"पाच वर्षे एकही योजना बंद होऊ देणार नाही!" मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाडक्या बहिणींना ग्वाही

23 Aug 2025 20:36:57

मुंबई : अनेकजण निवडणूक संपल्यावर योजना बंद होतील असे म्हणत होते. परंतू, पाच वर्षे आपली एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. पाच वर्षाने तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आले तर पुढची पाच वर्षे या योजना असतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, २३ ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींना दिली.

मुंबई येथे आयोजित राखी प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार चित्रा वाघ, आमदार विद्या ठाकुर, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आजचा कार्यक्रम हा अतिशय सुंदर आणि भावनिक आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबवण्यात आला असून आतापर्यंत ३६ लाख ७८ हजार बहिणींची राखी माझ्यापर्यंत पोहोचली आहे. काहींनी पत्राद्वारे त्यांच्या भावना पोहोचवल्या आहेत. या तमाम बहिणींची राखी आणि त्यांचे प्रेम मी स्विकारतो. जन्मभर मला या प्रेमातच राहायचे आहे. या प्रत्येक राखीमध्ये केवळ प्रेम आहे. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक नाते महत्वाचे असून प्रत्येक नात्याचा उत्सव आहे. आम्ही नाती निभावणारी लोकं आहोत. आम्ही परिवार, कुटुंब माननारी लोकं आहोत. खूप लोकांनी खूप प्रयत्न करून बघितले पण कुठल्याशी शस्त्रापेक्षा आणि अस्त्रापेक्षा प्रेमाचे आशीर्वाद हे अधिक ताकदवर असतात. त्यामुळे आज सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपली सेवा करण्यासाठी मला मुख्यमंत्रीपदाची जागा मिळाली. आमच्या लाडक्या बहिणी याच्या शिल्पकार आहेत."




नारी शक्तीला कुणीही थांबवू शकत नाही

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाच्या विकासाचे स्वप्न बघितले. हे विकासाचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर, जोपर्यंत लोकसंख्येचा ५० टक्के हिस्सा या स्वप्नाचा भाग होत नाही तोपर्यंत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे महिला लक्षित योजनांच्या माध्यमातून मोदीजींनी विकास सुरु केला. महिलाकेंद्रित विकास हे मॉडेल त्यांनी देशात सुरु केले. बेटी बचाव, बेटी पढाओपासून सुरु झालेला हा प्रवास आता लखपती दीदीपर्यंत पोहोचला आहे. ऑपरेशन सिंदूर सुरु असताना आमच्या दोन भगिणी टीव्हीवर आपल्या सैन्याचा पराक्रम आणि भारताची दैदिप्यमान कामगिरी आमच्यापुढे मांडायच्या. हा मोदीजींनी तयार केलेला नवा भारत आहे. या भारतात आमची भगिणी घरात बसणार नसून समान भागिदारीने देशाच्या विकासात सहभागी होणार आहे, हे आपल्या लक्षात आले. २०२९ साली मोदीजींनी देशाच्या संसदेत आणि विधानसभेत आमच्या भगिनींना भागिदारी दिलेली आहे. त्यामुळे आता आमच्या भगिणी थांबणार नाही. आमच्या नारी शक्तीला देशात कुणीही थांबवू शकत नाही," असे ते म्हणाले.

"लाडकी बहिणसारखी योजना आम्ही सुरु केली. आपल्याला महिलांना सक्षम करायचे आहे. एक महिला कमावती झाली तर ती संपूर्ण परिवाराचे कल्याण करते. महिला सहकारी संस्थांना समर्पित काम मिळालेच पाहिजे यादृष्टीने आम्ही निर्णय घेणार आहोत. महाराष्ट्रात निघणाऱ्या कामांमध्ये महिला संस्थांची हिस्सेदारी आणि हक्क प्रस्थापित करण्याचा निर्णय येत्या काळात घेऊ. त्यातून महिलांना उद्योग, व्यापार आणि व्यवसायात मोठे करण्याचे काम होणार आहे. अनेकजण निवडणूक संपल्यावर योजना बंद होतील असे म्हणत होते. परंतू, पाच वर्षं आपली एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. पाच वर्षाने तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आले तर पुढची पाच वर्षे या योजना असतील. २०२९ मध्ये तर तुम्हीच सत्तेत येणार आहात. त्यामुळे आमचे काहीही चालणार नाही. आतापर्यंत तुम्ही घरच्या गृहमंत्री म्हणून हुकूम चालवत होत्या. २०२९ नंतर मोदीजींनी तुम्हाला राज्याच्या मंत्री म्हणून हुकूम चालवण्याची संधी दिली आहे. यामुळे राज्यात गुणात्मक परिवर्तन होणार आहे," असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

बिहारमध्येही महाराष्ट्रासारखीच अवस्था होणार

"तुमच्या आशीर्वादाने आम्हाला अभूतपूर्व यश मिळाले. या यशाने तुम्ही आनंदी आहात, पण काही लोकांचे अजूनही समाधान झालेले नाही. ते तोंडावर पडले, मातीत मिळाले तरी सुधारण्यास तयार नाहीत. रोज वोटचोरी झाली असे म्हणतात. पण, यांचे डोके चोरी झाले आहे. त्यांना सुबुद्धी, अक्कल येवो असा २५ टक्के आशीर्वाद त्यांच्यासाठीही मागा. लाडक्या बहिणींच्या मताला ते चोरी म्हणत असतील तर त्यांच्यापेक्षा मोठे चोर कुणीच नाही. कालपर्यंत ते परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होतो. आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. पण त्यांची महाराष्ट्रात जी परिस्थिती झाली तीच अवस्था बिहारमध्येसुद्धा होणार आहे. देशाचा आणि आत्मनिर्भर भारताचा विचार करणाऱ्या मोदींसारख्या नेत्याच्या पाठीशी सर्व मातृशक्ती उभी आहे. मोदीजीच येणाऱ्या पिढीचे कल्याण करणार, असा सर्वांना विश्वास आहे. आम्ही नेहमी तुमची मान अभिमानाने उंच राहील असेच काम करु. आम्ही आमच्या स्वार्थासाठी नाही तर समाजाच्या, महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी काम करू. तुमचा आशीर्वाद मिळाला की सुसाट सुटतो आणि महाराष्ट्राला परिवर्तित करुन दाखवतो," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Powered By Sangraha 9.0