना भट आर्ट वेन्चर’ची स्थापना केली. त्यानंतर थोड्याच महिन्यात ‘कोविड’ आला, ज्यामुळे सगळ्यांना घरी बसावं लागलं. या काळामध्ये चित्रकारांनी आपले ब्रश खाली ठेवून नये, म्हणून हिना भट यांनी एक आगळीवेगळी स्पर्धा ठेवली. त्यांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून ‘स्टे होम, स्टे सेफ’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं. कलाकारांना आधारभूत ठरतील, अशी काही चित्रं किंवा फोटोग्राफ त्यांनी दिले. यावरून चित्रकारांनी एक महिन्याच्या कालावधीसाठी रोज चित्र काढणं अपेक्षित होतं. त्याचबरोबर चित्रकाराच्या निर्मिती प्रक्रियेलासुद्धा तितकंच महत्त्व होतं, त्याचेसुद्धा फोटोज त्यांनी मागवून घेतले. वेगवेगळ्या विभागांमध्ये चित्रकारांना पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून चार हजारांपेक्षा जास्त चित्रकार समाजमाध्यमांवर जोडले गेले. या आगळ्या-वेगळ्या स्पर्धेला त्यांनी उदंड प्रतिसाद दिला. भारताच्या कानाकोपर्यातून चित्रकार यानिमित्ताने एक समूह म्हणून एकत्र आले. केवळ भारतच नव्हे, तर भारताबाहेरील चित्रकारांनीसुद्धा या उपक्रमाला आपापल्या परीने साथ दिली. मागची पाच वर्षे हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे. याच उपक्रमातील एकूण ६० चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या नेहरु सेंटर कला दालन येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे कलारसिकांनी या चित्रप्रदर्शनाला नक्की भेट देऊन चित्रसंगमाच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यावा.
कलारसिकांसाठी दुर्मीळ योग!
कोणत्याही चित्रकाराच्या आयुष्यात त्याचे चित्रप्रदर्शन हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. त्यासाठी प्रदर्शनाची आखणी, गॅलरीचे आरक्षण, प्रत्यक्ष चित्रनिर्मितीची प्रक्रिया, त्याची प्रसिद्धी, आमंत्रणं अशा अनेक गोष्टींचा व्याप असतो. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर चित्रप्रदर्शन हे लग्नकार्यापेक्षा कमी नसते. हे काम इतके कठीण नसते, तर ६० मान्यवर चित्रकारांना, त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून एकत्र आणणे किती अवघड असेल, याची कल्पनाच केलेली बरी. परंतु, हिना भट आणि त्यांच्या संस्थेने हे शिवधनुष्य पेलले आहे. विविध शैली, विविध माध्यमं, वेगळे विषय यांचा संगम अनुभवणे ही कलारसिकांसाठी पर्वणी आहे.
- शरद तावडे, चित्रकार
चित्रकारांना गरज लोकाश्रयाची!
चित्रकला हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे एखादा चित्रकार जेव्हा चित्रनिर्मिती करत असतो आणि तो त्याची निर्मिती लोकांसमोर जेव्हा ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा त्याला कुठल्या संघर्षातून जावं लागतं, याची मला कल्पना आहे. याच कारणासाठी समाजमाध्यमांचा योग्य तो वापर करून चित्रकार आपापसांत जोडले जावे. केवळ शैलीचीच नाही, तर विचारांचीसुद्धा देवाणघेवाण व्हावी, यासाठी ‘कोविड’ काळात ‘स्टे होम, स्टे सेफ’ या उपकमाची निर्मिती करण्यात आली, ज्याअंतर्गत चित्रकार एकत्र आले आणि ठराविक दिवस त्यांनी सातत्याने चित्रं काढली. अशाच काही चित्रांचे प्रदर्शन आपण नेहरु कलादालनात आता ठेवले आहे. चित्रकारांची चित्रं, त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचायला हवी, त्यांच्या कलेला लोकाश्रय मिळावा, हा या प्रदर्शनामागचा विचार.
- हिना भट, आयोजक, चित्रकार