ठाण्यात रंगला दाजी पणशीकरांच्या शब्दांचा स्मृतीजागर!

23 Aug 2025 21:38:02

मुंबई, रामायण - महाभारताचे अभ्यासक, जेष्ठ विचारवंत दिवंगत दाजी पणशीकर यांच्या शब्दसुमनांचा जागर ठाण्याच्या सहयोग मंदिरात पार पडला.

दिनांक २३ ऑगस्ट रोजी, ठाण्याच्या कलासरगम या संस्थेच्यावतीने " स्मरणगंध " या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जेष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांच्या समृद्ध कारकिर्दीला मान्यवरांकडून उजाळा देण्यात आला. एका छोट्याशा चित्रफितीच्या माध्यमातून दाजींचे कार्यकर्तृत्वाचा आढावा घेण्यात आला. सदर कार्यक्रमात दाजींच्या " महाभारत : एका सूडाचा प्रवास " " कर्ण खरा कोण होता ? " " गानसरस्वती आदिशक्तीचा धन्योद्गार" आधी पुस्तकातील काही भागांचे अभिवाचन करण्यात आले. ज्येष्ठ प्रकाशात अशोक कोठावळे, लेखक रवी प्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ निवेदिका वासंती वर्तक, जेष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, कवी अशोक बागवे, जेष्ठ अभिनेते उदय सबनीस, नाट्य दिग्दर्शक कुमार सोहनी आदी मान्यवरांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ प्रकाशक अशोक कोठावळे म्हणाली की दाजी पणशीकर यांच्यासारख्या थोर विद्वानाचे साहित्य आपल्यासाठी दीपस्तंभ आहे. त्यांचे ग्रंथ प्रेम सुद्धा वाखणण्याजोगे होते." कवी अशोक बागवे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की " आम्ही भाग्यवंत आहोत आम्हाला, दाजी पणशीकर यांच्यासारख्या ऋषींचा सहवास लाभला. त्यांच्या साहित्याचे अभिवाचन सुरू असताना दाजीच आमच्याशी संवाद साधत आहेत असा मला भास झाला"

सदर कार्यक्रमात ज्ञानयोगी दाजी पळशीकर पुरस्काराचे सुद्धा वितरण करण्यात आले. यावेळी बदलापूरचे ज्येष्ठ प्राध्यापक, ग्रंथसखा अशी ज्यांची ओळख आहे ते श्याम जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर संशोधिका गौरी मोघे यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आला. सदर कार्यक्रमाचे निवेदन नरेंद्र बेडेकर यांनी केले.


Powered By Sangraha 9.0