मुंबई, मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही संस्था पुढाकार घेऊ शकते. कोणतेही शुल्क न आकारता व्यवस्थापनाची तयारी असल्यास परवानगी देण्यात यावी, असे या निर्णयात स्पष्ट नमूद केले आहे.
या निर्णयानुसार सद्यस्थितीत खाजगी संस्थांच्या सहकार्याने ३० ते ३५ शाळा चालवल्या जात आहेत आणि त्यात मालवणी टाऊनशिप स्कूलचाही समावेश आहे. प्रयास फाउंडेशनच्या पुढाकारामुळे मालवणी भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होत असेल, तर त्याला विरोध का? असा थेट सवाल कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी उपस्थित केला.
मुंबई महापालिका मालवणी टाऊनशिप स्कूल येथे प्रयास फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते.
मालाडमध्ये सर्वाधिक सरकारी जमीन होती. त्यावर भीषण अतिक्रमण झाले. आता महापालिकेच्या शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न होतोय का? येथील आमदारांनी काय विकास केला ते त्यांनी सांगावे. मालवणीत इतक्या मोठ्या प्रमाणावर रोहिंग्या आणि बांग्लादेशी कुठून आले? त्यांना इतके सहकार्य कोणी केले? त्या मागचा हेतू काय? असा रोखठोक सवाल त्यांनी केला.
लोढा म्हणाले, “आज आम्ही मालवणीत विकासाचे काम करत आहोत. मुलांना उच्च दर्जाच्या सुविधा देत आहोत. या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांची मुले परदेशात शिकतात. लोकांची दिशाभूल त्यांनी करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासनात विकासकामात अडथळा निर्माण कारण्याऱ्यांची दादागिरी सहन केली जाणार नाही."
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री लोढा यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत सदर शाळेच्या विकासकामांसाठी एक कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली. या निधीतून विज्ञान प्रयोगशाळा, रोबोटिक्स लॅब, कम्प्युटर लॅब, व्यायामशाळा, खेळांचे साहित्य आणि इतर आवश्यक सुविधा शाळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासंदर्भातील पत्र लोढा यांनी आजच्या कार्यक्रमात प्रस्तुत केले.
सदर कार्यक्रमात बोलताना मंत्री लोढा यांनी हे स्पष्ट केले की, दर्जेदार सुविधांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये.