नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस २०२५ निमित्त आयोजित कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. यावेळी त्यांनी देशवासियांना शुभेच्छा देत सांगितले की, या वर्षीची संकल्पना “आर्यभट्ट ते गगनयान” ही भारताच्या आत्मविश्वासपूर्ण भूतकाळाचे तसेच दृढ भविष्यातील संकल्पाचे प्रतीक आहे. अल्पावधीतच राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस हा देशातील युवकांसाठी प्रेरणा व आकर्षणाचा उत्सव ठरला असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, भारत सध्या खगोलशास्त्र व खगोलभौतिकीवरील आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडचे यजमानपद भूषवत आहे, ज्यात ६० हून अधिक देशांतील ३०० हून अधिक युवा सहभागी झाले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत पदक जिंकून देशाचा गौरव वाढविला असल्याचे ते म्हणाले. इस्रोच्या ‘इंडियन स्पेस हॅकाथॉन’ व ‘रोबोटिक्स चॅलेंज’ सारख्या उपक्रमांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी युवकांमध्ये अवकाशाविषयीची आवड वाढत असल्याचे समाधान व्यक्त केले व सर्व सहभागी व विजेत्यांचे अभिनंदन केले.
भारताने दोन वर्षांपूर्वी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचून इतिहास घडविला तसेच अंतराळात डॉकिंग-अनडॉकिंग क्षमता प्राप्त करणारा जगातील चौथा देश झाल्याचे मोदी यांनी नमूद केले. नुकतेच भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर तिरंगा फडकावला, ही घटना प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले. अवकाश क्षेत्रात युवकांसाठी संधी वाढविण्यासाठी भारत “अंतराळवीर पूल” निर्माण करीत असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. त्यांनी तरुणांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
भारत सेमी-क्रायोजेनिक इंजिन व इलेक्ट्रिक प्रपल्शन सारख्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करत असून लवकरच गगनयान मिशन राबविणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. पुढील काळात भारत स्वतःचे अवकाश स्थानक उभारेल, तसेच अवकाशातील आणखी गहन क्षेत्रांचा शोध घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अवकाश क्षेत्रातील धोरणात्मक प्रगती अखंड सुरू राहिली पाहिजे, यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की, मागील अकरा वर्षांत अवकाश क्षेत्रातील अनेक निर्बंध दूर करण्यात आले व खासगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात प्रवेश देण्यात आला. सध्या देशात ३५० हून अधिक स्टार्टअप्स अवकाश-तंत्रज्ञानात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच खासगी क्षेत्र निर्मित पहिला पीएसएलवी रॉकेट प्रक्षेपित होणार असून, भारताचा पहिला खासगी दूरसंचार उपग्रह विकसित होतो आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
भारतीय अवकाश क्षेत्र पुढील पाच वर्षांत पाच ‘युनिकॉर्न’ निर्माण करू शकते का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी युवकांना प्रोत्साहन दिले. सध्या भारतातून वर्षाला ५-६ प्रक्षेपण होत असले तरी खासगी क्षेत्राच्या सहभागामुळे पाच वर्षांत दरवर्षी ५० रॉकेट्स प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य गाठता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अवकाश-तंत्रज्ञान हे फक्त वैज्ञानिक शोधापुरते मर्यादित नसून नागरिकांचे जीवन सुलभ करण्याचे साधन आहे, असे स्पष्ट करत मोदींनी पीक विमा, मत्स्य व्यवसाय, आपत्ती व्यवस्थापन, पंतप्रधान गति शक्ती योजनेतील भू-स्थानिक माहिती यांसारख्या क्षेत्रात उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर कसा होत आहे, याची उदाहरणे दिली.